Link to home pageLanguagesLink to all Bible versions on this site
39
यरूशलेमेचा पाडाव
2 राजे 25:1-12; यिर्म. 52:4-16

1 यहूदाचा राजा सिद्कीया याच्या नवव्या वर्षात आणि दहाव्या महिन्यात, बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सर आपले संपूर्ण सैन्य घेऊन यरूशलेमाविरूद्ध चालून आला आणि त्यास वेढा घातला. 2 सिद्कीयाच्या अकराव्या वर्षाच्या आणि चौथ्या महिन्याच्या नवव्या दिवशी यरूशलेमेच्या तटबंदीला भगदाड पडले. 3 मग बाबेलाच्या राजाचे सर्व वरिष्ठ अधिकारी यरूशलेमेत आले आणि मधल्या दरवाजाजवळ बसले. नेर्गल शरेसर, समगार नबो, व सर्सखीम हे महत्वाचे अधिकारी होते. नेर्गल-शरेसर हा उच्च अधिकारी होता. आणि इतर सर्व बाबेलचे अधिकारी होते.

4 असे झाले की, जेव्हा यहूदाचा राजा सिद्कीया आणि त्याच्या लढाऊ मनुष्यांनी त्यांना पाहिले, ते पळून गेले. ते रात्री राजाच्या बागेच्या वाटेने नगरातून तटबंदीच्या दोन भिंतीमधल्या दारातून निघून गेले. राजा अराबाकडच्या मार्गाने निघून गेला. 5 पण खास्द्यांच्या सैन्याने त्यांचा पाठलाग करून आणि यार्देन नदीच्या खोऱ्याच्या मैदानात यरिहोच्याजवळ सिद्कीयाला गाठले. मग त्यांनी त्यास पकडले आणि हमाथ देशातील रिब्ला येथे बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याच्याकडे आणले, जेथे नबुखद्नेस्सराने त्याच्यावर शिक्षा ठरविली.

6 रिब्लामध्ये, बाबेलाच्या राजाने सिद्कीयाच्या डोळ्यांदेखत, त्याच्या स्वतःच्या मुलांना जिवे मारले; त्याने यहूदातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनासुद्धा जिवे मारले. 7 मग त्याने सिद्कीयाचे डोळे काढले आणि त्यास बाबेलाला नेण्यासाठी कास्य साखळ्यांनी बांधले.

8 नंतर खास्द्यांनी राजाच्या घराला व लोकांच्या घरांना आग लावली. त्यांनी यरूशलेमेची तटबंदी फोडली. 9 राजाच्या अंगरक्षकांचा प्रमुख नबूजरदान ह्याने नगरामध्ये राहिलेल्या लोकांस, जे लोक खास्द्यांना सोडून गेले होते आणि जे कोणी नगरात उरलेले लोक होते, त्यांना कैदी करून बाबेलास नेले. 10 पण राजाच्या अंगरक्षकाचा प्रमुख नबूजरदान याने ज्यांच्याजवळ स्वतःचे काहीच नव्हते अशा गरीब लोकांस यहूदा देशात राहण्याची परवानगी दिली. त्याने त्याच दिवशी त्यांना द्राक्षमळे व शेते दिली.

नबुखद्नेस्सर यिर्मयाची काळजी घेतो
11 बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सराने यिर्मयाच्या बाबतीत, राजाच्या अंगरक्षकांचा प्रमुख नबूजरदानाला ताकीद दिली होती; तो म्हणाला, 12 “त्याला घेऊन व त्याची काळजी घे. त्यास इजा करु नको. तो जे काही सांगेल ते त्याच्यासाठी कर.” 13 म्हणून राजाच्या अंगरक्षकांचा प्रमुख नबूजरदान याने, नबूशजबान या उच्च अधिकारी, नेर्गल-शरेसर या उच्च अधिकाऱ्याला आणि बाबेल राज्यातील सर्व महत्वाच्या अधिकाऱ्यांना पाठविले. 14 त्यांच्या मनुष्यांनी यिर्मयाला पहारेकऱ्यांच्या अंगणातून काढले आणि शाफानाचा मुलगा अहीकाम याचा मुलगा गदल्या याने त्यास घरी न्यावे म्हणून त्यांच्या स्वाधीन केले. मग यिर्मया लोकांमध्ये राहू लागला.
एबद-मलेखच्या मुक्तीचे वचन मिळते
15 आता तो यिर्मया पहारेकऱ्याच्या अंगणात कैदेत असताना परमेश्वराचे वचन यिर्मयाकडे आले. ते म्हणाले, 16 एबद-मलेख कूशीशी बोल आणि सांग, सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव असे म्हणतोः पाहा, मी माझी वचने या नगराविरूद्ध अरिष्टासाठी आणील आणि चांगल्यासाठी नाही. त्या दिवशी त्या सर्व तुझ्यासमक्ष खऱ्या होतील.

17 पण, मी तुला त्यादिवशी वाचवीन. असे परमेश्वर म्हणतो. आणि तू ज्यांना घाबरतोस, त्यांच्या स्वाधीन मी तुला करणार नाही. 18 कारण मी तुला खात्रीने वाचवीन. तू तलवारीने पडणार नाहीस. तुझा जीव तुला लूट असा होईल, कारण तू माझ्यावर विश्वास ठेवला आहेस. असे परमेश्वर म्हणतो.

<- यिर्मया 38यिर्मया 40 ->