Link to home pageLanguagesLink to all Bible versions on this site
3
मनुष्याचा स्वीकार देव विश्वासावर करील, नियमशास्त्रावर नव्हे
1 अहो बुद्धीहीन गलतीकरांनो, वधस्तंभावर खिळलेला येशू ख्रिस्त ज्यांच्या डोळ्यांपुढे वर्णन करून ठेवला होता, त्या तुम्हास कोणी भुलविले आहे? 2 मला तुम्हापासून इतकेच समजवून घ्यावयाचे आहे की, तुम्हास जो पवित्र आत्मा मिळाला तो नियमशास्त्रातील कृत्यांनी मिळाला की, सुवार्ता ऐकून विश्वास ठेवल्यामुळे मिळाला? 3 तुम्ही इतके बुद्धीहीन आहात काय? तुम्ही देवाच्या आत्म्याने प्रारंभ केल्यावर आता देहस्वभावाने पूर्णत्व मिळवू पाहत आहात काय? 4 तुम्ही इतके दुःखे सोसली हे व्यर्थ काय? ह्याला व्यर्थ म्हणावे काय! 5 म्हणून जो तुम्हास देवाचा आत्मा पुरवतो आणि तुमच्यात चमत्कार करतो तो हे जे सर्व करतो ते नियमशास्त्रातील कृत्यांनी करतो की, सुवार्ता ऐकून विश्वास ठेवल्यामुळे ते तो करतो?

6 ज्याप्रमाणे अब्राहामानेही देवावर विश्वास ठेवला व ते त्यास नीतिमत्त्व असे गणण्यात आले. तसे हे झाले. 7 ह्यावरून तुम्ही समजून घ्या की, जे विश्वास ठेवतात तेच अब्राहामाचे वंशज आहेत. 8 आणि देव परराष्ट्रीयांना विश्वासाने नीतिमान ठरवणार या पूर्वज्ञानामुळे शास्त्रलेखाने, अब्राहामाला पूर्वीच शुभवर्तमान सांगितले की, ‘तुझ्याकडून सर्व राष्ट्रांना आशीर्वाद मिळेल.’ 9 तर मग जे विश्वास ठेवतात त्यांना विश्वासू अब्राहामाबरोबर आशीर्वाद दिला गेला आहे.

10 कारण नियमशास्त्रातील कृत्यांवर जितके अवलंबून राहणारे आहेत तितके शापाच्या अधीन आहे कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, ‘नियमशास्त्राच्या पुस्तकात जे लिहिलेले आहे ते सर्व पाळण्यास जो टिकून राहत नाही तो शापित आहे.’ 11 नियमशास्त्राने कोणीही देवासमोर नीतिमान ठरत नाही, हे उघड आहे; कारण ‘नीतिमान विश्वासाने जगेल.’ 12 आणि नियमशास्त्र तर विश्वासाचे नाही पण ‘जो त्यातील कृत्ये आचरतो तो त्यांच्यायोगे जगेल.’ 13 आपल्याबद्दल ख्रिस्त शाप झाला आणि त्याने आपणाला नियमशास्त्राच्या शापापासून खंडणी भरून सोडविले; असा शास्त्रलेख आहे ‘जो कोणी झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे’, असा शास्त्रलेख आहे. 14 ह्यात उद्देश हा की, अब्राहामाला दिलेला आशीर्वाद ख्रिस्त येशूच्या द्वारे परराष्ट्रीयांना मिळावा, म्हणजे आपल्या विश्वासाद्वारे आत्म्याविषयीचे अभिवचन मिळावे.

15 आणि बंधूंनो, मी हे व्यावहारिक दृष्टीने बोलतो. एखाद्या मनुष्याचा करारदेखील तो स्थापित केला गेल्यानंतर कोणी रद्द करीत नाही किंवा त्यामध्ये भर घालीत नाही. 16 आता, जी वचने अब्राहामाला व त्याच्या संतानाला दिली होती. तो ‘संतानांना’ असे अनेकाविषयी म्हणत नाही, पण ‘तुझ्या संतानाला’ असे एकाविषयी म्हणतो आणि तो एक ख्रिस्त आहे. 17 आणि, मी हे म्हणतो की, देवाने तो करार आधीच स्थापल्यावर चारशेतीस वर्षांनंतर झालेल्या नियमशास्त्रामुळे संपुष्टात येऊन त्यामुळे अभिवचन रद्द करू होत नाही. 18 कारण वतन जर नियमशास्त्राने प्राप्त होते, तर ते ह्यापुढे अभिवचनाने होणार नाही; परंतु अब्राहामाला देवाने ते कृपेने अभिवचनाद्वारे दिले.

नियमशास्त्राचा हेतू
19 तर मग नियमशास्त्र कशाला? कारण, ज्या संतानास वचन दिले होते त्याचे येणे होईपर्यंत ते उल्लंघनामुळे नियमशास्त्र देण्यात आले; ते मध्यस्थाच्या हाती देवदूतांच्याद्वारे नेमून आले. 20 मध्यस्थ हा एकपेक्षा अधिकांसाठी असतो; तरीही देव तर एकच आहे.

21 तर काय नियमशास्त्र हे देवाच्या वचनाविरुद्ध आहे? कधीच नाही कारण जीवन देण्यास समर्थ असलेले नियमशास्त्र देण्यात आले असते तर, नीतिमत्त्व खरोखरच नियमशास्त्राने प्राप्त झाले असते. 22 तरी त्याऐवजी, नियमशास्त्राने सर्वांस पापामध्ये कोंडून ठेवले, या उद्देशासाठी की, विश्वास ठेवणार्‍यांना येशू ख्रिस्ताच्या विश्वासाने जे अभिवचन आहे ते देण्यात यावे.

23 परंतु ख्रिस्तात विश्वास आला त्यापुर्वी, हा जो विश्वास प्रकट होणार होता, तो येण्याअगोदर आपण बंदिवान असता आपल्याला नियमशास्त्राखाली असे रखवालीत ठेवले होते. 24 ह्यांवरून आपण विश्वासाने नीतिमान ठरविले जावे म्हणून नियमशास्त्र आपल्याला ख्रिस्ताकडे पोहचवणारे बालरक्षक होते. 25 पण आता, विश्वासाचे येणे झाले आहे म्हणून आपण ह्यापुढे बालरक्षकाच्या अधीन राहिलो नाही.

विश्वासाचा परिणाम
26 पण तुम्ही सर्व ख्रिस्त येशूवरील विश्वासाच्याद्वारे देवाचे पुत्र आहात. 27 कारण ख्रिस्तात तुम्हामधील जितक्यांचा बाप्तिस्मा झाला आहे तितक्यांनी ख्रिस्ताला परिधान केले आहे. 28 यहूदी किंवा ग्रीक, दास किंवा स्वतंत्र नाही, पुरूष किंवा स्त्री हा भेदच नाही कारण ख्रिस्त येशूमध्ये तुम्ही सर्वजण एकच आहात. 29 आणि तुम्ही जर ख्रिस्ताचे आहा; तर तुम्ही अब्राहामाचे संतान आणि अभिवचनाप्रमाणे वारीस आहात.

<- पौलाचे गलतीकरांस पत्र 2पौलाचे गलतीकरांस पत्र 4 ->