29
मिसर देशाविषयी भविष्य
1 बाबेलातील बंदिवासाच्या दहाव्या वर्षाच्या दहाव्या महिन्याच्या बाराव्या दिवशी, परमेश्वराचे वचन मजकडे आले आणि म्हणाले, 2 “मानवाच्या मुला, तू आपले मुख मिसराचा राजा फारो याच्याविरूद्ध कर; त्यांच्याविरुद्ध व सर्व मिसराविरूद्ध भविष्यवाणी सांग 3 व म्हण ‘प्रभू परमेश्वर असे म्हणतो, पाहा! मिसराचा राज फारो, मी तुझ्याविरूद्ध आहे. आपल्या नद्यात पडून राहणाऱ्या समुद्रातला मोठा प्राणी, तू मला म्हणतोस, “ही नदी माझी आहे. ही मी आपल्या स्वतःसाठी निर्मिली आहे.” 4 कारण मी तुझ्या जबड्यात गळ घालीन आणि तुझ्या नाईल नदीतील मासे तुझ्या खवल्यांना चिकटतील. मी तुला तुझ्या खवल्यास चिकटलेल्या नद्यांच्या माशांसह नदीतून ओढून बाहेर काढीन. 5 मी तुला आणि तुझ्या नद्यांतली सर्व मासे यांनाही रानात खाली टाकून देईन; तू शेतातल्या उघड्या भूमीवर पडशील; तुला कोणी एकवट करणार नाही किंवा उचलून घेणार नाही. मी तुम्हास भूमीवरच्या पशूंस व आकाशातल्या पक्षांना भक्ष्य असे देईन. 6 मग मिसरमध्ये राहणाऱ्या सर्व लोकांस कळून येईल की मीच परमेश्वर आहे. कारण ते इस्राएलाच्या घराण्याला बोरूची काठी असे झाले आहेत. 7 जेव्हा त्यांनी तुला आपल्या हातांनी धरले तेव्हा तुझे टोकदार तुकडे झाले आणि त्यांच्या खांद्यात घुसला. जेव्हा ते तुझ्यावर टेकले, तू त्यांचे पाय मोडले आणि त्यांच्या कंबरा खचविण्यास लावल्या. 8 म्हणून, परमेश्वर, माझा प्रभू म्हणतो, “मी तुझ्याविरूद्ध तलवार आणिन. मी तुझी सर्व माणसे व सर्व प्राणी नष्ट करीन. 9 मिसर ओसाड होईल. त्याचा नाश होईल. मग त्यांना समजेल की मी परमेश्वर आहे.” कारण तू म्हणालास नदी माझी आहे. मी तिला निर्माण केले. 10 म्हणून पाहा, मी तुझ्याविरूद्ध व तुझ्या नदीच्याविरूद्ध आहे. मग मी मिसर देश उजाड व ओसाड करीन आणि तू मिग्दोलापासून सवेनेपर्यंत व कूशाच्या सीमेपर्यंत टाकाऊ भूमी होशील. 11 मनुष्याचे पाऊल त्यातून जाणार नाही. पशूचा पाय त्यामधून जाणार नाही आणि चाळीस वर्षे कोणीही तेथे राहणार नाही. 12 कारण जे देश ओसाड झाले त्यामध्ये मी मिसर देश ओसाड करून ठेवीन आणि जी नगरे उजाड झाली आहेत त्यांच्यामध्ये त्यातली नगरे चाळीस वर्षे ओसाड राहतील; नंतर मी मिसऱ्यांना राष्ट्रांमध्ये उधळवीन आणि मी त्यांना देशात पांगवीन. 13 कारण प्रभू परमेश्वर असे म्हणतो, चाळीस वर्षाच्या शेवटी ज्या लोकांमध्ये मिसरी विखरले होते त्यातून मी त्यांना एकत्र करीन. 14 मिसरच्या कैद्यांना मी परत आणीन, मी त्यास त्यांच्या जन्मभूमीत पथ्रोस देशात परत आणीन. मग तेथे त्यांचे हलके राज्य होईल. 15 “ते राज्यामध्ये ते हलके राज्य होईल आणि ते कधीच इतर राष्ट्रांपेक्षा वरचढ होणार नाही. मी त्यांना कमी करीन की ते दुसऱ्या राष्ट्रांवर सत्ता गाजविणार नाही. 16 ते यापुढे इस्राएलाच्या घराण्याला विश्वासाचा विषय असे होणार नाहीत. जेव्हा त्यांचे मुख मिसराकडे वळेल तेव्हा त्यांना अन्यायाची आठवण येईल. मग त्यांना समजेल की मीच प्रभू परमेश्वर आहे.” 17 मग बाबेलातील बंदिवासाच्या सत्ताविसाव्या वर्षात, पहिल्या महिन्यात, पहिल्या दिवशी, परमेश्वराचे वचन मजकडे आले व म्हणाले, 18 “मानवाच्या मुला, बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सर याने सोरेस वेढा दिला तेव्हा त्याने आपल्या सैन्याला सोरविरूद्ध कठीण परिश्रम करायला लावले. प्रत्येक डोक्याची हजामत केली होती आणि प्रत्येक खांद्याची सालटी निघाली होती पण त्याने जे कठीण परिश्रम सोरेविरूद्ध केले त्यामुळे त्यास व त्याच्या सैन्याला सोरेतून कधीही काही वेतन मिळाले नाही.” 19 म्हणून प्रभू परमेश्वर असे म्हणतो, “पाहा! मिसर देश मी बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सर यास देईन आणि तो त्यांची संपत्ती घेऊन जाईल, त्यांची मालमत्ता लुटेल व तेथे त्यास जे सापडेल ते घेऊन जाईल. ते त्याच्या सैन्याचे वेतन असे होईल. 20 त्याने माझ्या जी मेहनत केली त्याचे वेतन म्हणून मी त्यास मिसर देश दिला आहे. कारण त्यांनी माझ्यासाठी काम केले आहे.” असे प्रभू परमेश्वर म्हणत आहे. 21 “त्याच दिवशी, मी इस्राएलाच्या घराण्याचे शिंग उगवेल असे करीन आणि त्यांच्यामध्ये तुझे मुख उघडेल असे मी तुला दान देईन. यासाठी की, त्यांना समजेल की, मी परमेश्वर आहे.”
<- यहेज्केल 28यहेज्केल 30 ->