Link to home pageLanguagesLink to all Bible versions on this site

1 प्रत्येक यहूदी महायाजकाची निवड लोकांमधून होते आणि लोकांच्या वतीने त्यांच्या पापांसाठी यज्ञ व दाने ही दोन्ही देवाला अर्पावी, त्या कामाकरता महायाजक नेमलेला असतो. 2 जे चुका करतात व जे अज्ञानी आहेत, त्यांच्याशी प्रत्येक मुख्य याजक सौम्यपणे वागू शकतो कारण तो स्वतः दुर्बल असतो. 3 आणि त्या दुर्बलपणामुळे त्याने त्याच्या पापांसाठी तसेच लोकांच्या पापांसाठी अर्पणे केलीच पाहिजेत.

4 आणि कोणीही मुख्य याजकपणाचा बहुमान स्वतःच्या पुढाकाराने घेत नसतो, तर अहरोनाला होते तसे त्यालाही देवाचे पाचारण असणे आवश्यक असते. 5 त्याचप्रमाणे, ख्रिस्ताने महायाजक होण्याचा गौरव स्वतःहून आपणावर घेतले नाही, परंतु देव ख्रिस्ताला म्हणाला,

“तू माझा पुत्र आहेस
आज मी तुला जन्म दिला आहे.”

6 दुसऱ्या शास्त्रभागात तो असे म्हणतो,

“मलकीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे
तू युगानुयुग याजक आहेस.”

7 येशूने आपल्या देहाच्या दिवसात देवाकडे मोठ्याने ओरडून आणि रडून प्रार्थना व विनंत्या केल्या. जो देव त्यास मृत्युपासून वाचवू शकत होता आणि देवाविषयीच्या त्याच्या सदभक्तीमुळे येशूच्या प्रार्थना ऐकण्यात आल्या. 8 जरी तो देवाचा पुत्र होता, तरी त्याने जे दुःख सोसले त्यापासून तो आज्ञाधारकपणा शिकला. 9 आणि नंतर त्यास परिपूर्ण केल्यावर. जे त्याच्या आज्ञा पाळतात त्यांच्यासाठी सार्वकालिक तारणाकर्ता तो झाला 10 व मलकीसदेकाच्या संप्रदायास अनुसरून देवाकडून तो महायाजक म्हणून नियुक्त झाला.

खऱ्या ख्रिस्तशिष्याच्या मार्गाने प्रगती करण्याची आवश्यकता
11 याविषयी सांगण्यासारखे पुष्कळ आहे, पण तुम्हास ते स्पष्ट करणे कठीण आहे कारण तुम्ही ऐकण्यात खूप मंद झाला आहात. 12 आतापर्यंत तुम्ही शिक्षक व्हायला हवे होते, तरी देवाच्या शिक्षणाचे प्राथमिक धडे पुन्हा तुम्हास कोणीतरी शिकविण्याची गरज आहे. तुम्हास दुधाची गरज आहे, जड अन्नाची नाही असे तुम्ही झाला आहात. 13 कारण जो कोणी अजून दुधावरच राहतो तो नीतिमत्त्वाच्या वचनाशी पोक्त नाही कारण अजून तो बाळच आहे. 14 परंतु ज्यांच्या ज्ञानेद्रियांना वहिवाटीने चांगले आणि वाईट पारख करण्याचा सराव झाला आहे अशा प्रौढांसाठी जड अन्न आहे.

<- इब्री लोकांस पत्र 4इब्री लोकांस पत्र 6 ->