27
सोर नगरीसाठी शोक
1 परमेश्वराचे वचन पुन्हा मजकडे आले आणि म्हणाले, 2 आता तू, मानवाच्या मुला, सोरेविषयी विलाप कर. 3 आणि “सोरेला सांग, प्रभू परमेश्वर असे म्हणतो, तू समुद्राच्या प्रवेशाद्वाराजवळ वसली आहेस, जी तू पुष्कळ द्वीपांतील व्यापारी लोकांसाठी आहेस. सोरे! तू म्हणाली, मी सुंदरतेत परिपूर्ण आहे. 4 तुझ्या सीमा समुद्राच्या हृदयात आहेत; बांधणाऱ्यांनी तुला सौंदर्यांने परिपूर्ण केले आहे. 5 त्यांनी तुझ्या सर्व फळ्या सनीरच्या सरूंनी केल्या आहेत. तुला डोलकाठी करायला त्यांनी लबानोनातून गंधसरु घेतले आहे. 6 त्यांनी तुझी वल्ही बाशानामधील अल्लोनाच्या झाडाची केली. त्यांनी तुझ्या बैठकीच्या फळ्या कित्तीम बेटातल्या बाक्स लाकडाच्या केल्या असून ती हस्तिदंताने जडलेल्या होत्या. 7 तुझे शीड, ते तुला निशाण व्हावे म्हणून मिसर देशाहून आणलेल्या वेलबुट्टीदार बारीक सुताचे होते. ते पडद्याचे कापड एलीशा बेटाहून आणलेले निळ्या व जांभळ्या रंगाच्या कापडाचे तुझे छत होते. 8 जे कोणी सीदोन व अर्वद येथे राहत होते ते तुझ्या नावा वल्हवीत असत. हे सोरे, तुझ्यात सुज्ञ होते. ते तुझे नावाडी होते 9 तुझ्यामध्ये गबालाची वडील व कुशल कारागीर तुझ्या जहाजाची फुटतूट दुरुस्त करत असत. सर्व समुद्रावरची जहाजे व त्यांचे खलाशी तुझ्या व्यापाराच्या व्यवहारासाठी तुझ्याकडे येत असत. 10 पारसी, लूदी व पूटी तुझ्या सैन्यात तुझे लढणारे माणसे होती. ते आपली शिरस्त्राणे आणि ढाली तुझ्यामध्ये टांगीत; ते तुझे वैभव दाखवत. 11 अर्वदची माणसे व हेलेखचे सैनिक सभोवार तुझ्या तटावर असत आणि गम्मादाचे लोक तुझ्या बुरुजांवर असत. ते आपल्या ढाली तुझ्या तटावर चोहोकडे टांगून ठेवीत असत. त्यांनी तुझी सुंदरता पूर्णत्वाला आणली. 12 तार्शीश तुझा ग्राहक होता कारण प्रत्येक प्रकारचा मालमत्तेचा साठा तुझ्याकडे होता. ते तुझ्या मालाच्या बदल्यात रुपे, लोखंड, कथील व शिसे आणून विकायचा माल घेत असत. 13 यावान, तुबाल आणि मेशेख तुझ्याबरोबर मनुष्य जीव व पितळेच्या वस्तू ही देऊन तुझ्याशी व्यापार करीत असत. ते तुझा व्यापारी माल हाताळत होते. 14 तोगार्माचे वंशज तुझ्या मालाबद्दल तुला घोडे, स्वारीचे घोडे व खेचरे देऊन तुझ्याशी व्यापार करीत. 15 ददानी माणसे पुष्कळ किनारपट्टीवर तुझे व्यापारी होते. व्यापारी माल तुझ्या हातात होता. ते तुला हस्तिदंत व टेंबुरणीचे लाकूड भेट म्हणून परत पाठवत होते. 16 तुझ्या पुष्कळ उत्पन्नात अराम तुझा व्यापारी होता. ते तुझ्याबद्दल पाचू, जांभळ्या रंगाचे कापड, सुती तलम कापड, पोवळे आणि माणके तुला पुरवत होते. 17 यहूदा व इस्राएल देश ह्यांचाही तुझ्याबरोबर व्यापार होता. ते तुझ्या मालाबद्दल मिन्नीथाचा गहू, मेवामिठाई, मध, तेल आणि ऊद पुरवत होते. 18 तुझ्या सर्व प्रचंड संपत्तीचा, तुझ्या सर्व मालाचा हेल्बोनाचा द्राक्षरस व पांढरी लोकर यांनी दिमिष्की तुझा व्यापारी होता. 19 दान व यावान उसालपासून तुझ्या मालाबद्दल घडीव लोखंड, दालचिनी, ऊसाचा पुरवठा करीत असत. हा तुझ्यासाठी व्यापार झाला. 20 ददान तुझ्या खोगीराच्या आच्छादनासाठी उत्तम कपड्याचा व्यापारी होता. 21 अरबस्तान व केदारचे सर्व प्रमुख तुझ्याबरोबर व्यापारी होते. ते तुला कोकरे, एडके आणि बोकड यांचा पुरवठा करीत होते. 22 शबा व रामा यांचे व्यापारी तुझे व्यापारी होते. ते तुझ्या मालाबद्दल सर्व प्रकारचे उत्तम मसाले आणि सर्व प्रकारचे मोल्यवान रत्ने व सोने देऊन तुझ्याशी व्यापार करीत होते. 23 हारान, कन्ने व एदेन, शबा, अश्शूर व किल्मद यांचे व्यापारी तुझे व्यापारी होते. 24 ते तुझा माल घेऊन उंची वस्त्रे, जांभळे व वेलबुट्टीचे झगे व उंची वस्त्रांच्या पेट्या व वळलेल्या टिकाऊ दोऱ्या वगैरे व्यापाऱ्याच्या वस्तू ह्यांचा व्यापार करीत होते. 25 तार्शीशची जहाजे तुझा विकलेला माल वाहतुक करणारे तुझे काफले असे होते. म्हणून तू समुद्राच्या हृदयामध्ये मालवाहू जहाजाप्रमाणे खच्चून भरलेली आहेस. 26 तुझ्या वल्हेकऱ्यांनी तुला अफाट समुद्रात नेले. पूर्वेच्या वाऱ्याने तुला भर समुद्रात मोडून टाकले. 27 तुझी संपत्ती, तुझ्या व्यापारी वस्तू व विकत घेतलेल्या वस्तू; तुझे नाविक, खलाशी आणि जहाज बांधणारे; तुझ्या व्यापाराची देवघेव करणारे व तुझ्यामध्ये असलेली सर्व लढाऊ माणसे व तुझ्यामध्ये असलेला सर्व समुदाय तुझ्या नाशाच्या दिवशी भर समुद्रात पडतील. 28 तुझ्या खलाशांच्या आरोळीच्या आवाजाने समुद्राकडील नगरे भीतीने थरथर कापतील. 29 जे कोणी वल्ही हाताळणारे ते सर्व खलाशी व समुद्रावरील प्रत्येक नावाडी आपल्या जहाजावरून उतरून खाली भूमीवर येतील. 30 ते तुला त्यांचा आवाज ऐकवतील आणि अतीखेदाने ओरडतील; ते आपल्या डोक्यांत धूळ घालतील. राखेत लोळतील. 31 ते तुझ्यासाठी डोक्याचे केस कापतील. गोणपाट नेसतील. मनात अति खिन्न होऊन तुजसाठी मोठ्याने विलाप करतील. 32 ते तुझ्यासाठी आक्रोशाने विलाप करून म्हणतील, सोरेसारखी जी समुद्रामध्ये निशब्द झाली आहे, तिच्यासारखी कोणती तरी नगरी आहे काय? 33 तुझ्या व्यापारांच्या वस्तू समुद्रातून जात असत तेव्हा तू पुष्कळांना तृप्त करीत असत; तुझ्या प्रचंड संपत्तीने आणि आपल्या विकण्याचे पदार्थ फार असल्यामुळे तू पृथ्वीवरील राजांना श्रीमंत केलेस. 34 पण जेव्हा तू खोल पाण्याने समुद्राकडून मोडून गेलीस तेव्हा तुझ्या विकण्याचा माल व तुझ्यामधील सर्व समुदायही बुडाले. 35 समुद्रकाठी राहणाऱ्यांना तू घाबरून सोडले आणि त्यांच्या राजांचा दहशतीने थरकाप उडाला आहे. त्यांचे चेहरे कंप पावत आहेत. 36 लोकांतले व्यापारी तुझा तिरस्कार करतात; तू दहशत अशी झाली आहेस आणि तू पुन्हा कधीच असणार नाहीस.”
<- यहेज्केल 26यहेज्केल 28 ->