Link to home pageLanguagesLink to all Bible versions on this site
17
अर्पणे करण्याचे एकमेव स्थळ
1 परमेश्वर मोशेला म्हणाला, 2 “अहरोन त्याचे पुत्र आणि सर्व इस्राएल लोक ह्यांना सांग की परमेश्वराने जी आज्ञा दिली आहे ती ही: 3 इस्राएल घराण्यातील एखाद्या मनुष्याने, छावणीत किंवा छावणीबाहेर एखादा बैल; कोकरू किंवा बकरा मारला, 4 परंतु परमेश्वराच्या निवासमंडपासमोर अर्पण करण्यासाठी दर्शनमंडपापाशी आणला नाही, तर त्या मनुष्यास रक्तपात केल्याचा दोष लागेल; त्याने त्या प्राण्याचा वध करून रक्त सांडले आहे म्हणून त्या मनुष्यास आपल्या लोकांतून बाहेर टाकावे.

5 या नियमाचा हेतू असा की इस्राएल लोक आपले पशू खुल्या शेतात मारतात ते त्यांनी दर्शनमंडपाच्या दारापाशी याजकाकडे परमेश्वरासमोर आणावे, व परमेश्वराकरिता शांत्यर्पणे म्हणून अर्पावे. 6 याजकाने त्यांचे रक्त दर्शनमंडपाच्या दारापाशी परमेश्वराच्या वेदीवर टाकावे आणि परमेश्वरास सुवास म्हणून त्यांच्या चरबीचा होम करावा.

7 आणि ह्यामुळे त्यांनी व्यभिचारी मतीने ‘अजमूर्तींच्या मागे लागून त्यांना आपले यज्ञपशु अर्पण करु नयेत. हे तुम्हास पिढ्यान् पिढ्या कायमचे विधी नियम आहेत!

8 तू त्यांना सांग की इस्राएल घराण्यापैकी किंवा त्यांच्यामध्ये राहणाऱ्या किंवा परदेशीय लोकांपैकी कोणी होमार्पण अथवा यज्ञ केला, 9 तर त्याने तो परमेश्वरास अर्पण करण्यासाठी दर्शनमंडपाच्या दारापाशी आणावा; त्याने तसे न केल्यास आपल्या लोकांतून त्यास बाहेर टाकावे.

रक्ताचे सेवन करणे वर्ज्य
10 इस्राएल घराण्यापैकी किंवा त्यांच्यामध्ये राहणाऱ्या परदेशीय लोकांपैकी कोणी रक्त सेवन केले! तर मी त्या मनुष्यापासून आपले तोंड फिरवीन व त्यास आपल्या लोकांतून बाहेर टाकीन. 11 कारण प्राण्याचे जीवन त्यांच्या रक्तात असते आणि तुमच्या जिवाबद्दल वेदीवर प्रायश्चित करण्यासाठी ते तुम्हास दिले आहे; कारण रक्तानेच प्रायश्चित होते हेच ते रक्त आहे की ज्याद्वारे जिवाचे प्रायश्चित होते.

12 म्हणून मी इस्राएल लोकांस सांगतले आहे की तुमच्यातील कोणीही, तसेच तुमच्यामध्ये राहणाऱ्या परदेशीयांनीही रक्त सेवन करु नये. 13 इस्राएल लोकांपैकी असो किंवा त्यांच्यामध्ये राहणाऱ्या परदेशीयांपैकी असो! कोणी खाण्यास योग्य पशूची किंवा पक्ष्याची शिकार केली तर त्याने त्याचे रक्त जमिनीवर ओतून मातीने झाकावे.

14 कारण प्राणीमात्रांच्या जीवनाविषयी म्हणाल तर त्यांचे रक्त हेच त्यांचे जिवन आहे ह्यामुळे मी इस्राएल लोकांस म्हणालो आहे की कोणत्याही प्राण्याचे रक्त सेवन करु नये, कारण सर्व प्राण्यांचे जिवन हेच त्यांचे रक्त आहे.

15 “कोणी मनुष्याने मग तो त्यांच्यामध्ये राहणार किंवा परदेशीय असो! तो जर मरण पावलेल्या किंवा जंगली जनावराने मारलेल्या प्राण्याचे मांस खाईल त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे व त्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध रहावे; म्हणजे तो शुद्ध होईल. 16 त्याने आपले कपडे धुतले नाहीत किंवा स्नान केले नाही तर तो आपल्या अपराधाबद्दल दोषी ठरेल, त्याने त्याबद्दल शिक्षा भोगावी.”

<- लेवीय 16लेवीय 18 ->