Link to home pageLanguagesLink to all Bible versions on this site
13
एफ्राइमाच्या समूळ नाशाबद्दलचे भाकीत
1 एफ्राईम बोलत असे तेव्हा लोकांचा थरकाप होई;
तो इस्राएलाचा सरदार झाला;
पण पुढे बआलमूर्तीमुळे दोषी होऊन तो लोपला.
2 आता ते अधिकाधिक पाप करु लागले
ते चांदीच्या ओतीव मूर्ती आपल्या कुशलतेने कारागीर बनवतो
तसे बनवू लागले.
लोक म्हणू लागले,
“जे बलिदान करतात त्यांनी वासरांचे चुंबन घ्या”
3 म्हणून पहाटेच्या ढगासारखे
लवकर उडून जाणाऱ्या दवासारखे खळ्यातून
वाऱ्याने उडणाऱ्या भुसासारखे
आणि धुराडयातून उडणाऱ्या धुरासारखे ते होतील.
4 पण मी तुमचा देव परमेश्वर आहे,
ज्याने तुम्हास मिसरातून बाहेर काढले, माझ्याशिवाय तुम्हास अन्य देव नाही,
माझ्याशिवाय कोणी तारक नाही.
5 मी तुम्हास रानात,
रुक्ष प्रदेशात जाणून होतो.
6 जेव्हा तुम्हास चारा मिळाला तेव्हा तुम्ही तृप्त झालात,
आणि जेव्हा तुमचे पोट भरले तेव्हा तुमचे हृदय उन्मत्त झाले;
त्या कारणास्तव तुम्ही मला विसरला.
7 म्हणून मी सिंहासारखा तुमच्याशी वागेन,
चित्याप्रमाणे तुमच्या वाटेवर दबा धरुन बसेन.
8 जिची पिल्ले चोरी झाली,
अशा अस्वली सारखा मी तुमच्यावर हल्ला करीन, मी तुमचे उर फाडीन,
आणि सिंहिनीप्रमाणे तुम्हास खाऊन टाकेन,
जसा वनपशू तुम्हास फाडून टाकतो.
9 इस्राएला हा तुझा नाश आहे जो येत आहे,
कारण तू माझ्या म्हणजे तुझ्या सहाय्यकर्त्यांच्या विरोधात गेला आहेस.
10 तुझा राजा कोठे आहे?
जो तुझ्या सर्व नगरांचे रक्षण करतो
तुझे अधीपती कोठे आहेत? ज्याविषयी तू मला म्हटले,
“मला राजा आणि अधिपती दे?”
11 मी क्रोधाने तुला राजा दिला
आणि रागाने त्यास काढूनही घेतले.
12 एफ्राईमाचा अन्याय गोळा केला आहे,
त्याच्या अपराधाची रास करण्यात आली आहे.
13 प्रसूतिवेदना त्याच्यावर येतील,
पण तो अक्कलशून्य मुलगा आहे,
कारण जन्म घेण्याच्या वेळी तो गर्भातून बाहेर येत नाही.
14 मी त्यांना खरोखर अधोलोकाच्या बळापासून सोडवीन काय?
मी त्यांना खरोखर मरणातून सोडवणार काय?
मरणा, तुझ्या महामाऱ्या कोठे आहेत?
आणि इथे कळवळा माझ्या समोरुन लपलेला आहे.
15 एफ्राईम आपल्या भावांमध्ये जरी प्रगत झाला,
तरी पूर्वेचा वारा येईल,
परमेश्वराचा वारा रानातून येईल
एफ्राईमाचा झरा सुकून जाईल,
त्याच्या विहिरीत पाणी राहणार नाही.
त्यांचा शत्रू त्याच्या सर्व मौल्यवान वस्तू लुटून नेईल.
16 शोमरोनात दोष येईल,
कारण त्याने देवाविरुध्द बंड केले आहे
ते तलवारीने पडतील.
त्यांची लहान मुले आपटली जातील
आणि त्यांच्या गर्भवती स्त्रिया चिरुन टाकण्यात येतील.

<- होशेय 12होशेय 14 ->