Link to home pageLanguagesLink to all Bible versions on this site
8
उत्तम प्रदेशाची प्राप्ती
1 आज मी दिलेल्या सर्व आज्ञांचे पालन करा. कारण त्याने तुम्ही जगाल, आणि बहुगुणित व्हाल व तुमच्या पूर्वजांना परमेश्वराने कबूल केलेल्या प्रदेशात प्रवेश करून तो तुम्ही ताब्यात घ्याल. 2 तसेच गेली चाळीस वर्षे आपल्या परमेश्वर देवाने तुम्हास रानावनातून कसे चालवले, त्या प्रवासाची आठवण ठेवा. परमेश्वर तुमची परीक्षा पाहत होता. तुम्हास नम्र करावे, तुमच्या अंत:करणातील गोष्टी जाणून घ्याव्या, तुम्ही त्याच्या आज्ञा पाळता की नाही ते बघावे म्हणून त्याने हे केले. 3 परमेश्वराने तुम्हास लीन केले, तुमची उपासमार होऊ दिली आणि मग, तुम्ही व तुमचे पूर्वज यांना माहीत नसलेला मान्ना तुम्हास खाऊ घातला. मनुष्य फक्त भाकरीवर जगत नाही, तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या हर एक वचनाने जगतो हे तुम्हास कळावे, म्हणून त्याने हे सर्व केले. 4 गेल्या चाळीस वर्षात तुमचे कपडे जीर्ण झाले नाहीत की तुमचे पाय सुजले नाहीत. का बरे? कारण परमेश्वराने तुमचे रक्षण केले. 5 तुमचा देव परमेश्वर ह्याने तुमच्यासाठी या सर्व गोष्टी केल्या आहेत ह्याची आठवण तुम्ही ठेवलीच पाहिजे. बाप आपल्या मुलाला शिकवतो, त्याच्यावर संस्कार करतो तसा तुमचा देव परमेश्वर तुम्हास आहे. 6 तुमचा देव परमेश्वर ह्याच्या आज्ञा पाळा, त्यास अनुसरा आणि त्याच्याबद्दल भय धरून आदर बाळगा. 7 तुमचा देव परमेश्वर तुम्हास उत्तम देशात घेऊन जात आहे. ती भूमी सुजला, सुफला आहे. तेथे डोंगरात उगम पावून जमिनीवर वाहणारे नद्या-नाले आहेत. 8 ही जमीन गहू, जव, द्राक्षमळे, अंजीर, डाळिंब यांनी समृद्ध आहे. येथे जैतून तेल, मध यांची रेलचेल आहे. 9 येथे मुबलक धान्य आहे. कोणत्याही गोष्टीची तुम्हास उणीव नाही. येथील दगड लोहयुक्त आहेत. तुम्हास डोंगरातील तांबे खोदून काढता येईल. 10 तेव्हा तुम्ही खाऊन तृप्त व्हावे आणि असा चांगला प्रदेश दिल्याबद्दल तुमचा देव परमेश्वर ह्याचे गुणगान गावे.
परमेश्वरास विसरून जाण्याविरुद्ध ताकीद
11 सावध असा! तुमचा देव परमेश्वर याचा विसर पडू देऊ नका! मी दिलेल्या आज्ञा नियम, विधी, यांचे कटाक्षाने पालन करा. 12 त्यामुळे तुम्हास अन्नधान्याची कमतरता पडणार नाही. तुम्ही चांगली घरे बांधून त्यामध्ये रहाल. 13 तुमची गुरेढोरे आणि शेळ्यामेंढ्या यांची संख्या वाढेल. सोनेरुपे आणि मालमत्ता वाढेल. 14 या भरभराटीने उन्मत्त होऊ नका. आपला देव परमेश्वर याला विसरु नका. मिसरमध्ये तुम्ही गुलाम होता. परंतु मिसरमधून परमेश्वराने तुमची सुटका केली व बाहेर आणले. 15 विषारी नाग आणि विंचू असलेल्या निर्जल, रखरखीत अशा भयंकर रानातून त्याने तुम्हास आणले. त्याने तुमच्यासाठी खडकातून पाणी काढले. 16 तुमच्या पूर्वजांनी कधीही न पाहिलेला मान्ना तुम्हास खायला घालून पोषण केले. परमेश्वराने तुमची परीक्षा पाहिली. शेवटी तुमचे भले व्हावे म्हणून परमेश्वराने तुम्हास नम्र केले. 17 हे धन मी माझ्या बळावर आणि कुवतीवर मिळवले असे चुकूनसुद्धा मनात आणू नका. 18 तुमचा देव परमेश्वर याचे स्मरण ठेवा. त्यानेच तुम्हास हे सामर्थ्य दिले हे लक्षात ठेवा. त्याने तरी हे का केले? कारण आजच्याप्रमाणेच त्याने तुमच्या पूर्वजांशी पवित्र करार केला होता, तोच तो पाळत आहे. 19 तेव्हा आपला देव परमेश्वर ह्याला विसरु नका. इतर दैवतांना अनुसरू नका. त्यांची पूजी किंवा सेवा करु नका. तसे केलेत तर तुमचा नाश ठरलेलाच आहे, ही ताकीद मी आताच तुम्हास देऊन ठेवतो. 20 ज्या राष्ट्रांचा नाश परमेश्वर तुमच्यासमोर करणार आहे त्यांच्याप्रमाणेच तुम्हीही नाश पावाल, कारण तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याची वाणी ऐकली नाही.

<- अनुवाद 7अनुवाद 9 ->