1 सिद्कीयाने बाबेलाच्या राजाविरुध्द बंड केले आणि त्याच्या आज्ञा पाळण्याचे त्याने नाकारले. त्यामुळे बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर आपल्या सैन्यासह यरूशलेमेवर चाल करून गेला. सिद्कीयाच्या कारकिर्दीचे ते नववे वर्ष, दहावा महिना, दहावा दिवस होता. नबुखद्नेस्सरच्या सैन्याने यरूशलेमेला वेढा देऊन लोकांचे येणे जाणे रोखले. मग त्याने नगराभोवती कचऱ्याचे अडसर निर्माण केले. 2 सिद्कीया राजाच्या कारकिर्दीचे अकरावे वर्ष उजाडेपर्यंत या नगराला वेढा चालू राहिला. 3 दुष्काळाने परिस्थिती बिकट झाली होती. चौथ्या महिन्याच्या नवव्या दिवसापर्यंत नगरातील सामान्य मनुष्याची अन्नान्नदशा झाली. 4 मग नगराच्या तटाला एक खिंड पाडण्यात आली; दोन्ही तटांच्यामध्ये जी वेस राजाच्या बागेजवळ होती त्या वाटेने सर्व योद्धे रातोरात पळून गेले; नगरास खास्द्यांचा वेढा पडलाच होता; इकडे राजाने अराबाचा रस्ता धरला. 5 खास्दी सैन्याने राजाचा पाठलाग केला आणि त्यांना यरीहोजवळ गाठले. तेव्हा सिद्कीयाचे सैन्य त्यास एकटा सोडून पळून गेले. 6 बाबेल देशाच्या लोकांनी राजा सिद्कीयाला धरुन रिब्ला येथे आपल्या राजाकडे नेले. या लोकांनी सिद्कीयाला जबर शासन करण्याचे ठरवले. 7 त्यांनी सिद्कीयाच्या मुलांना त्याच्या नजरेसमोर जिवे मारले. नंतर सिद्कीयाचे डोळे काढले आणि त्यास जेरबंद करून बाबेलला नेले.
22 बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरने काही लोकांस यहूदातच राहू दिले. त्यामध्ये एकजण होता त्याचे नाव गदल्या. हा अहीकामचा मुलगा आणि अहीकाम शाफानचा. या गदल्याला नबुखद्नेस्सरने यहूदा प्रांतावर अधिकारी म्हणून नेमले. 23 नथन्याचा मुलगा इश्माएल, कारेहाचा मुलगा यहोहानान आणि नटोफाथी तन्हुमेथाचा मुलगा सराया व माकाथीचा मुलगा याजन्या हे सैन्यातील सरदार होते. त्यांनी बाबेलाच्या राजाने गदल्याला अधिकारी केल्याचे ऐकले म्हणून ते त्यास भेटायला मिस्पा येथे आले. 24 गदल्याने त्या सर्वांना शपथ दिली आणि तो त्यांना म्हणाला, “खास्दी अधिकाऱ्यांचे भय बाळगू नका. या देशातच राहून बाबेलाच्या राजाची सेवा करा, म्हणजे तुमचे भले होईल.” 25 अलीशामचा मुलगा नथन्या याचा मुलगा इश्माएल हा राजसंतानांपैकी होता. त्याने आणखी दहाजणांसमवेत सातव्या महिन्यात गदल्यावर हल्ला केला आणि सर्व यहूदी तसेच खास्दी यांना मिस्पा येथे ठार केले. 26 मग सर्व सैन्याधिकारी आणि लोक मिसरला पळून गेले. खास्दी लोकांच्या धास्तीने कनिष्ठ पदावर असलेल्यापासून श्रेष्ठ पदावर असलेल्यांपर्यंत सर्व पळाले.
27 पुढे अबील मरोदख हा बाबेलचा राजा झाला. त्याने यहूदाचा राजा यहोयाखीन याची कैदेतून सुटका केली. यहोयाखीनाला तोपर्यंत तुरुंगात पडून सदतीस वर्षे झाली होती. अबील मरोदखने सत्तेवर आल्यावर बाराव्या महिन्याच्या सत्ताविसाव्या दिवशी हे सुटकेचे काम केले. 28 त्याच्याशी त्याने चांगले बोलून बाबेलात जे राजे त्याच्या बंदीत होते त्याने त्यांच्याहून त्यास दरबारात उच्चासन दिले. 29 अबील मरोदखने त्यास तुरुंगातले कपडे बदलायला लावले. पुढे आयुष्यभर यहोयाखीन अबील मरोदखच्या शेजारी मेजावर बसून जेवत असे. 30 अबील मरोदख राजाने त्यास पुढे त्याच्या आयुष्यभर रोज जेवण दिले.
<- 2 राजे 24