Link to home pageLanguagesLink to all Bible versions on this site
43
मिसर देशास जाणे
1 असे घडले की, यिर्मयाने परमेश्वर जो त्यांचा देव याने लोकांस सांगण्यास दिलेली सर्व वचने सांगून समाप्त केली. 2 होशायाचा मुलगा अजऱ्या, कारेहाचा मुलगा योहानान व सर्व गर्विष्ठ लोक यिर्मयाला म्हणाले, “तू खोटे बोलत आहेस. तुम्ही तेथे मिसरात राहण्यास जाऊ नका, असे सांगण्यास परमेश्वर आमचा देव याने तुला पाठविले नाही. 3 तू आम्हास खास्द्यांच्या हाती द्यावे, यासाठी की, तू आमच्या मरणास कारण व्हावे आणि आम्ही बाबेलात बंदीवान व्हावे. म्हणून नेरीयाचा मुलगा बारूख तुला आमच्याविरूद्ध भडकावीत आहे.”

4 म्हणून कारेहाचा मुलगा योहानान, सर्व सैन्याचे अधिकारी व इतर सर्व लोक ह्यांनी यहूदा देशात राहण्याविषयीची परमेश्वराची वाणी ऐकली नाही. 5 पण कारेहाचा मुलगा योहानान व सैन्यांचे सर्व अधिकारी यांनी वाचलेले सर्व यहूदी जे ज्या सर्व राष्ट्रांत पसरले होते. त्यातून यहूदा देशात राहण्यास परत आले होते त्यांना आपल्याबरोबर घेतले. 6 त्यांनी पुरुष व स्त्रिया, मुले व राजांच्या मुली आणि राजाचा अंगरक्षकांचा नायक नबूजरदान याने जे सर्वजण शाफानाचा मुलगा अहीकाम याचा मुलगा गदल्या याच्याजवळ ठेवले होते त्यांना आणि यिर्मया संदेष्टा व नेरीयाचा मुलगा बारूख ह्यांनाही बरोबर नेले. 7 ते मिसर देशात, तहपन्हेस येथे गेले, कारण त्यांनी परमेश्वराची वाणी ऐकली नाही.

8 मग तहपन्हेसात यिर्मयाकडे परमेश्वराचे वचन आले आणि म्हणाले, 9 “तू आपल्या हातात काही मोठे धोंडे घे आणि ते तहपन्हेस येथील फारोच्या घराच्या प्रवेशदाराजवळ पादचारीमार्गावर यहूदी लोकांच्या दृष्टीसमोर चुन्याने लपवून ठेव. 10 मग त्यांना सांग, सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव असे म्हणतो, पाहा, मी बाबेलाचा राजा, नबुखद्नेस्सर, माझा सेवक याला येथे निरोप्या पाठवून बोलावून घेईन. यिर्मया तू या पुरलेल्या धोंड्यावर मी त्याचे सिंहासन स्थापीन, नबुखद्नेस्सर त्यावर आपला भव्य गालीचा पसरवील.

11 कारण तो येऊन व मिसरावर चढाई करील. जे कोणी मरणासाठी नेमलेले असतील त्यांना मरण दिले जाईल. जो कोणी बंदीवांनासाठी नेमलेला आहे, तो बंदीवासात जाईल. आणि जे कोणी तलवारीसाठी असतील, ते तलवारीला दिले जातील. 12 मग मी मिसराच्या देवांच्या मंदिरांना आग लावील. नबुखद्नेस्सर त्यांना जाळील किंवा त्यांना बंदीवान करून नेईल. मेंढपाळ ज्याप्रमाणे त्याच्या कपड्यावरील पिसवा ओढून काढून आपले कपडे स्वच्छ करतो, त्याप्रमाणे तो मिसर देश साफ करील. तो विजयाने त्या जागेतून जाईल. 13 तो मिसर देशामधील बेथ-शेमेश त्याचे स्तंभ मोडून टाकील. तो मिसरी देवतांची मंदिरे जाळून टाकील.”

<- यिर्मया 42यिर्मया 44 ->