1 तर मग देवाच्या प्रिय मुलांसारखे अनुकरण करणारे व्हा, 2 आणि ख्रिस्तानेही जशी आपल्यावर प्रीती केली आणि देवाला संतुष्ट करणारा सुवास मिळावा म्हणून, आपल्यासाठी ‘अर्पण व बलिदान’ असे स्वतःला दिले, तसे तुम्ही प्रीतीत चाला.
3 जारकर्म, कोणत्याही प्रकारची अशुद्धता किंवा अधाशीपणा याचे तुमच्यामध्ये नाव व विचार येऊ नये, हे पवित्र जनासांठी योग्य नाही. 4 तसेच कोणतेही लाजिरवाणे भाषण, मूर्खपणाचे बोलणे किंवा घाणेरडे विनोद तुमच्यात असू नयेत. ते योग्य नाही. परंतु त्याऐवजी उपकारस्तुती असावी. 5 कारण तुम्ही हे समजा की, जो कोणी मनुष्य जारकर्मी, अशुद्ध किंवा लोभी म्हणजे मूर्तीपुजक आहे त्यास ख्रिस्ताच्या व देवाच्या राज्यात वतन नाही.
6 पोकळ भाषणाने कोणी तुम्हास फसवू नये कारण या कारणामुळे आज्ञा मोडणाऱ्या मुलांवर देवाचा क्रोध येणार आहे. 7 म्हणून त्यांचे भागीदार होऊ नका. 8 कारण एकेकाळी तुम्ही पूर्णपणे अंधारात होता पण आता तुम्ही प्रभूच्या प्रकाशात आहात. तर आता प्रकाशात चालणाऱ्या लेकरांसारखे व्हा. 9 कारण प्रकाशाची फळे चांगुलपणा, नीतिमत्त्व आणि सत्यात दिसून येतात. 10 प्रभूला कशाने संतोष होईल हे पारखून घ्या. 11 आणि अंधाराची जी निष्फळ कार्ये आहेत त्याचे भागीदार होऊ नका. त्याऐवजी, ती उघडकीस आणा. 12 कारण ज्या गुप्त गोष्टी त्यांनी केल्या आहेत, त्याविषयीचे वर्णन करणेदेखील लज्जास्पद आहे.
13 सर्वकाही प्रकाशाद्वारे उघड होते. 14 कारण त्या सर्वावर तो प्रकाश चमकतो म्हणून असे म्हणले आहे
15 म्हणून, तुम्ही कसे जगता, याविषयी काळजीपूर्वक असा. मूर्ख लोकांसारखे होऊ नका, तर शहाण्या लोकांसारखे व्हा. 16 वेळेचा चांगला उपयोग करा कारण ज्या दिवसात तुम्ही राहत आहात ते वाईट आहेत. 17 म्हणून मूर्खासारखे वागू नका, तर उलट परमेश्वराची इच्छा काय आहे ते समजून घ्या. 18 आणि द्राक्षरस पिऊन झिंगल्यासारखे राहू नका; त्यामुळे तो नाशाकडे जातो, परंतु उलट पवित्र आत्म्याने पूर्णपणे भरले जा, 19 सर्व प्रकारची स्तोत्रे, गीते आणि आत्मिक गीतांनी त्याची स्तुती करा. एकमेकाबरोबर सुसंवाद साधा, गीत गा आणि आपल्या अंतःकरणाने परमेश्वराची स्तुती करा. 20 आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात देव जो आपला पिता आहे त्याचे सर्व गोष्टीबद्दल नेहमी उपकार माना. 21 ख्रिस्ताच्या भयात राहून एकमेकांचा आदर करून स्वतःला नम्रपणे त्याच्या अधीन करा.