Link to home pageLanguagesLink to all Bible versions on this site
38
हिज्कीयाचे दुखाणे
2 राजे 20:1-11; 2 इति. 32:24-26

1 त्या दिवसात, हिज्कीया आजारी पडून मरणाच्या टोकास आला होता, आमोजाचा मुलगा यशया संदेष्टा त्याच्याकडे आला आणि त्यास म्हणाला, “परमेश्वर म्हणतो, तुझ्या घराची व्यवस्था कर; कारण तू मरणार आहेस तू जगणार नाहीस.” 2 मग हिज्कीयाने भिंतीकडे तोंड वळवले आणि परमेश्वरास प्रार्थना केली. 3 तो म्हणाला, “परमेश्वरा, मी आपल्या पूर्ण अंतःकरणाने आणि प्रामाणिकपणाने तुझ्यासमोरच चाललो, याची कृपया आठवण कर आणि तुझ्या दृष्टीने जे चांगले ते मी करत आलो.” आणि हिज्कीया मोठ्याने रडला.

4 नंतर यशयाला परमेश्वराकडून संदेश आला, तो म्हणाला, 5 जा आणि माझ्या लोकांचा पुढारी हिज्कीयाला सांग, परमेश्वर असे म्हणतो, तुझा पूर्वज दाविदाचा, देव म्हणतो, मी तुझी प्रार्थना ऐकली आणि तुझे अश्रू पाहिले. पाहा, मी तुझ्या आयुष्याची पंधरा वर्षे आणखी वाढवीन. 6 मी तुला आणि या नगराला अश्शूराच्या राजापासून अधिकारातून सोडवीन आणि या नगराचे संरक्षण करील.

7 आणि माझ्यापासून तुला हे चिन्ह असेल, परमेश्वर, जे मी बोलतो ते करतो. 8 पाहा, सूर्यास्तानंतर सूर्य क्षितिजाखाली गेल्यामुळे आहाजाच्या पायऱ्यांवर पडणारी सावली मी दहा पावले मागे आणीन. सूर्यास्त होताच सूर्याची सावली दहा पावले मागे जाईल.

9 जेव्हा यहूदाचा राजा हिज्कीया आजारी होता आणि त्यातून बरा झाल्यावर त्याने लिहिलेली ही प्रार्थना आहेः

10 मी म्हणालो, मी माझ्या आयुष्याच्या अर्ध्यामार्गात असता
मी मृतलोकांच्या द्वारात जाईन; माझ्या राहिलेल्या वर्षात मला विसाव्यासाठी तेथे पाठवले.
11 मी म्हणालो की, “मी परमेश्वरास, जिवंतांच्या भूमीत परमेश्वरास आणखी पाहणार नाही;
मी जगातील राहणाऱ्यांना किंवा मानवजातीला आणखी पाहणार नाही.
12 माझे जीवन काढून घेतले आहे, आणि मेंढपाळाच्या तंबूप्रमाणे माझ्यापासून दूर केलेली आहे;
मी विणकऱ्याप्रमाणे आपले जीवन गुंडाळले आहे; तो मला मागावरून कापून काढणार आहे;
दिवसाच्या व रात्रीच्यामध्ये तू माझा शेवट करशील.
13 मी सकाळपर्यंत रडत राहिलो;
सिंहाप्रमाणे तो माझी सर्व हाडे मोडतो; दिवसाच्या व रात्रीच्यामध्ये तू माझ्या जीवनाचा शेवट करशील.
14 मी निळवीप्रमाणे किलबिललो; पारव्याप्रमाणे मी कुंजन केले;
माझे डोळे वर पाहून पाहून थकले आहेत.
माझ्या प्रभू, माझ्यावर जुलूम झाला आहे. मला मदत कर.”
15 मी काय बोलू? त्याने दोन्ही केले, तो माझ्याशी बोलला आणि त्याने ते केले आहे;
मी आपल्या जीवनात हळूहळू चालेल कारण माझ्या जिवाला खूप क्लेश झाले.
16 हे प्रभू, तू माझ्यावर दुःखे पाठवली ती माझ्या चांगल्यासाठी आहेत. माझे जीवन मला परत मिळेल;
तू माझे जीवन व आरोग्य परत मिळवून दे.
17 माझ्या भल्यासाठीच या दुःखांचा अनुभव मला आहे.
तूच मला नाशाच्या खळग्यातून वाचवले आहेस.
कारण माझी सर्व पापे तू मागे फेकली आहेस.
18 कारण अधोलोक तुझे आभार मानीत नाही. मृत्यू तुझी स्तुती करत नाही;
जे खाली खोल खड्ड्यात जातात त्यांना तुझ्या सत्याची आशा नसते.
19 जिवंत मनुष्य, जिवंत मनुष्य, तोच एक तुझे आभार मानेल, जसा मी आज करीत आहे;
पित्याने मुलांना तुझ्या सत्याची जाणीव करून द्यावी.
20 “परमेश्वर मला तारण्यास सिद्ध आहे आणि आम्ही आपल्या आयुष्याच्या सर्व दिवसात
परमेश्वराच्या मंदिरात संगीतासह साजरा करू.”

21 आता यशया म्हणतो, अंजीराची एक चांदकी आणून गळवावर बांधा आणि त्यास बरे वाटेल. 22 हिज्कीया असेही म्हणाला, मी परमेश्वराच्या मंदिरात चढून जाईन याचे चिन्ह काय?

<- यशया 37यशया 39 ->