यशया पुस्तकाचे नाव त्याचा लेखक यशया याच्या नावावरून पडले, त्याचा विवाह एका संदेष्ट्रीशी झाला जीने त्याच्यापासून किमान दोन मुलांना जन्म दिला. (यशया 7:3; 8:3). त्याने चार यहूद्यांचे राजे उज्जीया, योथाम, आहाज आणि हिज्कीया (1:1) यांच्या कारकिर्दीत भाकीत केले आणि तो कदाचित पाचवा दुष्ट राजा मनश्शे याच्या मृत्यूस भेटला.
तारीख आणि लिखित स्थान
साधारण इ. पू. 740 - 680.
राजा उज्जीयाच्या कारकिर्दीच्या अखेरीस आणि योथाम, आहाज आणि हिज्कीया यांच्या कारकिर्दीत हे पुस्तक लिहिले गेले.
प्राप्तकर्ता
यशयाच्या संबंधातील मुख्य श्रोते हे यहूदाचे लोक होते जे देवाच्या नियमांनुसार जगण्यात अयशस्वी ठरले.
हेतू
यशयाचा उद्देश संपूर्ण जुन्या करारामध्ये येशू ख्रिस्ताचे व्यापक भविष्यसूचक चित्र प्रदान करणे आहे. त्याच्या जीवनाची पूर्ण व्याप्ती यांचा समावेश आहे: त्याच्या येण्याची घोषणा (यशया 40:3-5), त्याचा कुमारीच्याद्वारे जन्म (7:14), सुवार्ता घोषित करणे (61:1), त्याच्या बलिदानासंबधी मृत्यू (52:13-53:12), आणि स्वतःचा लोकांसाठी परत येणे (60:2-3). प्रेषित यशया यास प्रामुख्याने यहूदाच्या राज्यामध्ये भविष्यवाणी करण्यासाठी बोलवण्यात आले. यहूदा पुनरुत्थान आणि बंडखोरपणाच्या काळात माध्यमातून जात होता. अश्शूर आणि मिसराचा नाश करून यहूदाला धोक्यात आणण्यात आले होते, परंतु परमेश्वराच्या कृपेमुळे त्याला वाचवले गेले. यशयाने पापापासून पश्चात्ताप करण्याचा आणि भविष्यकाळात देवाच्या सुटकेची आशा बाळगण्याचा संदेश घोषित केला.
विषय
तारण
रूपरेषा
1. यहूदाची पुनर्बांधणी — 1:1-12:6
2. इतर राष्ट्रांविरुद्ध पुनर्बांधणी — 13:1-23:18
3. भविष्यातील संकट — 24:1-27:13
4. इस्राएल आणि यहूदा यांची पुनर्बांधणी — 28:1-35:10
5. हिज्कीया आणि यशाया यांचा इतिहास — 36:1-38:22
6. बाबेल देशाची पृष्ठभूमी — 39:1-47:15
7. देवाची शांतीची योजना — 48:1-66:24
1
पातकी राष्ट्र
1 आमोज याचा मुलगा यशया ह्याने यहूदा व यरूशलेम ह्याविषयी उज्जीया, योथाम, आहाज व हिज्कीया या यहूदी राजांच्या कालकिर्दीच्या काळात पुढे घडून येणाऱ्या गोष्टींविषयीचा दृष्टांत पाहिला. 2 हे आकाशा, ऐक आणि हे पृथ्वी लक्षपूर्वक कान दे; कारण परमेश्वर हे बोलला आहेः
“मी लेकरांचे पालनपोषण करून त्यांना वाढविले, परंतु त्यांनी मजविरूद्ध बंडखोरी केली.
3 बैल आपल्या धन्याला ओळखतो, आणि गाढव आपल्या मालकाचे खाण्याचे कुंड ओळखतो,
परंतु इस्राएल ओळखत नाही, इस्राएलास समजत नाही.”
4 अहाहा! हे राष्ट्र, पापी, दुष्कृत्यांच्या भाराने खाली दबलेले लोक,
दुष्ट जनांची संतती, भ्रष्टाचाराने वागणारी मुले! त्यांनी परमेश्वरास सोडून दिले आहे, इस्राएलाच्या पवित्र परमेश्वरास त्यांनी तुच्छ लेखले आहे.
त्यांनी स्वतःस त्याच्यापासून दूर केले आहे.
5 तुम्ही अजूनही का मार खाता? तुम्ही अधिकाधिक बंड का करता?
तुमचे संपूर्ण मस्तक आजारी व संपूर्ण अंतःकरण कमकुवत आहे.
6 पायाच्या तळव्यापायापासून डोक्यापर्यंत ज्याला दुखापत झाली नाही असा भाग राहीला नाही;
फक्त जखमा व घाव आणि ताज्या उघड्या जखमा आहेत; त्या स्वच्छ केल्या नाहीत, पट्टी बांधून त्या झाकल्याही नाहीत किंवा तेलाने उपचार केला नाही.
7 तुमचा ओसाड झाला आहे; तुमची नगरे जळून गेली आहेत.
तुमच्या देखत परकीयांनी तुमची शेते उध्द्वस्त केली आहेत.
परकीयांनी ती नासधूस करून, उलथून सोडून दिली आहेत.
8 सियोनाची कन्या[a] ही द्राक्षाच्या मळ्यातील खोपटीसारखी,
काकडीच्या बागेतील पडवीसारखी, वेढा दिलेल्या नगरासारखी झाली आहे.
9 जर सेनाधीश परमेश्वराने आम्हासाठी थोडेही शिल्लक ठेवले नसते तर