Link to home pageLanguagesLink to all Bible versions on this site
4
योनाचा असंतोष व देवाची दया
1 परंतु यामुळे योनाला फार वाईट वाटले व त्यास राग आला. 2 तो परमेश्वराजवळ विनवणी करू लागला, “हे परमेश्वरा, मी माझ्या देशात होतो तेव्हा माझे सांगणे हेच होते की नाही? म्हणूनच मी तार्शीशास पळून जाण्याची घाई केली, कारण मला माहित होते की तू कृपाळू, कनवाळू, मंदक्रोध, दया संपन्न आहेस. संकट आणल्याबद्दल अनुताप करणारा असा देव आहेस. 3 माझी विनंती ऐक; हे परमेश्वरा, माझा जीव घे, कारण जिवंत राहण्यापेक्षा मला मरण चांगले वाटते.”

4 मग परमेश्वर म्हणाला, “तुला राग येणे चांगले आहे काय?” 5 मग योना बाहेर निघून निनवे शहराच्या पूर्व दिशेला बसला; तेथे तो एक मंडप करून सावलीत, शहराचे काय होईल हे पाहत बसला. 6 मग परमेश्वर देवाने योनाच्या डोक्यावर सावलीसाठी एक वेली उगविली, म्हणजे त्याने दुःखातून मुक्त व्हावे असे केले. त्या वेलीमुळे योनाला खूप आनंद झाला. 7 मग दुसऱ्या दिवशी देवाने एक किडा तयार केला, तो त्या वेलीला लागल्यामुळे ती वेल सुकून गेली.

8 मग देवाने, सूर्य उगवल्यावर पूर्वेकडून झळईचा वारा सोडला; आणि ऊन योनाच्या डोक्याला लागले त्याने तो मूर्छित झाला व त्यास मरण येवो अशी तो विनवणी करत म्हणाला, “मला जिवंत राहण्यापेक्षा मरण चांगले वाटते.” 9 मग देव योनाला म्हणाला, “त्या वेलीमुळे तुला राग येणे हे चांगले आहे काय?” तो म्हणाला, “रागामुळे माझा जीव गेला तरी चालेल.”

10 परमेश्वर त्यास म्हणाला, “या वेलीसाठी तू काहीच कष्ट केले नाहीस व तू हिला मोठे केले नाही, ती एका रात्रीत मोठी झाली आणि एका रात्रीत नष्ट झाली, त्या वेलीची तुला एवढी काळजी आहे; 11 ज्यांना उजव्या व डाव्या हाताचा फरक समजत नाही असे एक लाख वीस हजारांपेक्षा जास्त लोक या मोठ्या निनवे शहरात आहेत आणि पुष्कळ गुरेढोरे आहेत. त्यांची मी काळजी करू नये काय?”

<- योना 3