Link to home pageLanguagesLink to all Bible versions on this site
30
मिसरावरील अवलंबून राहणे व्यर्थ
1 परमेश्वर असे म्हणतो, “बंडखोर मुलांना हायहाय हे.
ते योजना करतात, त्या माझ्यापासून नाही; ते दुसऱ्या राष्ट्राबरोबर युती करतात,
पण त्या माझ्या आत्म्याच्या मार्गदर्शनाने नाही,
अशी ती पापाने पापाची भर घालतात.
2 ते फारोकडे संरक्षण मागण्याकरिता
आणि त्याच्या छायेत आश्रय घेण्याकरता मला न विचारता मिसरकडे खाली उतरून जातात.
3 यास्तव फारोचे संरक्षण हे तुम्हास लाज
आणि मिसरमधील आश्रय हे तुमच्या साठी मानखंडणा असे होईल.
4 तुमचे अधिकारी सोअनला आणि तुमचे दूत हानेसला गेले आहेत.
5 कारण ते मदत करू न शकणाऱ्या, जे साहाय्य किंवा हित करणारे नाहीत
तर लाज व निंदा असे आहेत त्यांच्यामुळे ते सर्व लाजवले जातील.”
6 नेगेबमधल्या[a] प्राण्यांविषयी घोषणा संदेश:
आपले काही चांगले करता न येणाऱ्या लोकांकडे,
संकटाच्या आणि धोक्याच्या प्रदेशातून, सिंहीण व सिंह, विषारी साप आणि आग्या उडता सर्प,
ते आपले धन गाढवांच्या खांद्यावर व आपली संपत्ती उंटाच्या पाठीवर घालून नेतात.
7 मिसरच्या मदतीला काही किंमत नाही. म्हणून मी मिसरला स्वस्थ बसणारा रहाब असे नाव दिले.
8 आता तू त्यांच्या उपस्थितीत पाटीवर लिही आणि पुस्तकावरही कोरून ठेव,
अशासाठी की पुढल्या काळासाठी साक्षी म्हणून ते साठून राहील.
9 कारण हे बंडखोर लोक आहेत, खोटे मुले,
मुले जी परमेश्वराची शिकवणूक ऐकण्यास नकार देतात.
10 ते पाहणाऱ्यांना म्हणतात, “तुम्ही पाहू नका.”
आणि भविष्यवाद्याला म्हणता, “आमच्या जवळ सरळ भविष्य सांगू नको;
आम्हास बऱ्या वाटतील, आवडतील अशाच गोष्टी सांग, कपटी भविष्ये सांग.
11 मार्गातून बाजूला फिर, वाटेतून बाजूला फिर,
इस्राएलाच्या पवित्र देवाला आमच्यापासून दूर घेऊन जा.”
12 यामुळे इस्राएलचा पवित्र असे म्हणतो,
“कारण तुम्ही हा संदेश नाकारता
आणि जुलूम व कपट यांवर विसंबून राहता.
13 म्हणून हा अन्याय तुम्हास,
जसा तुटलेला भाग पडण्यास तयार असतो, जसा उंच भिंतीमध्ये फुगवटा असतो,
ज्याचे पडणे अकस्मात एकाएकी होते त्यासारखा होईल.
14 कुंभाराची मडकी फोडावी तसे तो ते फोडून त्याचे तुकडे करील, तो त्यास सोडणार नाही.
आणि त्याचे तुकडे चुलीतून विस्तव घ्यायला किंवा डबक्यातून पाणी उपसायला खापरही ठेवणार नाही.”
15 कारण परमेश्वर, माझा प्रभू, इस्राएलचा पवित्र देव असे म्हणतो,
“तुम्ही फिरणार आणि शांत रहाल, तर तुम्ही तराल. तुमची माझ्यामध्ये शांतता आणि विश्वास हीच शक्ती आहे.”
पण तुम्ही इच्छुक नव्हते.
16 तुम्ही म्हणता, नाही!
कारण आम्ही घोड्यांवर बसून पळू, म्हणून तुम्हास पळावे लागेल.
आणि आम्ही चपळ घोड्यांवर स्वार होऊन जाऊ, पण जे तुमच्या पाठीस लागतील ते पण चपळ होतील.
17 एकाने धमकी दिल्यास तुमची हजारो माणसे पळून जातील.
पाच जणांच्या धमकीने तुम्ही पळून जाल.
पर्वताच्या शिखरावर ध्वजस्तंभासारखे किंवा डोंगरावरच्या झेंड्यासारखे तुम्ही शिल्लक उराल तोपर्यंत असे होईल.
देवाच्या लोकांस त्याच्या कृपेचे अभिवचन
18 तरीही परमेश्वर तुमच्यावर दया करावी म्हणून वाट पाहील. तुम्हावर दया दाखवावी म्हणून तो उंचावला जाईल,
कारण परमेश्वर न्यायाचा देव आहे, जे सर्व त्याची वाट पाहतात ते आशीर्वादीत आहेत.
19 कारण यरूशलेम येथे सियोनेत लोक राहतील आणि तू पुन्हा कधीही रडणार नाहीस.
खचित तो तुझ्या रडण्याचा आवाज होताच तुझ्यावर दया करील, जेव्हा ते ऐकल, तो तुला उत्तर देईल.
20 जरी परमेश्वर तुला संकटाची भाकर आणि दु:खाचे पाणी देईल,
तरी तुझे शिक्षक पुन्हा लपू शकणार नाही, तर तुझे डोळे तुझ्या शिक्षकांना पाहतील.
21 जेव्हा तुम्ही डावीकडे किंवा उजवीकडे वळाल तर तुझे कान तुझ्यामागून वाणी ऐकतील, “हा मार्ग बरोबर आहे. तुम्ही या मार्गात चालावे.”
22 तुम्ही आपल्या चांदीच्या कोरीव मूर्तीचा मुलामा व आपल्या सोन्याच्या ओतीव मूर्तीची मढवणी तुम्ही विटाळवाल.
तुम्ही त्या देवांना मासिकपाळीच्या कपड्याप्रमाणे फेकून द्याल. तुम्ही त्यांना म्हणाल, “येथून निघून जा.”
23 तुम्ही जे बी भूमीत पेराल त्यासाठी पाऊस तो देईल
आणि भूमीतून मुबलक अशी भाकर देईल.
आणि पिके विपुल होईल.
त्या दिवसात तुझी गुरे मोठ्या कुरणांमध्ये चरतील.
24 आणि बैल व गाढव जे नांगरतात
ते सुपाने व दांताळ्याने उफणलेल्या धान्याचे आंबवण खातील.
25 आणि वधाच्या मोठ्या दिवशी बुरुज खाली पडतील. तेव्हा उंच पर्वतावर व प्रत्येक उंच डोंगरावर पाण्याचे झरे व ओघ वाहतील.
26 त्यावेळी, चंद्राचा प्रकाश सूर्यप्रकाशाप्रमाणे प्रखर होईल आणि सूर्यप्रकाश जसा सात दिवसाचा प्रकाश तसा सात पट होईल.
परमेश्वर त्याच्या जखमी लोकांस मलमपट्टी करील आणि माराने झालेल्या त्यांच्या जखमा बऱ्या करील तेव्हा असे घडेल.
अश्शूराबाबत परमेश्वराचा न्याय
27 पाहा! परमेश्वराचे नाव त्याच्या क्रोधाने जळते, व दाट धुराच्या लोटाने दुरवरून येत आहे,
त्याचे ओठ क्रोधाने भरले आहेत आणि त्याची जीभ खाऊन टाकणाऱ्या अग्नीप्रमाणे आहे.
28 त्याचा श्वास जणूकाय नदीच्या जोराच्या प्रवाहासारखा आहे जो मानेपर्यंत चढत आहे,
अशासाठी की नाशाच्या चाळणीने राष्ट्रांना चाळावे, आणि त्याचा श्वास लोकांच्या तोंडामध्ये बहकविणारा लगाम राहील.
29 जसे पवित्र सण पाळण्याच्या रात्रीप्रामाणे तुमचे गीत होते.
आणि जसा कोणी परमेश्वराच्या डोंगरावर इस्राएलाच्या खडकाकडे जाताना पावा वाजवत जातो तसा तुम्हास आनंद होईल.
30 परमेश्वर आपला वैभवी आवाज लोकांस ऐकू जाऊ देईल आणि वारा, पाऊस व गारपीट सह क्रोधाविष्ट व अग्नी यांनी तो आपला भुज चालवील.
31 परमेश्वराचा आवाज ऐकून अश्शूर विखुरला जाईल. तो त्यास आपल्या काठीने मारील.
32 आणि काठीचा जो प्रत्येक फटका परमेश्वर त्याच्यावर मारील तो,
डफ व वीणा वाजत असताना होईल, आणि हात खाली वर करीत युद्धांमध्ये तो त्यांच्याशी लढेल.
33 पूर्वीपासून तोफेत तयार करून ठेवले आहे. ते राजासाठी तयार केले आहे, ते पुष्कळ खोल आणि रूंद केले आहे.
त्याच्या चीतेसाठी विस्तव आणि खूप लाकडे असे आहे. परमेश्वराचा श्वास जळत्या गंधकाच्या प्रवाहाप्रमाणे त्यास पेटवतो.

<- यशया 29यशया 31 ->