Link to home pageLanguagesLink to all Bible versions on this site
2
काना येथील लग्न
1 नंतर तिसर्‍या दिवशी गालील प्रांतातील काना नगरात एक लग्न होते आणि येशूची आई तेथे होती. 2 येशूला व त्याच्या शिष्यांनाही लग्नाचे आमत्रंण होते. 3 मग द्राक्षरस संपला तेव्हा, येशूची आई त्यास म्हणाली, “त्यांच्याजवळ द्राक्षरस नाही.” 4 येशू तिला म्हणाला, “मुली, याच्याशी तुझा माझा काय संबंध आहे? माझी वेळ अजून आली नाही.” 5 त्याची आई नोकरांना म्हणाली, “हा तुम्हास जे काही सांगेल ते करा.” 6 तेथे पाण्याचे सहा दगडी रांजण, यहूद्यांच्या शुद्धीकरणाच्या रीतीप्रमाणे ठेवलेले होते, त्यामध्ये दोन दोन, तीन तीन मण पाणी मावेल असे ते होते. 7 येशू त्यांना म्हणाला, “रांजण पाण्याने भरा.” आणि त्यांनी ते काठोकाठ भरले. 8 मग त्याने नोकरांना सांगितले, “आता आता त्यातले काढून भोजनकारभार्‍याकडे घेऊन जा,” तेव्हा त्यांनी ते नेले. 9 द्राक्षरस बनलेले पाणी? भोजनकारभार्‍याने जेव्हा चाखले आणि तो कुठला होता हे त्यास माहीत नव्हते, पण ज्या नोकरांनी पाणी काढले त्यांना माहीत होते, तेव्हा भोजनकारभारी वराला बोलावून, 10 त्यास म्हटले, “प्रत्येक मनुष्य अगोदर चांगला द्राक्षरस वाढतो आणि लोक यथेच्छ प्याले मग बेचव वाढतो, पण तू तर चांगला द्राक्षरस आतापर्यंत ठेवला आहेस.” 11 येशूने गालील प्रांतातील काना नगरात आपल्या अद्भुत चिन्हांचा हा प्रारंभ करून आपले गौरव प्रकट केले आणि त्याच्या शिष्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला.

12 त्यानंतर तो, त्याची आई, त्याचे भाऊ व त्याचे शिष्य खाली कफर्णहूमास गेले; पण ते तेथे फार दिवस राहिले नाहीत.

मंदिराचे शुध्दीकरण
13 मग यहूद्यांचा वल्हांडण सण जवळ आला व येशू यरूशलेम शहरास वर गेला. 14 आणि त्यास परमेश्वराच्या भवनात गुरे, मेंढरे आणि कबुतरे विकणारे आणि सराफ हे बसलेले आढळले. 15 तेव्हा त्याने दोर्‍यांचा एक कोरडा करून मेंढरे व गुरे या सर्वांना परमेश्वराच्या भवनातून घालवून दिले. सराफांचा पैसाही ओतून टाकला आणि चौरंग पालथे केले. 16 व त्याने कबुतरे विकणार्‍यांना म्हटले, “ह्यांना येथून काढा, माझ्या स्वर्गीय पित्याच्या घराची बाजारपेठ करू नका.” 17 तेव्हा ‘तुझ्या भवनाविषयीचा आवेश मला ग्रासून टाकील,’ असा शास्त्रलेख असल्याचे त्याच्या शिष्यांना आठवले. 18 त्यावरून यहूदी त्यास म्हणाले, “तुम्ही हे करता तर आम्हास तुमच्या अधिकाराचे काय चिन्ह दाखवता?” 19 येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले, “तुम्ही हे परमेश्वराचे भवन मोडून टाका आणि मी तीन ते दिवसात उभारीन.” 20 यावरुन यहूदी अधिकारी म्हणाले, “परमेश्वराचे हे भवन बांधण्यास शेहचाळीस वर्षे लागली आणि आणि तुम्ही हे तीन दिवसात उभारणार काय?” 21 तो तर आपल्या शरीररूपी भवनाविषयी बोलला होता. 22 म्हणून तो असे म्हणत असे हे तो मरण पावलेल्यातून उठल्यावर त्याच्या शिष्यांना आठवले आणि त्यांनी शास्त्रलेखावर व येशूने उच्चारलेल्या वचनावर विश्वास ठेवला.

23 आता वल्हांडण सणाच्या वेळी, तो यरूशलेम शहरात असता, त्याने केलेली चिन्हे पाहून पुष्कळ जणांनी त्याच्या नावावर विश्वास ठेवला. 24 असे असले तरी येशू त्यांना ओळखून असल्यामुळे त्यास स्वतःला त्यांच्यावर विश्वास नव्हता. 25 शिवाय, मनुष्याविषयी कोणीही साक्ष द्यावी याची त्यास गरज नव्हती; कारण मनुष्यात काय आहे हे तो ओळखीत होता.

<- योहान 1योहान 3 ->