Link to home pageLanguagesLink to all Bible versions on this site
8
यरूशलेम शहरातील गोरगरिबांसाठी वर्गणी
1 बंधूनो, मासेदोनियातील मंडळ्यांवर झालेल्या देवाच्या कृपेविषयी आम्ही तुम्हास कळवतो. 2 ती अशी की, संकटाच्या बिकट परीक्षेत त्यांचा आत्यंतिक आनंद व त्यांचे कमालीचे दारिद्र्य ह्यांमध्ये त्यांची औदार्यसंपदा विपुल झाली. 3 कारण मी साक्ष देतो की, त्यांना जितके शक्य होते तितके त्यांनी दिले आणि त्यांच्या क्षमतेपेक्षाही जास्त दिले. त्यांनी उत्सफूर्तपणे आपण होऊन दिले.

4 पवित्रजनांच्या सेवेमुळे मिळणाऱ्या आशीर्वादामध्ये सहभागी होण्याची कृपा मिळावी म्हणून त्यांनी आस्थेवाईकपणे आम्हास विनंती केली. 5 आम्हास आशा होती त्याप्रमानेच केवळ नव्हे, तर त्यांनी प्रथम स्वतःस प्रभूला दिले आणि देवाच्या इच्छेने आपणास आम्हासही दिले. 6 ह्यावरून आम्ही तीताजवळ विनंती केली की, जसा त्याने पूर्वी आरंभ केला होता त्याप्रमाने तुमच्यामध्ये कृपेच्या या कार्याचा शेवटही करावा. 7 म्हणून जसे तुम्ही सर्व गोष्टीत, म्हणजे विश्वासात, बोलण्यात ज्ञानात व सर्व आस्थेत व आम्हावरील आपल्या प्रीतीत वाढला आहा, तसे तुम्ही या कृपेच्या कार्यातही फार वाढावे.

प्रभू येशूचे उदाहरण
8 हे मी आज्ञा म्हणून सांगत नाही, तर दुसऱ्यांच्या आस्थेवरून तुमच्याही प्रीतीचा खरेपणा पडताळून पाहतो. 9 आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हास माहीत आहे, तो धनवान असता तुमच्याकरता दरिद्री झाला, अशा हेतूने की, त्याच्या दारिद्र्याने तुम्ही धनवान व्हावे. 10 ह्याविषयी मी आपले मत सांगतो, कारण हे तुम्हास हितकारक आहे, तुम्ही मागेच एक वर्षापूर्वी प्रथमतः असे करण्यास आरंभ केला, इतकेच नव्हे तर अशी इच्छा करण्यासही केला. 11 तर हे कार्य आता पूर्ण करा, ह्यासाठी की जशी इच्छा करण्याची उत्सुकता तुमच्या तुम्हास होती तशी तुमच्या ऐपतीप्रमाणे कार्यसिद्धी व्हावी. 12 कारण उत्सुकता असली म्हणजे ज्याच्या त्याच्याजवळ जसे असेल तसे ते मान्य होते, नसेल तसे नाही. 13 दुसऱ्याचे ओझे हलके करण्यासाठी तुमच्यावर ओझे लादावे असे नाही तर समानता असावी म्हणजे. 14 सध्याच्या काळात तुमच्या विपुलतेतून त्यांची गरज भागावी, यासाठी की नंतर त्याच्या विपुलतेमुळे तुमच्या गरजा भागविल्या जाव्यात अशी समानता व्हावी. 15 पवित्र शास्त्र म्हणते,
“ज्याने मन्ना पुष्कळ गोळा केला होता, त्यास जास्त झाला नाही.
ज्याने थोडा गोळा केला होता, त्यास कमी पडला नाही.”
तीताची व इतरांची कामगिरीवर रवानगी
16 जी आस्था माझ्यामध्ये तुमच्याविषयी आहे ती आस्था देवाने तीताच्या अंतःकरणात घातली याबद्दल मी देवाचे आभार मानतो, 17 कारण तीताने आमच्या आव्हानाचे स्वागतच केले असे नाही तर तो पुष्कळ उत्सुकतेने आणि त्याच्या स्वतःच्या मोठ्या आस्थेने तुमच्याकडे येत आहे. 18 आणि आम्ही त्याच्याबरोबर एका बंधूला ज्याची त्याच्या सुवार्तेबद्दलच्या मंडळ्यातील सेवेबद्दल वाहवा होत आहे, त्यास पाठवत आहोत. 19 यापेक्षा अधिक म्हणजे मंडळ्यांनी हे कृपेचे दानार्पण घेऊन जाण्यासाठी आमची निवड केली. जे आम्ही प्रभूच्या गौरवासाठी करतो आणि मदत करण्याची आमची उत्सुकता दिसावी म्हणून हे करतो. 20 ही जी विपुलता आम्हाकडून सेवेस उपयोगी पडत आहे तिच्या कामात कोणीही आम्हावर दोष लावू नये म्हणून आम्ही काळजीपूर्वक वागत आहोत. 21 आम्ही ‘प्रभूच्या दृष्टीने जे मान्य,’ इतकेच नव्हे तर ‘मनुष्यांच्याही’ दृष्टीने जे मान्य, ते करण्याची खबरदारी घेतो. 22 त्यांच्याबरोबर आम्ही आमच्या दुसऱ्या एका बंधूला पाठवले आहे. त्याच्या उत्सुकतेची पारख आम्ही पुष्कळ गोष्टीत अनेक वेळा केली आहे आणि आता तुमच्यावर त्याचा फार विश्वास असल्यामुळे तो अधिक उत्सुक आहे. 23 तीताच्या बाबतीत सांगायाचे तर, तो तुमच्यामधील माझा एक सहकारी व सहकर्मचारी आहे, आमच्या इतर बंधूंच्या बाबतीत सांगायचे तर, ते ख्रिस्ताला गौरव व मंडळ्यांचे प्रेषित आहेत. 24 म्हणून या लोकांस तुमच्या प्रीतीचा पुरावा द्या आणि आम्हास तुमच्याबद्दल वाटत असलेल्या अभिमानबद्दलचे समर्थन करा. यासाठी की, मंडळ्यांनी ते पाहावे.

<- पौलाचे करिंथकरांस दुसरे पत्र 7पौलाचे करिंथकरांस दुसरे पत्र 9 ->