Link to home pageLanguagesLink to all Bible versions on this site
19
शरणपुरे, प्राचीन चतु: सीमा
गण. 35:9-28; यहो. 20:1-9

1 तुझा देव परमेश्वर ज्या राष्ट्रांची भूमी तुला देत आहे, त्या राष्ट्रांना नष्ट केल्यावर त्यांच्या प्रदेशाचा तू ताबा घेतल्यानंतर, त्यांच्या जागी त्यांची नगरे आणि घरे तुम्ही ताब्यात घ्याल, 2 तेव्हा तुझा देव परमेश्वर जो देश तुला देत आहे त्यामध्ये तीन नगरे तुम्ही राखून ठेवा. 3 म्हणजे कोणाच्या हातून मनुष्यवध झाल्यास त्यास तेथे पळून जाता यावे म्हणून रस्ते तयार कर, आणि जो प्रदेश तुझा देव परमेश्वर तुला देत आहे त्या देशाचे तू तीन भाग कर. 4 मनुष्यवध करून या तीनपैकी एका नगरात आश्रयाला येणाऱ्याबद्दल नियम असा: पूर्वीचे वैर नसताना जर कोणी चुकून आपल्या शेजाऱ्याला ठार मारले तर त्याने येथे जावे. 5 उदाहरणार्थ, एखादा मनुष्य लाकडे तोडायला त्याच्या शेजाऱ्याबरोबर जंगलात गेला. तेथे झाडावर कुऱ्हाड चालवत असताना चूकून कुऱ्हाडीचे पाते दांड्यापासून निसटले आणि ते नक्की दुसऱ्यावर पडून तो मेला. अशावेळी कुऱ्हाड चालवणाऱ्याने यापैकी एखाद्या नगराच्या आश्रयाला जाऊन आपले प्राण वाचवावे. 6 हे नगर फार दूर असेल तर त्यास तेथपर्यंत पोचता येणार नाही. मृताचा जवळचा नातेवाईक त्याचा पाठलाग करील व त्यास त्या नगरात पोचण्यापूर्वीच गाठेल. आणि रागाच्या भरात त्याचा वध करील. खरे पाहता त्या मनुष्याच्या हातून वैर नसताना मनुष्य हत्या झाली होती तेव्हा तो प्राणदंडाला पात्र नव्हता. 7 म्हणून मी तुला ही आज्ञा करतो अशी तीन नगरे स्वत:साठी राखून ठेव. 8 तुमच्या प्रदेशाचा विस्तार करण्याचे तुमचा देव परमेश्वर ह्याने तुमच्या वशंजाना शपथ दिल्याप्रमाणे, त्यांना वचन दिलेला सर्व प्रदेश तो तुम्हास देईल. 9 तुमचा देव परमेश्वर ह्याजवर प्रीती करा व त्याने दाखवलेल्या मार्गात नियमीत चालत जा. मी दिलेल्या या आज्ञा तुम्ही पूर्णपणे पाळल्यात तर मग परमेश्वराने तुमच्या प्रदेशाचा विस्तार केला की तुम्ही पहिल्या तीन नगरांच्या भरीला आश्रयासाठी आणखी तीन नगरे निवडा. 10 म्हणजे तुमचा देव परमेश्वर तुम्हास देणार असलेल्या भूमीवर निर्दोष मनुष्यांचा रक्तपात होणार नाही आणि अशा हत्येचे दोष तुम्हास लागणार नाही. 11 पण द्वेषापोटीही एखादा मनुष्य संधीची वाट पाहत लपूनछपून दुसऱ्याच्या जिवावर उठेल, त्याच्यावर प्राणघातक हल्ला करून या नगरात पळून गेला. 12 अशावेळी त्याच्या नगरातील वडिलधाऱ्यांनी माणसे पाठवून त्यास तेथून बाहेर काढावे व मृताच्या नातेवाईकांच्या हवाली करावे. म्हणजे त्यास मृत्यूची शिक्षा झाली पाहिजे. 13 त्या मनुष्यावर दया दाखवू नका परंतु निरपराध मनुष्याच्या हत्येचा दोष इस्राएलातून पुसून टाक म्हणजे तुझे कल्याण होईल. 14 शेजाऱ्याच्या जमिनीची सीमा खूण काढू नको. पूर्वीच्या लोकांनी त्या सीमा आखलेल्या आहेत. हे तुमचा देव परमेश्वर ह्याने तुमच्या वाट्याला जेवढे वतन दिले त्याच्या या खूणा आहेत.

साक्षीदारांसंबंधी नियम
15 एखाद्याने काही गुन्हा किंवा अपराध केला तर, अपराधाचा आरोप कोणावर असेल तर त्यास दोषी ठरवायला एक साक्षीदार पुरेसा नाही. त्याने खरेच गुन्हा केला आहे हे ठरवायला दोन किंवा तीन साक्षीदार तरी हवेतच. 16 अमक्याच्या हातून अपराध घडला आहे असे एखादा साक्षीदार द्वेषबुद्धीने, मुद्दाम खोटे सांगू शकतो. 17 अशावेळी त्या दोघांना परमेश्वरासमोर म्हणजे तेथे जे याजक व न्यायाधीश त्यावेळी असतील त्यांच्यापुढे उभे करावे. 18 मग न्यायाधीशांनी त्याबाबत कसून चौकशी केली पाहिजे. त्यातून साक्षीदाराचा आपल्या बंधुविरोधात खोटारडेपणा उघडकीला आला, 19 तर मग तुम्ही त्यास तीच शिक्षा करावी जी त्यास आपल्या बंधूला जे शासन व्हावे असे वाटत होते. अशा रीतीने आपल्यामधून नीच वृत्तीचा नायनाट करा 20 हे ऐकून इतरांना भीती वाटेल आणि तेथून पुढे तुमच्यामध्ये असे वाईट घडणार नाही. 21 तू दया दाखवू नये. कोणी कोणाचा जीव घेतल्यास त्यालाही देहान्ताचे शासन द्यावे. डोळ्याबद्दल डोळा, दाताबद्दल दात, हाताच्या बदल्यात हात आणि पायाच्या बदल्यात पाय असा दंड करावा.

<- अनुवाद 18अनुवाद 20 ->