18 जेव्हा ते आले, तेव्हा तो त्यांना म्हणाला, आशियात आलो त्या दिवसापासून मी तुमच्या सोबत असताना कसा राहिलो हे तुम्हास माहीत आहे. 19 मी प्रभूची सेवा पूर्ण नम्रतेने व रडून केली, यहूदी लोकांनी केलेल्या कटामुळे निर्माण झालेल्या उपद्रवांना तोंड देत मी त्याची सेवा केली. 20 जे काही तुमच्या चांगल्यासाठी होते ते तुम्हास सांगण्यासाठी कोणतीही कसर ठेवली नाही, हे तुम्हास माहीत आहे आणि या गोष्टी जाहीरपणे व घराघरातून सांगण्यासाठी मी कधीही मागेपुढे पाहिले नाही. 21 पश्चात्ताप करून देवाकडे वळण्याविषयी आणि आपल्या प्रभू येशूवरील विश्वासाविषयी यहूदी व ग्रीक लोकांस सारखीच साक्ष दिली. 22 आणि आता आत्म्याच्या आज्ञेने यरूशलेम शहरास चाललो आहे आणि तेथे माझ्याबाबतीत काय घडेल हे माहीत नाही. 23 मला फक्त एकच गोष्ट माहीत आहे की प्रत्येक शहरात पवित्र आत्मा मला सावध करतो, तुरुंगवास व संकटे माझी वाट पाहत आहेत हे तो मला सांगतो. 24 मी माझ्या जीवनाविषयी काळजी करीत नाही, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी माझे काम पूर्ण करणे, प्रभू येशूने जे काम मला दिले ते मला पूर्ण करायला पाहिजे ते काम म्हणजे देवाच्या कृपेबद्दल ची सुवार्ता लोकांस सांगितली पाहिजे. 25 राज्याची घोषणा करीत ज्या लोकात मी फिरलो त्या तुम्हातील कोणालाही मी पुन्हा कधीही दिसणार नाही हे आता मला माहीत आहे. 26 म्हणून मी तुम्हास जाहीरपणे सांगतो की, सर्वांच्या रक्तासंबंधाने मी निर्दोष असा आहे. 27 देवाची संपूर्ण इच्छा काय आहे हे प्रकट करण्यास मी कधीही मागेपुढे पाहिलेले नाही. 28 तुमची स्वतःची व देवाच्या सर्व लोकांची, ज्याना देवाने तुम्हास दिलेले आहे, त्यांची काळजी घ्या, कळपाची [a]काळजी घेण्याचे काम पवित्र आत्म्याने तुम्हास दिलेले आहे, तुम्ही मंडळीसाठी मेंढपाळासारखे असले पाहिजे, ही मंडळी देवाने स्वतःचे रक्त देऊन विकत घेतली. 29 मला माहीत आहे की, मी गेल्यावर तुमच्यामध्ये भयंकर असे दुष्ट लांडगे येतील, ते कळपाला सोडणार नाहीत. 30 तुमच्यामधूनसुद्धा लोक उठून शिष्यांना, चुकीचे असे शिकवून आपल्यामागे घेऊन जातील. 31 यासाठी सावध राहा, तुम्हातील प्रत्येकाला गेले तीन वर्षे डोळ्यांत अश्रू आणून सावध करण्याचे मी कधीच थांबविले नाही हे आठवा. 32 आणि आता मी तुम्हास देवाच्या व वचनाच्या कृपेच्या अधीन करतो, जी तुमची वाढ करण्यासाठी समर्थ आहे व सर्व पवित्र केलेल्यांमध्ये वतन द्यावयाला समर्थ आहे. 33 मी कोणाच्याही सोन्याचा, चांदीचा व कपड्यांचा लोभ धरला नाही. 34 मी आपल्या स्वतःच्या व माझ्याबरोबर राहणाऱ्यांच्या गरजा माझ्या हातांनी भागविल्या हे तुम्हास चांगले माहीत आहे. 35 अशा रीतीने मी तुम्हास उदाहरण घालू दिले आहे की जे दुर्बल आहेत अशांना आपण स्वतः मेहनत करून मदत केली पाहिजे व प्रभू येशूचे शब्द लक्षात ठेवले पाहिजेत, तो स्वतः म्हणाला, “घेण्यापेक्षा देणे अधिक धन्यतेचे आहे.”
36 आणि हे बोलल्यावर पौलाने गुडघे टेकले आणि प्रार्थना केली. 37 तेव्हा प्रत्येकाला खूपच रडू आले, ते पौलाच्या गळ्यात पडले व त्याचे मुके घेत राहिले. 38 ते पुन्हा त्यास कधीही पाहू शकणार नाहीत, या वाक्याने त्यांना फार दुःख झाले, मग ते त्यास जहाजापर्यंत निरोप देण्यास गेले.
<- प्रेषितांची कृत्ये 19प्रेषितांची कृत्ये 21 ->- a देवाच्या लोकांची