1 आठवड्याच्या पहिल्या दिवशी, पहाटेस अंधारातच, मग्दालीया नगराची मरीया कबरेजवळ आली आणि कबरेच्या तोंडावरून धोंड काढली आहे असे तिने पाहिले. 2 तेव्हा शिमोन पेत्र व ज्याच्यावर येशूची प्रीती होती त्या दुसर्या शिष्याकडे धावत येऊन ती त्यांना म्हणाली, “त्यांनी प्रभूला कबरेतून काढून नेले आणि त्यास कोठे ठेवले हे आम्हास माहीत नाही.” 3 म्हणून पेत्र व तो दुसरा शिष्य बाहेर पडून कबरेकडे जावयास निघाले. 4 तेव्हा ते दोघे जण बरोबर धावत गेले; पण तो दुसरा शिष्य पेत्राच्या पुढे धावत गेला व कबरेजवळ प्रथम पोहचला. 5 त्याने ओणवून आत डोकावले आणि त्यास तागाची वस्त्रे पडलेली दिसली. पण तो आत गेला नाही. 6 शिमोन पेत्रहि त्याच्यामागून येऊन पोहचला व तो कबरेत शिरला; 7 आणि तागाची वस्त्रे पडलेली व जो रुमाल त्याच्या डोक्याला होता तो त्या तागाच्या वस्त्रांजवळ नव्हे, तर वेगळा एकीकडे गुंडाळून ठेवलेला होता. 8 तेव्हा जो दुसरा शिष्य पहिल्याने कबरेजवळ आला होता तोही आत गेला आणि त्याने पाहून विश्वास ठेवला. 9 कारण त्याने मरण पावलेल्यातून पुन्हा उठावे हे अवश्य आहे, हा शास्त्रलेख त्यांना अजून कळला नव्हता. 10 मग ते शिष्य पुन्हा आपल्या घरी गेले.
19 त्या दिवशी, म्हणजे आठवड्याच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी, शिष्य जेथे जमले होते तेथील दरवाजे यहूद्यांच्या भीतीमुळे बंद असता, येशू आत आला व मध्यभागी उभा राहून म्हणाला, “तुम्हास शांती असो.” 20 आणि हे बोलल्यावर त्याने त्यांना आपले हात आणि कूस दाखवली; आणि शिष्यांनी प्रभूला बघितले तेव्हा ते आनंदित झाले 21 तेव्हा येशू त्यांना पुन्हा म्हणाला, “तुम्हास शांती असो. जसे पित्याने मला पाठवले आहे तसे मीहि तुम्हास पाठवतो.” 22 एवढे बोलल्यावर त्याने त्यांच्यावर फुंकर टाकली आणि तो त्यांना म्हणाला, “पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. 23 ज्या कोणाच्या पापांची तुम्ही क्षमा करता त्यांची क्षमा झाली आहे आणि ज्या कोणाची तुम्ही ठेवता ती तशीच ठेवलेली आहेत.”
26 आणि पुन्हा, आठ दिवसानी, त्याचे शिष्य घरात होते आणि थोमा त्यांच्याबरोबर होता; आणि दरवाजे बंद असताना येशू आला व मध्यभागी उभा राहिला आणि म्हणाला, “तुम्हास शांती असो.” 27 मग तो थोमाला म्हणाला, “तुझे बोट पुढे कर आणि माझे हात बघ; तुझा हात पुढे कर आणि माझ्या कुशीत घाल; आणि विश्वासहीन होऊ नकोस पण विश्वास ठेवणारा हो.” 28 आणि थोमाने त्यास म्हटले, “माझा प्रभू आणि माझा देव!” 29 येशूने त्यास म्हटले, “तू मला पाहिले आहे म्हणून विश्वास ठेवला आहे. पाहिल्यावांचून विश्वास ठेवणारे आहे ते धन्य!”