21
अज्ञात रक्तपातासंबंधी नियम
1 तुमचा देव परमेश्वर तुम्हास देणार असलेल्या प्रदेशात एखाद्याचा उघड्यावर खून झालेला आढळला आणि त्यास कोणी मारले हे कळाले नाही 2 तर तुमच्यापैकी वडीलधारे आणि न्यायाधीश यांनी पुढे येऊन मृतदेहापासून सभोवर पसरलेल्या गावांचे अंतर मोजावे. 3 मग जो गाव प्रेताच्या सर्वात जवळचा असेल तेथील वडिलधाऱ्यांनी आपल्या कळपातील एक कालवड निवडावी. कधीही कामाला न जुंपलेली व अजून न व्यायलेली अशी ती गाय असावी. 4 मग वडीलधाऱ्याने कालवड वाहता झरा असलेल्या खोऱ्यांत आणावी. हे खोरे कधी पेरणी, नांगरणी न झालेले असावे. अशा ठिकाणी तीची मान कापावी. 5 तेव्हा लेवी वंशातील याजकांनी यावेळी तिथे असावे. आपली सेवा करून घ्यायला आणि आपल्या वतीने लोकांस आशीर्वाद द्यायला तुमचा देव परमेश्वर ह्याने त्यांची याजक म्हणून निवड केली आहे. प्रत्येक वादात किंवा मारामारीत ते निवाडा करतील. 6 मग त्या खोऱ्यात, मृताच्या जवळच्या नगरातील वडील मनुष्यांनी, कालवड मारल्यावर तिच्यावर आपले हात धुवावे. 7 व स्पष्ट म्हणावे या व्यक्तीला “आमच्या हातून मरण आले नाही. ही घटना घडताना आम्ही पाहिली नाही. 8 हे परमेश्वरा, ज्या इस्राएल लोकांचा तू उद्धार केला आहेस. आम्हास शुद्ध कर. एका निरपराध व्यक्तीच्या हत्त्येबद्दल आम्हास दोषी धरु नकोस. त्या निरपराध व्यक्तीच्या हत्येचा दोष राहू देऊ नको. या रक्तपाताच्या दोषाची त्यांना क्षमा केली जावो.” 9 याप्रमाणे परमेश्वराच्या दृष्टीने जे योग्य ते करून तुम्ही आपल्यामधून या निरअपराध मनुष्याच्या हत्येचा दोष तू काढून टाकावा.
युद्धकैदी स्त्रियांशी ठेवायची वर्तणूक
10 जेव्हा तू आपल्या शत्रूशी युद्ध करायला जाशील व देव परमेश्वर ह्याच्या साहाय्याने तुम्ही शत्रूला पराभूत कराल व त्यांना बंदीवान कराल. 11 तेव्हा बंदिवानात एखादी सुंदर स्त्री पाहून तिच्यावर तू मोहीत झालास आणि लग्न करावे असे एखाद्याला वाटल्यास. 12 तेव्हा त्याने तिला आपल्या घरी आणावे. तिने आपले केशवपन करावे व नखे कापावी. 13 तिचे पहिले, युद्धकैदीचे द्योतक असलेले वस्त्रही काढून टाकावे. आपल्या आईवडीलांपासून दुरावल्याबद्दल तिने पूर्ण महिनाभर त्याच्या घरी शोक करावा. मग त्याने तिच्याजवळ जावे. म्हणजे तो तिचा पती व ती त्याची पत्नी होईल. 14 पुढे त्यास ती आवडली नाहीतर त्याने घटस्फोट देऊन तिला मुक्त करावे. पण तिला पैसे देऊन विकू नये. तिला गुलाम म्हणून त्याने वागवता कामा नये. कारण त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवला होता.
प्रथमजन्मलेल्या अपत्याविषयी नियम
15 एखाद्याला दोन स्त्रिया असतील आणि त्याचे एकीवर दुसरीपेक्षा जास्त प्रेम असेल. दोघींना मुले असतील. पण नावडतीचा मुलगा सगळ्यात मोठा असेल. 16 तर तो आपल्या मुलांना आपली संपत्ती त्याचे वतन म्हणून वाटून देईल तेव्हा नाआवडतीचा मुलगा ज्येष्ठ असताना त्याऐवजी आपल्या मालमत्तेची वाटणी करताना, त्याने आपल्या आवडतीच्या मुलाला जेष्ठत्वाचा हक्क देऊ नये. 17 त्याने आपल्या ज्येष्ठ पुत्र नावडतीचा मुलगा असला तरी त्याचा स्वीकार केला पाहिजे. तसेच आपल्या एकंदर मालमत्तेतील दुप्पट वाटा त्यास दिला पाहिजे. कारण तो ज्येष्ठ पुत्र आहे. व त्यालाच जेष्ठपणाचा हक्क आहे.
बंडखोर मुलगा
18 एखाद्याचा मुलगा हट्टी व बंडखोर, अजिबात न ऐकणारा, आईबापांना न जुमानणारा असेल शिक्षा केली तरी त्यांचे ऐकत नसेल. 19 अशावेळी आईवडीलांनी त्यास गावच्या चावडीवर वडीलधाऱ्यांपुढे न्यावे. 20 या शहरातल्या वडीलधाऱ्यानी त्यांनी सांगावे की, हा उद्दाम व बंडखोर आहे. तसेच तो खादाड व मद्यपी आहे. 21 यावर त्या गावातील मनुष्यांनी या मुलाला दगडांनी मरेपर्यंत मारावे. असे केल्याने तुम्ही हे पाप आपल्यामधून काढून टाकाल. इस्राएलमधील इतर लोकांच्या कानावर ही गोष्ट गेली की ते घाबरुन राहतील.
निरनिराळे नियम
22 एखाद्याचा अपराध मुत्युदंड मिळण्याइतका मोठा असेल, अशावेळी त्याच्या देहांतानंतर लोक त्याचे प्रेत झाडाला टांगतील, 23 तेव्हा ते रात्रभर झाडावर टांगलेले राहू देऊ नका. त्याच दिवशी कटाक्षाने त्याचे दफन करा. कारण झाडाला टांगलेल्या मनुष्यावर देवाचा शाप असतो. तुमचा देव परमेश्वर तुम्हास देणार असलेली भूमी अशी विटाळू नका.
<- अनुवाद 20अनुवाद 22 ->