Link to home pageLanguagesLink to all Bible versions on this site
4
सीयोनेच्या शिक्षेची पूर्तता
1 सोने कसे निस्तेज झाले! शूद्ध सोने कसे बदलले आहे!
पवित्रस्थानाचे दगड प्रत्येक रस्त्याच्या चौकात विखुरले आहेत.
2 सियोनेचे मोलवान पुत्र शुद्ध सोन्याच्या बरोबरीचे होते,
पण आता ते कुंभाराच्या हाताने केलेल्या केवळ मडक्याप्रमाणे मानलेले आहेत.
3 कोल्ही आपल्या पिलांना स्तनांजवळ घेऊन दुध पाजतात.
पण माझ्या लोकांची कन्या वाळवंटात राहणाऱ्या शहामृगाप्रमाणे निर्दयी झाली आहे.
4 तान्ह्या मुलांची जीभ तहानेने टाळूला चिकटली आहे.
बालके भाकर मागतात, पण त्यांना कोणीही भाकर देत नाही.
5 जे पूर्वी स्वादिष्ट अन्न खात असत, ते आता रस्त्यावर उपाशी पडले आहेत.
जे किरमिजी वस्र घालत असत, त्यांनी आता उकिरड्यांचा आश्रय घेतला आहे.
6 सदोमावर कोणी हात टाकला नाही तरी त्याचा अकस्मात नाश झाला, त्याच्या पापांपेक्षा माझ्या लोकांच्या कन्येचे दुष्कर्म मोठे आहे.
सदोमाचा व गमोराचा अचानक नाश झाला, आणि त्यामध्ये कोणत्याही मनुष्याचा हात नव्हता.
7 तिचे सरदार बर्फासारखे चकाकत असत व दुधापेक्षा पांढरे होते.
ते पोवळयांसारखे कांतीने लाल होते. त्यांचे तेज जणू काही नीलमण्यासारखे होते.
8 पण आता त्यांचे चेहरे काजळीपेक्षा काळे झाले आहेत. त्यांना रस्त्यात कोणी ओळखतसुध्दा नाही.
त्यांची कातडी सुरकुतली आणि हाडाला चिकटली आहे. ती लाकडाप्रमाणे शुष्क झाली आहे.
9 जे उपासमारीने मरण पावले त्यांच्यापेक्षा जे तलवारीने मरण पावले त्यांचे बरे झाले आहे.
कारण उपासमार झालेले फारच दु:खी होते. ते व्याकुळ झाले होते. शेतामधून काहीच न मिळाल्यामुळे ते मरण पावले.
10 दयाळू स्त्रीयांच्या हातांनी आपली मुले शिजविली,
ती माझ्या लोकांच्या कन्येच्या विनाशसमयी ती त्यांचे अन्न झाली.
11 परमेश्वराने आपला क्रोध प्रकट केला. त्यांने आपला संतप्त राग ओतला आहे.
त्याने सियोनेत आग लावली आहे व त्या आगित तिचे आधारस्तंभे जाळून टाकले आहेत.
12 पृथ्वीवरील राजांचा व पृथ्वीवरील राहणाऱ्यांचा ह्यावर विश्वास बसला नाही की,
यरूशलेमेच्या प्रवेशद्वारांतून शत्रू किंवा वैरी वेशींत शिरतील.
13 असे घडले कारण, तिच्या संदेष्ट्यांनी पाप केले, तिच्या धर्मगुरुंनी दुष्कृत्ये केली,
त्यांनी नीतिमान लोकांचे रक्त यरूशलेमामध्ये सांडले होते.
14 ते आंधळयांप्रमाणे रस्त्यात भटकत होते.
कोणीही त्यांच्या वस्त्रालाही शिवू शकले नाहीत, कारण ती रक्ताने माखली होती.
15 दूर व्हा, “दूर व्हा! अमंगळ लोकहो.” आम्हास स्पर्श नका करू, असे लोक त्यांना म्हणाले,
ते पळून जाऊन भटकत राहीले, तेव्हा राष्ट्रांमधील लोक म्हणाले, “त्यांनी आमच्याबरोबर राहू नये.”
16 परमेश्वराने आपल्या समोरून त्यांना विखरले आहे,
तो पुन्हा त्याच्याकडे पाहणार नाही, याजकांची मर्यादा त्यांनी राखली नाही.
त्यांनी वडिलांचा मान राखला नाही.
17 मदतीची निरर्थक वाट पाहून आमचे डोळे थकले आहेत.
आम्ही आतूरतेने वाट पाहत असता जे राष्ट्र आमचा बचाव करू शकले नाही त्याची वाट आम्ही पाहिली आहे.
18 आमच्या शत्रूंनी आमची शिकार केली आणि आम्ही रस्त्यांवरसुध्दा जाऊ शकलो नाही.
आमचा शेवट जवळ आला! आमचे आयुष्य सरले होते! आमचा अंत आला आहे!
19 आमचा पाठलाग करणारे गरुडापेक्षाही वेगवान होते. त्यांनी आमचा डोंगरांत पाठलाग केला.
आम्हास पकडण्यासाठी ते रानात दडून बसले.
20 आमच्या दृष्टीने जो राजा सर्वश्रेष्ठ होता जो परमेश्वराचा अभिषिक्त, आमच्या नाकपूड्यातील श्वास.
त्यांच्या खाचेत पकडला गेला. ज्याच्या बद्दल आम्ही असे म्हणालो की, “आम्ही त्याच्या सावलीत राहू.
तो इतर राष्ट्रापासून आमचे रक्षण करतो.”
21 ऊस देशात राहणाऱ्या अदोमाच्या कन्ये आनंदित हो आणि हर्ष कर.
पण लक्षात ठेव की प्याला तुमच्याकडेसुध्दा येईल, तेव्हा तू मस्त होऊन आपणास विवस्त्र करशील.
22 सियोन कन्ये, तुझी शिक्षा संपली. आता पुन्हा तुला कैद करून नेले जाणार नाही.
अदोमाच्या कन्ये, तुमची पापे उघडी करून परमेश्वर तुम्हास शिक्षा करील.

<- विलापगीत 3विलापगीत 5 ->