Link to home pageLanguagesLink to all Bible versions on this site
14
आयुष्याच्या क्षणभंगुरतेविषयी ईयोबाचे विचार
1 “मानव स्त्री पासून जन्मलेला आहे. आपले आयुष्य अगदी कमी आणि कष्टांनी भरलेले आहे.
2 तो फुलासारखा फुलतो व खुडल्या जातो, त्याचे आयुष्य छायेसारखे आहे ती थोडा वेळ असते आणि नंतर नाहीशी होते.
3 अशाकडे तुझे डोळे लागतील काय? अशा मला तू आपल्या न्यायसनासमोर नेतोस काय?
4 अशुद्धांतून शुद्ध पदार्थ कोण काढील? कोणीही नाही.
5 मनुष्याचे आयुष्य मर्यादित आहे, मनुष्याने किती जगायचे ते तूच ठरवतोस. तूच त्याची मर्यादा निश्चित करतोस आणि ती तो बदलू शकत नाही.
6 तू त्याजवर नजर ठेवणे बंद कर, म्हणजे त्यास शांती मिळेल, मजुर जसे रोज भरतो तसे त्यास त्याचे दिवस भरू दे म्हणजे तो आनंद पावेल.
7 वृक्षाला तोडून टाकले तरी त्याच्याबाबतीत आशा असते. ते पुन्हा वाढू शकते त्यास नवीन फांद्या फुटतच राहतात.
8 त्याची मुळे जरी जमिनीत जुनी झाली आणि त्याचे खोड जमिनीत मरुन गेले.
9 तरी ते पाण्यामुळे पुन्हा जिवंत होते. आणि त्यास नवीन रोपासारख्या फांद्या फुटतात.
10 परंतु मनुष्य मरतो आणि तो संपतो. खरोखर मनुष्य मरतो तेव्हा तो कोठे जातो.
11 जसे तलाव पाण्याशिवाय सुकून जातात, तसे नदी पाण्याशिवाय आटते.
12 मनुष्य मरतो तेव्हा तो झोपतो आणि पुन्हा कधीही उठत नाही. आकाश नाहीसे होईपर्यंत मरण पावलेला मनुष्य उठणार नाही. मनुष्यप्राणीत्या झोपेतून कधी जागा होत नाही.
13 तू मला अधोलोकापासून लपव, संकटा पासून वाचव, आणि तुझा राग निवळेपर्यंत तू मला तिथे लपवावेस. नंतर तू माझी मदत नियमित करून माझी आठवण करशील तर किती बरे होईल.
14 मरण पावलेला मनुष्य पुन्हा जिवंत होऊ शकतो का? मी माझी सुटका होईपर्यंत वाट बघत राहीन.
15 तू मला हाक मारशील आणि मी तुला उत्तर देईन. मग जे तू मला निर्माण केलेस तो मी तुला महत्वाचा वाटेन.
16 पण सध्या तू माझे प्रत्येक पाऊल मोजीत आहेस व माझ्या प्रत्येक पापा वर नजर ठेवीत आहेस.
17 तू माझी पापे एखाद्या पिशवीत बांधून ठेवली आहेत, माझे पाप झाकून ठेवीली आहेस.
18 डोंगर पडतात आणि नष्ट होतात. मोठमोठे खडक जागीच फुटतात.
19 खडकावरुन वाहणारे पाणी त्यांची झीज करते. पुरामुळे जमिनीवरची माती वाहून जाते. त्याचप्रमाणे मनुष्याची आशा नष्ट होते.
20 तू नेहमीच त्याचा पराभव करतोस, तू तेथून निघून जातोस. तू त्यास दु:खी करतोस आणि त्याला मरणासाठी सोडून देतो
21 त्यांच्या मुलांना बहुमान प्राप्त झाला तर ते त्यास समजत नाही. त्याच्या मुलांनी काही चुका केल्या तर त्या त्यास कधी दिसत नाहीत.
22 फक्त त्याच्या स्वत:च्या शारीरिक दु:खाची जाणीव असते. आणि त्याचे अतंर्याम केवळ स्वत:साठी रडते.”

<- ईयोब 13ईयोब 15 ->