Link to home pageLanguagesLink to all Bible versions on this site
30
मिसराचा नाश
1 परमेश्वराचे वचन मजकडे आले आणि म्हणाले, 2 “मानवाच्या मुला, भविष्य सांग आणि म्हण. प्रभू परमेश्वर असे म्हणतो, विलाप करा, मोठ्या शोकाचे दिवस येत आहे! 3 तो दिवस नजीक आहे. परमेश्वराचा दिवस जवळ आहे. तो ढगाळ दिवस असेल. ती राष्ट्रांसाठी न्यायाची वेळ असेल. 4 मग मिसराविरूद्ध तलवार येईल आणि जेव्हा मारलेले लोक मिसरात पडतील तेव्हा कूशात वेदना होतील, ते तिची संपत्ती*तिची संपत्ती घेऊन जातील आणि तिचे पाये नष्ट होतील. 5 कूशी, पूटी, लूदी आणि सर्व परदेशी, याजबरोबर करार केलेले लोक त्यासह तलवारीने पडतील. 6 परमेश्वर असे म्हणतो, मग जो कोणी एक मिसराला मदत करील तो पडेल आणि तिच्या सामर्थ्याचा गर्व खाली उतरेल. मिग्दोलापासून सवेनेपर्यंतचे त्याचे सैनिक तलवारीने पडतील. असे प्रभू परमेश्वर म्हणतो. 7 ते जे देश ओसाड झाले आहेत त्यांच्यामध्ये ते घृणास्पद होतील आणि त्यांची नगरे नाश झालेल्या नगरात असतील. 8 जेव्हा मी मिसरामध्ये आग लावीन आणि तिच्या सर्व सहाय्यकांचा नाश करीन. तेव्हा त्यांना समजेल की मी परमेश्वर आहे. 9 त्या दिवशी, सुरक्षित कूशी लोकांस दहशत बसवायला माझ्यापासून दूत जहाजात बसून निघून जातील; आणि त्या दिवशी तेथे मिसरांच्यामध्ये न चुकणाऱ्या वेदना त्यांच्यावर येतील. कारण पाहा! ती येत आहे! 10 प्रभू परमेश्वर असे म्हणतो, मी मिसराचा समुदाय बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सर याच्या हाताने नाहीसा करीन. 11 तो व त्याच्याबरोबर त्याची सेना, राष्ट्राची दहशत, देशाचा नाश करण्यासाठी आणण्यात येईल; ते मिसराविरूद्ध आपल्या तलवारी काढतील व देश मरण पावलेल्या लोकांनी भरुन टाकतील. 12 मी नद्यांना कोरडी भूमी करीन आणि मी देश दुष्ट मनुष्यांच्या हाती विकत देईन. मी, परमेश्वर, सांगतो की परक्यांच्या हातून हा देश व यातले सर्व काही यांची नासधूस करवीन. मी, परमेश्वर, असे सांगत आहे. 13 प्रभू परमेश्वर असे म्हणतोः मी मूर्तींचा नाश करीन आणि मी नोफातून कवडीमोलाच्या मूर्त्त्यां नाहीशा करीन. ह्यापुढे मिसर देशामध्ये कोणीही अधिपती होणार नाही आणि मी मिसर देशावर दहशत ठेवीन. 14 मी पथ्रोसला ओसाड करीन. व सोअनास आग लावीन. मी नो याला न्यायदंड करीन. 15 कारण मी मिसराचा बालेकिल्ला जो सीन त्यावर मी आपल्या क्रोधाग्नीचा वर्षाव करीन. व नोच्या समुदायाला कापून काढीन. 16 मी मिसराला आग लावीन. सीनला खूप वेदना होतील व नो मोडून पडेल. प्रत्येक दिवशी नोफावर शत्रू येतील. 17 आवेन व पी-बेसेथ येथील तरुण पुरुष तलवारीने पडतील आणि त्यांची नगरे बंदिवासात जातील. 18 जेव्हा मी तहपन्हेस येथे मिसराची जोखडे तोडीन तेव्हा त्यादिवशी मी त्यांचा प्रकाश धरून ठेवीन आणि त्यांच्या सामर्थ्याचा गर्व नाहीसा होईल. तिला ढग झाकेल आणि तिच्या मुलींना कैद करून नेले जाईल. 19 अशा रीतीने, मी मिसरावर न्यायादंड आणीन, मग त्यांना समजेल की, मी परमेश्वर आहे.” 20 मग अकराव्या वर्षात, पहिल्या महिन्याच्या सातव्या दिवशी, परमेश्वराचे वचन मजकडे आले आणि म्हणाले, 21 “मानवाच्या मुला, मिसराचा राजा फारो याचा भुज मी मोडला आहे. पाहा! त्याच्या हाताला तलवार धरण्याची शक्ती यावी म्हणून त्यास बरे करण्यासाठी औषधोपचार करून पट्टी लावून त्यास कोणीही बांधले नाही. 22 यास्तव प्रभू परमेश्वर असे म्हणतो, पाहा! मी मिसराचा राजा फारो! याच्याविरूद्ध आहे. मी त्याचे दोन्ही हात एक चांगला असलेला व दुसरा मोडलेला आहे तोही मोडीन. आणि त्याच्या हातातून तलवार गळून पडेल असे मी करीन. 23 मग मी मिसऱ्यांना राष्ट्रांमध्ये विखरुन टाकीन आणि त्यांना देशामध्ये उधळून लावीन. 24 मी बाबेलाच्या राजाचे बाहू बळकट करीन. आणि आपली तलवार त्यांच्या हाती देईन. यासाठी की, मी फारोचे बाहू तोडीन. मग तो बाबेल राजासमोर मरणाऱ्या मनुष्याप्रमाणे कण्हण्यांनी कण्हून ओरडेल. 25 कारण मी बाबेलाच्या राजाचे बाहू बळकट करीन, पण फारोचे बाहू गळून पडतील. जेव्हा मी मिसर देशावर उगारण्यासाठी आपली तलवार बाबेल राजाच्या हातात ठेवीन. मग तो तीने त्यांच्या देशावर हल्ला करील. तेव्हा ते जाणतील की परमेश्वर आहे. 26 म्हणून मी मिसऱ्यांना राष्ट्रांत विखरुन टाकीन आणि त्यांना देशातून पांगविन. मग ते जाणतील की मीच परमेश्वर आहे.”

<- यहेज्केल 29यहेज्केल 31 ->