Link to home pageLanguagesLink to all Bible versions on this site
47
बाबेलसंबंधी न्याय
1 बाबेलाच्या कुमारी कन्ये, खाली ये आणि धुळीत बस;
खास्द्यांच्या कन्ये, सिंहासनाशिवाय जमिनीवर बस.
तुला यापुढे सुंदर आणि नाजूक म्हणणार नाहीत.
2 जाते घे आणि पीठ दळ; तुझा बुरखा काढ,
तुझ्या झग्याचा घोळ काढून टाक, तुझे पाय उघडे कर, नद्या ओलांडून जा.
3 तुझी नग्नता उघडी होईल, होय, तुझी लज्जा दिसेल.
मी सूड घेईल आणि कोणा मनुष्यास सोडणार नाही.
4 “आमचा उद्धारक, त्याचे नाव सेनाधीश परमेश्वर इस्राएलाचा पवित्र प्रभू आहे.”
5 खास्द्यांच्या कन्ये शांत बस आणि अंधकारात जा;
तुला यापुढे राज्याची राणी म्हणणार नाहीत.
6 मी माझ्या लोकांवर रागावलो होतो; मी माझे वतन अशुद्ध केले आहे
आणि मी ते तुझ्या हातात दिले आहे, पण तू त्यांना दया दाखवली नाही;
तू वृद्धांवर फार जड ओझे ठेवले आहे.
7 तू म्हटले, मी त्यांच्यावर सर्वोच्च राणीप्रमाणे चिरकाल राज्य करीन.
म्हणून तू यागोष्टी मनात घेतल्या नाहीत, किंवा यांचा परिणाम लक्षात घेतला नाही.
8 तेव्हा आता हे ऐका, अगे विलासिनी जी तू सुरक्षितपणे बसली आहेस,
जी तू आपल्या मनात म्हणतेस, मीच आहे आणि माझ्यासारखे कोणीच नाही;
मी कधीच विधवा अशी बसणार नाही किंवा मला मुले गमवल्याचा अनुभव कधी येणार नाही.
9 परंतु अपत्यहीनता व विधवापण
या दोन्ही गोष्टी एका दिवशी एका क्षणात तुझ्यावर येतील;
तुझे जादूटोणा आणि पुष्कळ मंत्रतंत्र व ताईत यांना न जुमानता तुजवर जोराने येतील.
10 तू आपल्या दुष्कृत्यांवर विश्वास ठेवलीस; तू म्हणालास, मला कोणी पाहणार नाही;
तुझे शहाणपण आणि ज्ञान यांनी तुला बहकावले,
पण तू आपल्या मनात म्हणतेस, मीच आहे आणि माझ्यासारखे कोणी नाही.
11 तुझ्यावर संकटे येतील; तुझ्या आपल्या मंत्रातंत्राने ते घालवून देण्यास तू समर्थ नाहीस.
तुझ्यावर विपत्ती येईल; ती तू निवारण करू शकणार नाहीस.
तुला समजण्या पूर्वीच अचानक तुझ्यावर संकटे येतील.
12 ज्या तुझ्या पुष्कळ मंत्रतंत्रात आणि जादूटोणात
आपल्या लहानपणापासून विश्वासाने त्याचे पठन करून त्यामध्ये टिकून राहीला;
कदाचित त्यामध्ये तू यशस्वी होशील, कदाचित तू विपत्तीला घाबरून दूर होशील.
13 तू आपले बहुत सल्लागार करून थकली आहेस;
आणि तुला जे काय घडणार आहे त्यापासून तुझे रक्षण करो. जे आकाशाचा तक्ता आणि ताऱ्यांकडे पाहून
नव चंद्रदर्शन जाहीर करतात, ती माणसे उभे राहून तुझे रक्षण करोत.
14 पाहा, ते धसकटाप्रमाणे होतील; अग्नी त्यांना जाळील;
त्यांना स्वतःला ज्वालेच्या हातातून वाचवता येणार नाही;
तेथे ती ज्वाला तिच्यासमोर बसण्यास किंवा हा कोळसा त्यांना शेकण्यासाठी योग्य नाही.
15 ज्यांच्यासाठी तू मेहनत केली, तुझ्या तरुणपणापासून तू त्यांच्याबरोबर व्यापार केलास; ते सर्व तुला सोडून जातील.
ते प्रत्येकजण आपापल्या मार्गाने भरकटले; तुला वाचवायला कोणीही नाही.

<- यशया 46यशया 48 ->