Link to home pageLanguagesLink to all Bible versions on this site
28
हनन्याचे खोटे भविष्य
1 मग त्याच वर्षी असे झाले की, यहूदाचा राजा सिद्कीया याच्या कारकिर्दीच्या सुरवातीला चौथ्या वर्षाच्या व पाचव्या महिन्यात अज्जूरचा मुलगा हनन्या संदेष्टा, जो गिबोनाकडचा होता, परमेश्वराच्या मंदिरात तो माझ्याशी याजक व सर्व लोकांसमोर माझ्याशी बोलला. तो म्हणाला, 2 “सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव, असे म्हणतो, बाबेलाच्या राजाने लादलेले जोखड मी मोडले आहे.

3 बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सराने परमेश्वराच्या मंदिरातील सर्व वस्तू घेऊन बाबेलास नेली ती मी दोन वर्षांच्या आत, परत या स्थानात आणीन. 4 यहूदाचा राजा यहोयाकीम याचा मुलगा यकन्या व बाबेलास कैद करून नेलेले यहूदाचे जे सर्व लोक यांस मी परत या ठिकाणी आणीन असे परमेश्वर म्हणतो, कारण मी बाबेलाच्या राजाचे जोखड मोडीन.

5 जे याजक हनन्या संदेष्टाच्यासमोर होते आणि सर्व लोक परमेश्वराच्या मंदिरात उभे होते, तेव्हा यिर्मया संदेष्टा बोलला, 6 यिर्मया संदेष्टा म्हणाला, आमेन, परमेश्वर असे करो! परमेश्वराच्या मंदिरातील नेलेल्या वस्तू आणि बंदिवासातील सर्व बाबेलाहून परत या स्थानात आणण्यासाठी परमेश्वराने दिलेली सर्व वचने, जी भविष्य म्हणून तू सांगितली आहेत, ती खरी होवोत. 7 जरी, हे जे वचन मी तुझ्या कानी व सर्व लोकांच्या कानी बोलतो ते आता ऐक.

8 माझ्यापूर्वी आणि तुझ्यापूर्वी फार पूर्वी अनेक संदेष्टे होऊन गेले, त्यांनीसुद्धा अनेक देशाविषयी व मोठ्या राज्यांविषयी, लढायांविषयी, दुष्काळ व मरी येतील असे भाकीत केले होते. 9 जो संदेष्टा शांतीविषयी भविष्य सांगतो त्या संदेष्ट्याचे वचन खरे ठरेल तेव्हा तो संदेष्टा खरोखरच परमेश्वराने पाठविलेला आहे हे समजेल.”

10 परंतु हनन्या संदेष्ट्याने यिर्मया संदेष्ट्याच्या मानेवरून जोखड काढून व तोडून टाकले. 11 मग हनन्या सर्व लोकांसमोर बोलला व म्हणाला, “परमेश्वर असे म्हणतो, ‘ह्याप्रमाणेच बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सर याने लादलेले जोखड दोन वर्षाच्या आत मी प्रत्येक राष्ट्रांच्या मानेवरून काढून तोडून टाकीन.” मग यिर्मया संदेष्टा आपल्या वाटेने गेला.

12 जेव्हा हनन्या संदेष्ट्याने यिर्मयाच्या मानेवरून जोखड काढून तोडल्यानंतर यिर्मयाकडे परमेश्वराचे वचन आले. 13 “जा व हनन्याला सांग की, परमेश्वर असे म्हणतो, तू लाकडाचे जोखड तोडलेस, पण त्यांच्याऐवजी मी लोखंडाचे जोखड बनवीन. 14 कारण मी सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव असे म्हणतो, ‘बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सर याची सेवा सर्व राष्ट्रांनी करावी म्हणून मी त्यांच्या मानेवर लोखंडाचे जोखड ठेवले आहे, ते त्याची सेवा करतील. याशिवाय मी त्यास शेतातील वन्यपशूंवरही अधिकार देईन.”

15 नंतर यिर्मया संदेष्टा हनन्या संदेष्टा म्हणाला, “हनन्या! ऐक! परमेश्वराने तुला पाठविलेले नाही पण तू या लोकांस लबाडीवर विश्वास ठेवावयास लावले. 16 म्हणून परमेश्वर असे म्हणतो, ‘पाहा, मी तुला या जगातून उचलीन, या वर्षी तू मरशील, कारण तू परमेश्वराविरूद्ध अप्रामाणिकतेचे निवेदन केलेस.” 17 आणि त्याच वर्षाच्या सातव्या महिन्यात संदेष्टा हनन्या मेला.

<- यिर्मया 27यिर्मया 29 ->