Link to home pageLanguagesLink to all Bible versions on this site
13
येत्या भेटीकरीता आत्मिक तयारी करण्यासंबंधी केलेले इशारे
1 मी आता तिसर्‍या वेळी तुमच्याकडे येत आहे. दोन किंवा तीन साक्षीदारांच्या तोंडून प्रत्येक शब्द सिद्ध होईल. 2 ज्यांनी पूर्वी पाप केले होते त्यांना आणि दुसर्‍या सगळ्यांना मी अगोदर सांगितले होते आणि दुसर्‍या वेळी स्वतः आलो होतो तेव्हाप्रमाणे आता दूर असताना मी आधी सांगतो की, मी जर पुन्हा आलो तर गय करणार नाही. 3 कारण माझ्याद्वारे ख्रिस्त बोलतो ह्याचे प्रमाण तुम्हास पाहिजे ते हेच; तो तुमच्यासंबंधाने दुर्बळ नाही पण तुमच्यात समर्थ आहे. 4 कारण जरी अशक्तपणात तो वधस्तंभावर खिळला गेला तरी देवाच्या सामर्थ्याने तो जिवंत आहे कारण त्याच्यात आम्हीही दुर्बळ आहोत पण आम्ही देवाच्या सामर्थ्याने तुमच्यासाठी जिवंत राहू.

5 तुम्ही विश्वासात आहात किंवा नाही म्हणून आपली स्वतःची परीक्षा करा. आपली स्वतःची पारख करा. तुम्हास आपल्यात येशू ख्रिस्त आहे हे कळत नाही काय? नसेल तर मग, तुम्ही पसंतीस न उतरलेले आहात. 6 मी आशा करतो की, आम्ही पसंतीस न उतरलेले नाही हे तुम्ही ओळखाल. 7 आता देवाजवळ अशी प्रार्थना करतो की तुम्ही काही वाईट करू नये; म्हणजे आम्ही स्वीकृत दिसावे म्हणून नाही, पण आम्ही स्वीकृत नसलो तरी तुम्ही चांगले ते करावे. 8 कारण आम्ही सत्याविरुद्ध काही करत नाही, तर सत्यासाठी करतो. 9 जेव्हा आम्ही दुर्बळ आहोत व तुम्ही बलवान आहात तेव्हा आम्ही आनंद करतो व तुम्ही परिपूर्ण व्हावे ह्यासाठीही प्रार्थना करतो.

10 एवढ्याकरता दूर असताना मी या गोष्टी लिहीत आहे, म्हणजे प्रभूने मला जो अधिकार उभारणी करण्यास दिलेला आहे, नाश करण्यास नाही, त्याचा उपयोग करून, मी तेथे असताना कडकपणाने वागू नये.

समाप्ती
11 शेवटी, बंधूंनो, आनंद करा तुम्ही आपली अधिकाधिक सुधारणा करा. तुमचे सांत्वन होवो. तुम्ही एकमनाचे व्हा व शांतीने रहा आणि प्रीतीचा व शांतीचा देव तुमच्याबरोबर राहील. 12 पवित्र अभिवादनाने एकमेकांना सलाम करा.

13 तुम्हास सर्व पवित्रजन सलाम सांगतात.

14 प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर असो. आमेन.

<- पौलाचे करिंथकरांस दुसरे पत्र 12