Link to home pageLanguagesLink to all Bible versions on this site
5
श्रीमंतानी केलेल्या जुलुमांचे प्रतिफळ
1 धनवान लोकहो ऐका, तुमच्यावर जी संकटे येत आहेत त्याबद्दल रडा व आक्रोश करा. 2 तुमची संपत्ती नाश पावली आहे व तुमच्या कपड्यांना कसर खाऊन टाकीत आहेत. 3 तुमचे सोनेचांदी मातीमोल झाले आहे. त्याच्यावर चढलेला थर तुमच्याविरुध्द साक्ष देईल आणि तुमचे शरीर अग्नीसारखे खाऊन टाकील. तुम्ही शेवटल्या दिवसांसाठी धन साठवून ठेवले आहे. 4 पहा! तुमच्या शेतात कापणी करणाऱ्या मजुरांची मजुरी जी तुम्ही अडवून धरलीत ती ओरडून दुःख करीत आहे आणि ते रडणे सैन्याच्या परमेश्वराच्या कानी पोहोचले आहे. 5 जगात असताना तुम्ही चैनबाजी व विलास केला आणि मन मानेल तसे वागला. वधावयाच्या दिवासासाठी खाऊनपिऊन तयार केलेल्या सारखे तुम्ही पुष्ट झालात. 6 जे लोक तुम्हास काहीही विरोध करीत नाही अशा नीतिमान लोकांस तुम्ही दोषी ठरवले आहे आणि त्यांची हत्या केली आहे.
सोशीकपणा बाळगावा म्हणून बोध
7 यासाठी बंधूंनो, प्रभूच्या येण्यापर्यंत धीर धरा, लक्षात ठेवा की, शेतकरी आपल्या शेतातील मोलवान पिकाची वाट पाहतो. तो धीराने त्याची वाट पाहतो. पहिला व शेवटचा पाऊस मिळेपर्यंत वाट पाहतो. 8 तुम्हीसुद्धा धीराने वाट पाहिली पाहिजे. तुमचे अंतःकरण बळकट करा कारण प्रभूचे दुसरे आगमन जवळ आले आहे. 9 बंधूंनो, एकमेकांविरुद्ध कुरकुर करण्याचे थांबवा, यासाठी की तुम्ही दोषी ठरू नये. पहा, न्यायाधीश दाराजवळ आत येण्यासाठी तयारीत उभा आहे. 10 बंधूंनो, जे संदेष्टे प्रभूच्या नावाने बोलले त्यांचे दुःख सहन व धीराविषयी उदाहरण घ्या. 11 त्यांनी दुःखसहन केले म्हणून आपण त्यांना धन्य म्हणतो, हे लक्षात ठेवा. तुम्ही ईयोबाच्या सहनशीलतेविषयी ऐकले आहे आणि प्रभूकडून जो त्याचा शेवट झाला तोसुध्दा पाहिला आहे, तो असा की प्रभू फार दयाळू आणि कनवाळू आहे.

12 माझ्या बंधूंनो, मुख्यतः शपथ वाहू नका; स्वर्गाची, पृथ्वीची किंवा दुसरी कशाचीही शपथ वाहू नका. तुम्ही दोषी ठरू नये म्हणून तुम्हास होय म्हणायचे तर होयच म्हणा. तुम्हास नाही म्हणायचे तर नाहीच म्हणा. 13 तुमच्यातील कोणी संकटात आहे काय? त्याने प्रार्थना करावी. कोणी आनंदी आहे काय? त्याने स्तुतिगान करावे. 14 तुमच्यापैकी कोणी आजारी आहे काय? त्याने मंडळीतील वडीलांना बोलवावे व त्यांना त्याच्यासाठी प्रार्थना करण्यास सांगावे आणि प्रभूच्या नावाने त्याच्यावर तेल लावावे 15 विश्वासाने केलेली प्रार्थना आजारी मनुष्यास बरे करील व प्रभू त्यास उठवील. जर त्याने पापे केली असतील तर प्रभू त्याची क्षमा करील. 16 म्हणून एकमेकांकडे आपल्या पापांची कबुली द्या आणि एकमेकांसाठी प्रार्थना करा. यासाठी की, तुम्ही बरे व्हावे. नीतिमान मनुष्याची प्रार्थना सामर्थ्ययुक्त व परिणामकारक असते. 17 एलीया हा आपल्यासारख्या स्वभावाचा मनुष्य होता. पाऊस पडू नये म्हणून त्याने कळकळीने प्रार्थना केली आणि नंतर साडेतीन वर्षे देशात पाऊस पडला नाही. 18 मग त्याने पुन्हा प्रार्थना केली व आकाशाने पाऊस दिला आणि पृथ्वीने आपले धान्य उपजवले.

19 माझ्या बंधूंनो, जर तुमच्यापैकी कोणी चुकला किंवा सत्यापासून दूर भटकला असेल आणि जर कोणी त्यास परत आणले तर पापी मनुष्यास चुकीच्या मार्गावरून तो परत आणतो. 20 तो त्याचा जीव मरणापासून तारील व पापांची रास झाकील.

<- याकोबाचे पत्र 4