Link to home pageLanguagesLink to all Bible versions on this site

हाग्गय
लेखक
हाग्गय 1:1 हाग्गयच्या पुस्तकाचा लेखक हाग्गय याला संदेष्टा म्हणून ओळखते. संदेष्टा हाग्गयने आपले चार संदेश यरूशलेमेच्या यहूदी लोकांना नोंदवले. हाग्गय 2:3 यावरुन सूचित होते, की संदेष्ट्याने मंदिर आणि निर्वासित लोकांचा (बंदिवासांचा) नाश होण्यापूर्वी यरूशलेम पाहिले होते, त्याचा अर्थ असा की तो एक वृद्ध मनुष्य होता ज्याने आपल्या देशाच्या वैभवात मागे वळून पाहिले होते, एका संदेष्ट्याने आपल्या लोकांना प्रेरणेने निर्वासित राखेच्या जागेतून उठण्याची आणि राष्ट्रांना देवाच्या प्रकाशाच्या स्वरूपात त्यांच्या योग्य ठिकाणी पुनरुत्थित करण्याची तीव्र इच्छा व्यक्त केली.
तारीख आणि लिखित स्थान
साधारण इ. पू. 520.
हे बंदीवासानंतरचे पुस्तक आहे, याचा अर्थ असा की ते बाबेलमध्ये बंदिवासानंतर (निर्वासित) लिहिण्यात आले.
प्राप्तकर्ता
यरूशलेममध्ये राहणारे लोक आणि जे लोक इस्त्राएल राष्ट्रातून आले होते त्यांच्यापैकी काही जण होते.
हेतू
बाबेलच्या बंदीवासातून परत आलेल्या उर्वरित युवकांना देशाच्या मुख्य उद्दिष्टांप्रमाणे मंदिर आणि आराधनेची पुनर्बांधणी करण्याचा प्रयत्न करून विश्वासाच्या अभिव्यक्तीसाठी भूमीवर परत येऊन राजीनामा प्राप्त करून देण्यासाठी प्रोत्साहित करणे, त्यांना प्रोत्साहित करणे की देव त्यांना आणि देशाला आशीर्वाद देईल कारण ते मंदिर पुन्हा बांधण्यासाठी प्रवृत्त झाले, त्यांना प्रोत्साहन देणे की त्यांच्या मागील विद्रोहानंतरही देवाकडे त्यांच्यासाठी एक महत्त्वपूर्ण भविष्य आहे.
विषय
मंदिराची पुनर्बांधणी
रूपरेषा
1. मंदिराचे बांधकाम करण्यासाठीचे बोलावणे — 1:1-15
2. परमेश्वरामध्ये धैर्य — 2:1-9
3. आयुष्याच्या स्वच्छतेसाठी बोलावणे — 2:10-19
4. भविष्यकाळातील आत्मविश्वासासाठी बोलावणे — 2:20-23

1
मंदिर उभारण्यासाठी लोकांस आग्रह
1 पारसाचा राजा दारयावेश राजा याच्या कारकिर्दीच्या दुसऱ्या वर्षाच्या, सहाव्या महिन्याच्या, पहिल्या दिवशी, शल्तीएलाचा मुलगा जरुब्बाबेल यहूदाचा राज्यपाल व यहोसादाकचा मुलगा यहोशवा, मुख्य याजक याच्याकडे हाग्गय संदेष्ट्याद्वारे परमेश्वराचे वचन आले, ते असे, 2 सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “हे लोक म्हणतात, की आमची येण्याची अजून वेळ आली नाही, किंवा परमेश्वराचे मंदिर बांधण्याची वेळ अजून आली नाही.”

3 आणि परमेश्वराचे वचन हाग्गय संदेष्ट्याच्या द्वारे आले आणि म्हणाले,

4 “इकडे हे मंदिर ओसाड पडले असता,
तुम्ही आपल्या परिपूर्ण घरात रहावे असा समय आहे काय?
5 आता सेनाधीश परमेश्वर म्हणतोः
तुम्ही आपल्या मार्गाकडे लक्ष द्या!
6 तुम्ही खूप बीज पेरता, पण तुमच्या हाती थोडेच पीक लागते;
तुम्ही खाता पण ते तुम्हास पुरेसे नसते,
तुम्ही पिता पण पिण्याने तुमची तृप्ती होत नाही,
तुम्ही कपडे घालता परंतु त्यांनी ऊब येत नाही,
आणि जो मजुरी मिळवतो तो ती छिद्र पडलेल्या पिशवीत घालण्यासाठी कमवतो.”
7 सेनाधीश परमेश्वर असे म्हणतोः
“आपल्या मार्गाकडे लक्ष द्या!
8 पर्वतावर जा, लाकडे आणा आणि माझे मंदिर बांधा;
मग मी त्यामध्ये आनंद करीन आणि मी गौरविला जाईन,” असे परमेश्वर म्हणतो.
9 “तुम्ही पुष्कळाची वाट पाहिली, परंतु पाहा! तुम्ही थोडके घरी आणले तेव्हा मी त्यावर फुंकर मारली!
हे का? असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो!
कारण माझे घर ओसाड पडले असून प्रत्येक मनुष्य आपआपल्या स्वत:च्या घरात आनंद घेत आहे.
10 यास्तव तुमच्यापासून आकाशाने दहिवराला आवरून धरले आहे व भूमीने आपला उपज रोखून धरला आहे.”
11 “मी भूमीवर आणि पर्वतांवर, धान्यावर नव्या द्राक्षरसावर व तेलावर आणि भूमीच्या पिकावर, मनुष्यावर आणि पशूवर व तुमच्या हातच्या कमाईवर अवर्षणाची आज्ञा दिली आहे.”

12 मग शल्तीएलाचा मुलगा जरुब्बाबेल आणि मुख्य याजक यहोसादाकाचा मुलगा यहोशवा व उरलेले सर्व लोक[a] यांनी, आपला देव परमेश्वर याची वाणी आणि हाग्गय संदेष्ट्याची वचने मानली, कारण आपला देव परमेश्वर ह्याने त्यास पाठवले होते आणि लोक परमेश्वराच्या मुखाचे भय धरू लागले. 13 मग परमेश्वराचा निरोप्या, हाग्गय याने, परमेश्वराचा निरोप लोकांस सांगितला आणि म्हणाला; परमेश्वर असे म्हणतो, “मी तुमच्याबरोबर आहे!”

14 यहूदाचा राज्यपाल शल्तीएलाचा मुलगा जरुब्बाबेल, मुख्य याजक यहोसादाकाचा मुलगा यहोशवा आणि सर्व उरलेल्या लोकांच्या आत्म्याला परमेश्वराने उत्तेजित केले. तेव्हा ते जाऊन आपला देव सेनाधीश परमेश्वर याचे मंदिर बांधण्याच्या कामास लागले. 15 दारयावेश राजाच्या कारकिर्दीच्या दुसऱ्या वर्षीच्या सहाव्या महिन्याच्या चोविसाव्या दिवशी हे झाले.

हाग्गय 2 ->