Link to home pageLanguagesLink to all Bible versions on this site
2
अन्नार्पणे
1 जेव्हा कोणी परमेश्वरासमोर अन्नार्पण घेऊन येईल, तेव्हा त्याने अर्पणासाठी सपीठ आणावे; त्याने त्यामध्ये तेल ओतावे व त्यावर धूप ठेवावा; 2 मग त्याने ते अर्पण अहरोनाच्या याजक मुलांकडे आणावे; त्यांनी त्यातून मूठभर सपीठ, तेल व सगळा धूप घेऊन परमेश्वराच्या चांगुलपणाबद्दल स्मरणाचा भाग म्हणून वेदीवर त्याचा होम करावा. हे परमेश्वरासाठी सुवासिक हव्य होय. हे अग्नीद्वारे केलेले होमार्पण होय. 3 अन्नार्पणातून जे काही उरेल ते अहरोनाचे व त्याच्या मुलांचे होईल. परमेश्वरासाठी केलेले हे अर्पण परमपवित्र अग्नीद्वारे केलेले होमार्पण होय.

4 जेव्हा भट्टीत भाजलेले अन्नार्पण करावयाचे असेल, तर ते तेलात मळलेल्या सपिठाच्या बेखमीर भाकरीचे किंवा वरून तेल ओतलेल्या बेखमीर चपात्याचे असले पाहिजे. 5 जर तुला तव्यावर भाजलेल्या भाकरीचे अन्नार्पण करावयाचे असेल तर ते तेलात मळलेल्या बेखमीर सपिठाचे असावे.

6 त्याचे तू तुकडे करून त्याच्यावर तेल ओतावे; हे अन्नार्पण होय. 7 कढईत तळलेल्यातले अन्नार्पण असेल तर ते तेलात मळलेल्या उत्तम सपिठाचे असावे.

8 अशाप्रकारचे अन्नार्पण तू परमेश्वरासमोर आणावेच; व ते याजकाकडे द्यावे व त्याने ते वेदीवर अर्पावे. 9 मग याजकाने अन्नार्पणातून काही भाग घेऊन परमेश्वराच्या महान चांगुलपणाबद्दल वेदीवर त्याचा होम करावा. हे अग्नीद्वारे केलेले होमार्पण होय आणि ते परमेश्वरासाठी सुवासीक हव्य होय. 10 अन्नार्पणातून जे काही उरेल ते अहरोन व त्याच्या मुलांचे असेल; अग्नीद्वारे परमेश्वरास केलेले हे अर्पण परमेश्वरास परमपवित्र आहे.

11 खमीर असलेले कोणतेही अर्पण परमेश्वरास अर्पू नये कारण होमाग्नीमध्ये खमीर किंवा मध हे परमेश्वरास अर्पण म्हणून अर्पावयाचे नाही. 12 प्रथम उत्पन्न म्हणून त्यांचे अर्पण परमेश्वरास करावे; पण ते सुवासिक हव्य म्हणून वेदीवर ठेवू नये. 13 तू करशील ते प्रत्येक अन्नार्पण मिठाने रुचकर कर; तू आपल्या देवाशी केलेल्या कराराचे मीठ आपल्या अन्नार्पणात घालावयास चुकू नको; तुझ्या सर्व अर्पणाबरोबर मीठ पण अर्पावे.

14 जर परमेश्वराकरीता तुला अन्नार्पण म्हणून पहिल्या हंगामाचा उपज अर्पावयाचा असेल तर विस्तवावर भाजलेल्या हिरव्या कणसातले चोळून काढलेले ताजे दाणे आण; हे हंगामातील तुझ्या प्रथम पिकाचे अन्नार्पण होय. 15 त्यावर तेल ओत आणि धूप ठेव; हे अन्नार्पण होय. 16 चोळून काढलेले दाणे व तेल ह्यापैकी काही व सर्व धूप ह्यांचा याजकाने स्मारकभाग म्हणून होम जाळावा; हे परमेश्वरासाठी अग्नीद्वारे केलेले अर्पण आहे.

<- लेवीय 1लेवीय 3 ->