Link to home pageLanguagesLink to all Bible versions on this site
4
पक्षकलहाबाबत सूचना

1 तुमच्यामध्ये लढाया व भांडणे कोठून येतात? तुमच्या अवयवात ज्या वाईट वासना लढाई करतात त्यातून की नाही काय? 2 तुम्ही लोभ धरता पण तुम्हास मिळत नाही; तुम्ही घात व हेवा करता, पण तुम्हास मिळवता येत नाही. तुम्ही भांडता व लढाई करता तरी तुम्हास मिळत नाही, कारण तुम्ही मागत नाही. 3 तुम्ही मागता आणि तुम्हास मिळत नाही; कारण तुम्ही वाईट वासना बाळगून मागता, म्हणजे आपण आपल्या चैनीसाठी खर्चावे म्हणून मागता. 4 हे देवाशी अप्रामाणिक पिढी! जगाशी मैत्री म्हणजे देवाशी वैर हे तुम्ही जाणत नाही काय? म्हणून जो कोणी जगाचा मित्र होऊ इच्छितो तो देवाचा वैरी आहे. 5 किंवा ‘आपल्यात राहणारा पवित्र आत्मा ईर्षावान’, असे शास्त्रलेख व्यर्थ म्हणतो, असे तुम्हास वाटते काय? 6 पण तो अधिक कृपा करतो, म्हणून शास्त्रलेख असे म्हणतो की, “देव गर्विष्ठांना विरोध करतो, पण लीनांवर कृपा करतो.” 7 म्हणून देवाच्या अधीन रहा; आणि सैतानाला आडवा, म्हणजे तो तुमच्यापासून दूर पळून जाईल. 8 तुम्ही देवाच्या जवळ या म्हणजे तो तुमच्याजवळ येईल. अहो पाप्यांनो, तुम्ही हात शुद्ध करा; अहो द्विमनाच्या मनुष्यांनो, अंतःकरणे शुद्ध करा. 9 दुःखी व्हा, शोक करा आणि रडा; तुमच्या हसण्याचा शोक होवो; तुमच्या आनंदाची खिन्नता होवो. 10 परमेश्वरासमोर नम्र व्हा, म्हणजे तो तुम्हास उच्च करील.

11 बंधूंनो, एकमेकांविषयी वाईट बोलू नका. जो बंधूविषयी वाईट बोलतो व आपल्या बंधूला दोष लावतो तो नियमशास्त्राविषयी वाईट बोलतो आणि नियमशास्त्राला दोष लावतो. पण तू जर नियमशास्त्राला दोष लावलास तर तू नियम पाळणारा नाहीस पण न्यायाधीश आहेस. 12 जो तारण्यास व नष्ट करण्यास समर्थ आहे असा नियमशास्त्र देणारा व न्यायाधीश एकच आहे. मग शेजार्‍याला दोष लावणारा तू कोण?

बढाई मारू नये म्हणून इशारा

13 अहो! तुम्ही जे म्हणता की, “आज किंवा उद्या आपण या गावाला जाऊ, तेथे वर्षभर राहू आणि व्यापार करून कमावू.” 14 पण उद्या काय होईल हे तुम्हास माहीत नसते. तुमचे आयुष्य काय आहे? तुम्ही केवळ वाफ आहा; ती थोडा वेळ दिसते आणि नंतर, दिसेनाशी होते. 15 त्याबद्दल तुम्ही असे म्हणा की, “परमेश्वराची इच्छा असल्यास आपण जिवंत असू आणि हे करू किंवा ते करू.” 16 आता, तुम्ही आपल्या योजनेचा अभिमान मिरवता. अशा प्रकारचा सर्व अभिमान व्यर्थ आहे. 17 म्हणून चांगले करणे कळत असून, जो ते करीत नाही त्यास ते पाप आहे.

<- याकोबाचे पत्र 3याकोबाचे पत्र 5 ->