1 त्या वेळेला, बलदानाचा मुलगा मरोदख-बलदान, बाबेलचा राजा याने हिज्कीयाला पत्रे आणि भेटी पाठवल्या; कारण त्याने हिज्किया आजारी असल्याचे आणि बरा झाल्याचे ऐकले होते. 2 या गोष्टीमुळे हिज्कीयाला आनंद झाला; त्याने आपल्या भांडारातील मोल्यवान वस्तू चांदी, सोने, मसाले, अमूल्य तेल आणि त्याचे शस्त्रगार आणि त्याच्या भांडारात हे सर्व सापडले ते सर्व दाखवले. हिज्कीयाने त्यांना दाखविले नाही असे त्याच्या घरात किंवा त्याच्या सर्व राज्यात काहीच राहिले नव्हते.
3 मग यशया संदेष्टा हिज्कीया राजाकडे आला आणि त्यास विचारले, “ही माणसे तुला काय म्हणत होती? ती कोठून आली होती?” हिज्कीया म्हणाला, “ती दूरच्या बाबेल देशातून माझ्याकडे आली होती.” 4 यशयाने विचारले, “तुझ्या घरात त्यांनी काय काय पाहिले?” हिज्कीयाने उत्तर दिले, “माझ्या घरातील प्रत्येक गोष्ट त्यांनी पाहिली. मी त्यांना माझ्या सर्व मोलवान वस्तू दाखविल्या नाहीत असे काहीच नाही.”
5 मग यशया हिज्कीयाला म्हणाला, सेनाधीश परमेश्वराचे वचन ऐक 6 पाहा, असे दिवस येणार आहेत की, जेव्हा तुझ्या महालातील प्रत्येक गोष्ट, ज्या तुझ्या पूर्वजांनी आतापर्यंत जमविले आहे ते सर्व बाबेलाला घेऊन जातील. काहीच उरणार नाही, असे परमेश्वर म्हणतो.
7 आणि तुझ्यापासून जी मुले जन्मतील, ज्यांचा तू स्वतः पिता असशील त्यांना घेऊन जातील आणि बाबेलच्या राजवाड्यात तुझी मुले षंढ म्हणून राहतील. 8 मग हिज्कीया यशयाला म्हणाला, “परमेश्वराचे वचन तू बोललास ते विश्वासयोग्य आहे.” कारण त्याने विचार केला, माझ्या दिवसात तेथे शांतता आणि स्थिरता राहील.
<- यशया 38यशया 40 ->