Link to home pageLanguagesLink to all Bible versions on this site
34
अदोम व इतर राष्ट्रे ह्यांच्याविरुद्ध परमेश्वराचा कोप
1 तुम्ही राष्ट्रांनो, जवळ या व ऐका; तुम्ही लोकांनो, लक्ष द्या! पृथ्वी व तीने भरलेल्या, जग आणि त्यातून येणाऱ्या सर्व गोष्टी ऐकोत.
2 कारण सर्व राष्ट्रावर परमेश्वर रागावला आहे आणि त्यांच्या सैन्यांविरूद्ध संताप झाला आहे;
त्याने त्यांचा समूळ नाश केला आहे. त्याने त्यांचा संहार करण्यासाठी त्यांच्या हवाली केले आहे.
3 त्यांच्यातील वधलेल्यास न पुरताच ठेवून देतील; त्यांच्या मृत शरीराची दुर्गंधी सर्वत्र पसरेल,
आणि त्यांच्या रक्ताने पर्वत भिजून चिंब होईल.
4 आकाशातील सर्व तारे निस्तेज होतील,
आणि एखाद्या गुंडाळीप्रमाणे आकाश गुंडाळले जाईल; आणि सर्व तारे लुप्त होतील,
जसे द्राक्षवेलीचे पान सुकून पडते, जसा अंजिराच्या झाडाचा सुकलेला पाला गळून पडतो.
5 ज्यावेळेस माझी स्वर्गीय तलवार रक्ताने माखेल,
पाहा, ती आता अदोमावर उतरली आहे, ज्या लोकांचा समूळ नायनाट करण्याचे मी ठरविले आहे त्यांच्यावर ती उतरेल.
6 परमेश्वराची तलवार आच्छादली असून रक्त गाळीत आहे,
ती कोकऱ्यांच्या आणि बोकड्यांच्या रक्ताने माखली असून मेंढ्याच्या गुर्द्यांच्या चरबीने पुष्ट झाली आहे.
कारण परमेश्वर बस्रा नगरात यज्ञबली व अदोमाच्या भूमीत मोठा संहार करणार आहे.
7 रानबैलांची आणि तरूण बैलाबरोबर, वृद्धाची त्यांच्याबरोबर कत्तल करण्यात येईल.
त्यांची भूमी रक्त पिईल व तेथील धुळीमध्ये चरबीच चरबी असेल.
8 कारण सूड घेण्याचा परमेश्वराचा दिवस आहे. आणि सियोनेवर अन्यायाची भरपाई करण्याचे वर्ष परमेश्वराने निश्चित केले आहे.
9 अदोमातील प्रवाह बदलून डांबर होतील, तिची धूळ गंधक होईल,
आणि त्याची भूमी जळत्या डांबराप्रमाणे होईल.
10 तो रात्र व दिवस पेटत राहील. त्याचा धूर निरंतर वर चढत जाईल.
ती पिढ्यानपिढ्यापासून ओसाड पडेल; सर्वकाळपर्यंत कोणी तिच्यावरून चालणार नाही.
11 पण हिंस्त्र पक्षी आणि प्राणी तिथे राहतील; घुबडे आणि डोमकावळे तेथे आपली घरटी करतील.
तो तिच्यावर अस्ताव्यस्ततेची दोरी ताणील आणि ओसाडीचा ओळंबा लावील.
12 तिच्या सरदारांना
राज्यावर बोलावतील पण तेथे त्यातले कोण असणार नाहीत, आणि तिचे सर्व अधिपती नाहीसे होतील.
13 तिच्या महालात काटेरी झाडे वाढतील, आणि तिच्या किल्ल्यात खाजकुईलीची झाडे व काट्यांची झाडे उगवतील.
ती कोल्ह्यांचे वस्तीस्थान, शहामृगाचे अंगण होईल.
14 हिंस्त्रपशू तरसांबरोबर तेथे भेटतील आणि रानबोकडे एकमेकास हाक मारतील. आपल्या मित्रांना हाका मारतील.
निशाचर प्राणीही तेथे राहतील व त्यास विश्रांतीचे स्थान मिळेल.
15 तेथे घुबड आपल्यासाठी घरटे करेल, अंडी घालून ती उबवतील. आणि आपल्या पिल्लांचे रक्षण करतील.
होय, घार आपआपल्या जोडीदारांसोबत जमा होतील.
16 परमेश्वराच्या ग्रंथातून शोधा, यातून एकही सुटणार नाही.
कोणी एक जोडप्याविना असणार नाही; कारण माझ्याच मुखाने हे आज्ञापिले आहे, आणि त्याच्या आत्म्याने त्यांना एकवट केले आहे.
17 त्यांच्या जागेसाठी त्यांनी चिठ्ठी टाकली आहे, आणि त्याने आपल्या हाताने ती भूमी दोरीने मापून त्यांना वाटून दिली आहे.
ते त्यांचे सर्वकाळचे वतनदार होतील; ते पिढ्यानपिढ्या त्यामध्ये राहतील.

<- यशया 33यशया 35 ->