1 याकोबापासून आपल्याला मुल होत नाहीत हे पाहिल्यावर राहेल आपली बहीण लेआ हिचा मत्सर करू लागली; तेव्हा राहेल याकोबाला म्हणाली, “मला मुल द्या, नाही तर मी मरेन.” 2 याकोबाचा राहेलवर राग भडकला. तो म्हणाला, “ज्याने तुला मुल होण्यापासून रोखून धरले आहे, त्या देवाच्या ठिकाणी मी आहे की काय?” 3 ती म्हणाली, “पाहा, माझी दासी बिल्हा आहे. तुम्ही तिच्या जवळ जा म्हणजे मग ती माझ्या मांडीवर मुलाला जन्म देईल व तिजपासून मलाही मुले मिळतील.” 4 अशा रीतीने तिने त्यास आपली दासी बिल्हा पत्नी म्हणून दिली. आणि याकोबाने तिच्याबरोबर संबंध ठेवला. 5 तेव्हा बिल्हा गरोदर राहिली व याकोबाच्या मुलाला जन्म दिला. 6 मग राहेल म्हणाली, “देवाने माझे ऐकले आहे. त्याने माझा आवाज नक्कीच ऐकला आहे आणि मला मुलगा दिला आहे.” म्हणून तिने त्याचे नाव दान ठेवले. 7 राहेलची दासी बिल्हा पुन्हा गर्भवती झाली व तिने याकोबाच्या दुसऱ्या मुलाला जन्म दिला. 8 राहेल म्हणाली, “मी माझ्या बहिणीशी प्रबळ स्पर्धा करून लढा दिला व विजय मिळवला आहे.” तिने त्याचे नाव नफताली ठेवले. 9 जेव्हा लेआने पाहिले की, आता आपल्याला मुले होण्याचे थांबले आहे. तेव्हा तिने आपली दासी जिल्पा हिला घेतले आणि याकोबाला पत्नी म्हणून दिली. 10 नंतर लेआची दासी जिल्पाने याकोबाच्या मुलाला जन्म दिला. 11 लेआ म्हणाली, “मी सुदैवी आहे.” तेव्हा तिने त्याचे नाव गाद ठेवले. 12 नंतर लेआची दासी जिल्पाने याकोबाच्या दुसऱ्या मुलाला दिला. 13 लेआ म्हणाली, “मी आनंदी आहे! इतर स्त्रिया मला आनंदी म्हणतील” म्हणून तिने त्याचे नाव आशेर ठेवले. 14 गहू कापणीच्या हंगामाच्या दिवसात रऊबेन शेतात गेला आणि त्यास पुत्रदात्रीची फळे [a]सापडली. त्याने ती आपली आई लेआ हिच्याकडे आणून दिली. नंतर राहेल लेआस म्हणाली, “तुझा मुलगा रऊबेन याने आणलेल्या पुत्रदात्रीच्या फळातून मला काही दे.” 15 लेआ तिला म्हणाली, “तू माझ्या नवऱ्याला माझ्यापासून घेतलेस हे काय कमी झाले? आता माझ्या मुलाची पुत्रदात्रीची फळेही तू घेतेस काय?” राहेल म्हणाली, “तुझ्या मुलाची पुत्रदात्रीची फळे मला देशील तर त्याच्या बदल्यात आज रात्री तो तुझ्याबरोबर झोपेल.” 16 संध्याकाळी याकोब शेतावरून आला. तेव्हा लेआ त्यास भेटण्यास बाहेर गेली व ती म्हणाली, “आज रात्री तुम्ही माझ्याबरोबर झोपणार आहात, कारण माझ्या मुलाची पुत्रदात्रीची फळे देऊन मी तुम्हास मोलाने घेतले आहे.” तेव्हा याकोब त्या रात्री लेआपाशी झोपला. 17 तेव्हा देवाने लेआचे ऐकले व ती गर्भवती राहिली आणि तिने याकोबाच्या पाचव्या मुलाला जन्म दिला. 18 लेआ म्हणाली, “देवाने माझे वेतन मला दिले आहे कारण मी माझी दासी माझ्या नवऱ्याला दिली.” तेव्हा तिने आपल्या मुलाचे नाव इस्साखार ठेवले. 19 लेआ पुन्हा गरोदर राहिली व तिने याकोबाच्या सहाव्या मुलाला जन्म दिला. 20 लेआ म्हणाली, “देवाने मला उत्तम देणगी दिली आहे. आता माझा पती माझा आदर करील कारण मी त्याच्या सहा मुलांना जन्म दिला आहे.” तिने त्याचे नाव जबुलून [b]ठेवले. 21 त्यानंतर तिला एक मुलगी झाली. तिने तिचे नाव दीना ठेवले. 22 मग देवाने राहेलीचा विचार केला आणि तिचे ऐकले. त्याने तिची कूस वाहती केली. 23 ती गर्भवती झाली व तिला मुलगा झाला. ती म्हणाली, “देवाने माझा अपमान दूर केला आहे.” 24 तिने त्याचे नाव योसेफ ठेवले. ती म्हणाली, “परमेश्वर देवाने आणखी एक मुलगा मला दिला आहे.”