Link to home pageLanguagesLink to all Bible versions on this site
55
सर्वांना दयेची मोफत देणगी
1 अहो सर्व तान्हेल्यांनो, पाण्याजवळ या! आणि ज्याच्याजवळ पैसा नाही,
सर्व या, विकत घ्या आणि खा! या, पैश्याशिवाय व मोलाशिवाय मद्य आणि दूध घ्या.
2 जी भाकर नव्हे तिच्यासाठी तुम्ही चांदी का तोलून देता?
आणि ज्याने समाधान होत नाही त्यासाठी श्रम का करता?
माझे लक्षपूर्वक ऐका आणि जे चांगले आहे ते खा व मिष्टान्नात तुमचे जीवन आनंदीत होवो.
3 तुम्ही कान द्या आणि माझ्याकडे या! ऐका, म्हणजे तुमचे जीवन जिवंत राहील!
मी खरोखर तुमच्याबरोबर सर्वकाळचा करार करीन, विश्वासाची कृती करून दावीदाशी करार केला.
4 पाहा, मी त्यास राष्ट्रात साक्षी, लोकांचा अधिपती व सेनापती याप्रमाणे ठेवले आहे.
5 पाहा, तू राष्ट्र ओळखत नाहीस अशा राष्ट्राला तू बोलावशील आणि ज्या राष्ट्राला तुझी ओळख नाही ते तुजकडे धाव घेतील.
कारण परमेश्वर तुझा देव, इस्राएलाचा पवित्र प्रभू, ज्याला तू गौरविले आहे याच्याकरता तुजकडे धाव घेतील.
6 परमेश्वर सापडेल त्याकाळी त्यास शोधा; तो जवळ असतानाच त्यास बोलवा.
7 दुष्ट आपला मार्ग व पापी मनुष्य आपले विचार सोडून देवो.
तो परमेश्वराकडे माघारी येवो आणि तो त्यांच्यावर दया करील व तो आमच्या देवाकडे येवो, तो त्यांना विपुलपणे क्षमा करील.
8 कारण माझे विचार तुमचे विचार नाहीत, किंवा तुमचे मार्ग माझे मार्ग नाहीत. हे परमेश्वराचे म्हणणे आहे.
9 कारण जसे आकाश पृथ्वीपेक्षा उंच आहे तसे माझे मार्ग तुमच्या मार्गाहून आणि माझे विचार तुमच्या विचांरापेक्षा उंच आहेत.
10 कारण जसे पाऊस आणि बर्फ आकाशातून खाली पडतात
आणि पुन्हा भूमी भिजवल्याशिवाय आणि उत्पन्न करण्यास व अंकुर व पेरणाऱ्यास बीज आणि खाणाऱ्यास भाकर दिल्याशिवाय आकाशात परत जात नाही.
11 तसेच माझ्या तोंडातून निघालेले शब्द निरर्थक होऊन परत माझ्याकडे येणार नाही,
परंतु जे मी इच्छिले ते पूर्ण करील आणि ज्यासाठी पाठवले ते यशस्वी होईल.
12 कारण तुम्ही आनंदाने बाहेर जाल आणि शांतीने चालवले जाल;
तुमच्यापुढे डोंगर आणि टेकड्या आनंदाने जयघोष करतील आणि शेतांतील सर्व झाडे आनंदाने टाळ्या वाजवतील.
13 काटेरी झुडपाच्याऐवजी, सदाहरित वाढतील; आणि काट्याकुट्यांच्या जागी मेंदी उगवेल.
आणि ते परमेश्वराच्या नावासाठी सर्वकाळचे चिन्ह होईल, ते कधीही नष्ट होणार नाही.

<- यशया 54यशया 56 ->