1 तेव्हा हुबेहूब पहिल्यासारख्या दोन सपाट दगडी पाट्या परमेश्वराने मला घडवायला सांगितल्या. “त्या घेऊन माझ्याकडे डोंगरावर ये आणि एक लाकडाचा कोशही कर असे सांगितले. 2 तो पुढे म्हणाला, तू फोडून टाकलेल्या पाट्यांवर होता तोच मजकूर मी या पाट्यांवर लिहीन मग तू या नवीन पाट्या कोशात ठेव.” 3 मग मी बाभळीच्या लाकडाची एक कोश बनवला. पहिल्यासारख्याच दोन दगडी पाट्या केल्या आणि डोंगरावर गेलो. पाट्या माझ्या हातातच होत्या. 4 मग, डोंगरावर सर्व जमले होते तेव्हा ज्या दहा आज्ञा परमेश्वराने अग्नीतून तुम्हास दिल्या त्याच त्याने पहिल्या लेखाप्रमाणे या पाट्यांवर लिहिल्या आणि त्या माझ्या स्वाधीन केल्या. 5 मी डोंगर उतरुन खाली आलो. त्या पाट्या मी केलेल्या कोशात ठेवल्या. त्या तशा ठेवायला मला परमेश्वराने सांगितले होते. आणि अजूनही त्या तिथे आहेत. 6 इस्राएल लोक प्रवास करत बनेयाकान विहिरीवरुन मोसेरोथला आले. तेथे अहरोन मरण पावला. त्यास तेथेच दफन केले. त्याच्या जागी त्याचा मुलगा एलाजार याजकाचे काम करु लागला. 7 इस्राएल लोक मग मोसेराहून गुदगोदा येथे आणि तेथून पुढे याटबाथा या नद्यांच्या प्रदेशात आले. 8 त्यावेळी परमेश्वराने एका खास कामगिरीसाठी लेवीचा वंश इतरांपेक्षा वेगळा केला. परमेश्वराच्या आज्ञापटाचा तो कोश वाहून नेण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. याजक म्हणून परमेश्वराची सेवा करणे, परमेश्वराच्या वतीने लोकांस आशीर्वाद देणे ही त्यांची कामे होती. ती ते अजूनही करतात. 9 त्यामुळेच लेवींना इतरांसारखा जमिनीत व वतनात वाटा मिळाला नाही. परमेश्वर देवाने कबूल केल्याप्रमाणे परमेश्वरच त्यांचे वतन आहे. 10 मी पहिल्या वेळेप्रमाणेच चाळीस दिवस आणि रात्र डोंगरावर राहिलो. यावेळी परमेश्वराने माझे ऐकले व तुमचा नाश न करायचे ठरविले. 11 तेव्हा परमेश्वराने मला सांगितले, “ऊठ आणि लोकांस पुढच्या प्रवासास घेऊन जा. म्हणजे मी त्यांच्या पूर्वजांना जो प्रदेश द्यायचे वचन दिले तेथे ते जाऊन राहतील.”