Link to home pageLanguagesLink to all Bible versions on this site
5
अविचाराने बोलणे धोक्याचे
1 जेव्हा तू देवाच्या मंदिरी जातोस तेव्हा आपल्या वागणूकीकडे लक्ष दे. तेथे ऐकण्यास जा. ऐकणे हे मूर्खाच्या यज्ञापेक्षा चांगले आहे. जीवनात ते वाईट करतात हे ते जाणत नाही.
2 तुझ्या मुखाने बोलण्याची घाई करू नको,
आणि देवासमोर कोणतीही गोष्ट उच्चारायला तुझे मन उतावळे करू नको.
देव स्वर्गात आहे पण तू तर पृथ्वीवर आहेस.
म्हणून तुझे शब्द मोजकेच असावे.
3 जर तुम्हास पुष्कळ गोष्टी करायच्या आहेत तर तुम्ही त्याबद्दल काळजी करता, तुम्हास बहुतकरून वाईट स्वप्ने पडतात.
आणि तुम्ही पुष्कळ शब्द बोलता, संभाव्यता अधिक मूर्ख गोष्टी बोलत जाता.

4 जर तू देवाला नवस केला असेल तर तो फेडायला वेळ लावू नको. देव मूर्खांबद्दल आनंदी नसतो. जो नवस तू केला असेल त्याची फेड कर. 5 काहीतरी नवस करून त्याची पूर्तता न करण्यापेक्षा कसलाच नवस न करणे हे चांगले आहे.

6 आपल्या मुखामुळे आपल्या शरीराला शासन होऊ देऊ नको. याजकांच्या दूताला असे म्हणू नकोस, तो नवस माझी चूक होती. तुझ्या चुकीच्या नवसामुळे देवाने तुझ्यावर का कोपित व्हावे, देवाला कोपवून तुझ्या हातचे काम का नष्ट करावे? 7 कारण पुष्कळ स्वप्नात, पुष्कळ शब्दात, अर्थहीन वाफ असते. तर तू देवाचे भय धर.

जीवनाची व्यर्थता
8 जेव्हा काही प्रांतात गरीब लोकांवर जुलूम होत आहे आणि न्याय व योग्य वागवणूक त्यांना मिळत नाही तर आश्चर्य वाटून घेऊ नका. कारण वरीष्ठ मनुष्यावर त्याहूनही वरिष्ठांची नजर असते. 9 आणखी, पृथ्वीचे फळ प्रत्येकजणासाठी आहे आणि राजा स्वतः शेतातील उत्पन्न घेतो.
10 जो रुप्यावर प्रेम करतो तो रुप्याने समाधानी होत नाही.
आणि जो संपत्तीवर प्रेम करतो त्यास नेहमीच अधिक हाव असते.
हे सुद्धा व्यर्थ आहे.
11 जशी समृद्धी वाढते, तर तिचे खाणारेही वाढतात.
आपल्या डोळ्यांनी पाहण्याशिवाय
तेथे मालकाला संपत्तीत काय लाभ आहे?
12 काम करणाऱ्या मनुष्याची झोप गोड असते,
तो थोडे खावो किंवा अधिक खावो,
पण श्रीमंत मनुष्याची संपत्ती त्यास चांगली झोप येऊ देत नाही.
13 जे मी भूतलावर पाहिले असे एक मोठे अरिष्ट आहे,
ते म्हणजे धन्याने आपल्या अहितास आपले राखून ठेवलेले धन होय.
14 जेव्हा श्रीमंत मनुष्य आपले धन अनिष्ट प्रसंगामुळे गमावतो,
त्यामुळे त्याच्या स्वतःच्या मुलाला, ज्याला त्याने वाढवले आहे, त्यास द्यायला त्याच्या हातात काहीही राहत नाही.
15 जसा मनुष्य आपल्या आईच्या उदरातून नग्न जन्मला,
जसा तो आला तसाच, तो नग्न परत जाईल.
आपल्या कामापासून आपल्या हातात काहीही घेऊन जाऊ शकत नाही. 16 दुसरे एक मोठे अरिष्टच आहे
तो जसा आला तसाच सर्वतोपरी परत जाईल,
म्हणून जो कोणी वायफळ काम करतो त्यास काय लाभ मिळतो?
17 तो त्याच्या आयुष्यभर अंधारात अन्न खातो
आणि खिन्नतेने शेवटी तो आजारी आणि रागीट बनतो.

18 मी पाहिले आहे ते पाहा; मनुष्याने खावे, प्यावे आणि देवाने त्याचे जे आयुष्य त्यास दिले आहे त्यातील सर्व दिवस तो ज्या उद्योगात भूतलावर श्रम करतो त्यामध्ये सुख भोगावे हे चांगले आणि मनोरम आहे, हे मनुष्यास नेमून दिलेले काम आहे. 19 जर देवाने एखाद्याला संपत्ती, मालमत्ता आणि या गोष्टींचा उपभोग घेण्याची शक्ती दिली असेल तर त्याने त्याचा उपभोग घेतला पाहिजे. त्याच्याकडे ज्या गोष्टी आहेत त्यांचा स्विकार त्याने केला पाहिजे, आणि त्याचे कामही आनंदाने केले पाहिजे. ती देवाने दिलेली भेट आहे. 20 मनुष्यास जगण्यासाठी खूप वर्षे नसतात. म्हणून त्याने आयुष्यभर या सगळ्या गोष्टींची आठवण ठेवली पाहिजे. देव त्यास त्याचे आवडते काम करण्यात गुंतवून ठेवील.

<- उपदेशक 4उपदेशक 6 ->