1 शलमोनाची प्रार्थना संपल्याबरोबर स्वर्गातून अग्नी खाली उतरला आणि त्याने होमबली आणि यज्ञार्पणे भस्मसात केली. परमेश्वराच्या लखलखीत तेजाने मंदिर भरुन गेले. 2 त्या तेजाने दिपलेल्या याजकांनाही परमेश्वराच्या मंदिरात जाता येईना. 3 सरळ स्वर्गातून अग्नी खाली येणे आणि परमेश्वराचे तेज मंदिरावर पसरणे या गोष्टी इस्राएलाच्या समस्त लोकांनी पाहिल्या. तेव्हा त्यांनी जमिनीपर्यंत लवून नमन केले, परमेश्वरास धन्यवाद दिले आणि ते म्हणाले, “परमेश्वर चांगला आहे त्याची कृपा सर्वकाळ राहते.” 4 शलमोनाने आणि सर्व इस्राएल लोकांनी परमेश्वरापुढे यज्ञ केले. 5 राजा शलमोनाने बावीस हजार बैल आणि एक लाख वीस हजार मेंढरे यांचा यज्ञ केला. अशा प्रकारे लोकांनी व राजाने देवाच्या घरा साठी समर्पण केले. 6 याजक आपल्या कामाला सिध्द झाले. परमेश्वराच्या भजनाची वाद्ये घेऊन लेवीही उभे राहिले. राजा दाविदाने ही वाद्ये परमेश्वराच्या स्तवनासाठी करून घेतली होती. “परमेश्वराचे स्तवन करा कारण त्याची कृपा सनातन आहे” असे याजक आणि लेवी गात होते. लेवीच्या समोर उभे राहून याजक कर्णे वाजवत होते. सर्व इस्राएल लोक तिथे उभे होते. 7 परमेश्वराच्या मंदिरासमोरचे मधले दालन शलमोनाने पवित्र केले. या जागी त्याने होमार्पणे आणि शांत्यर्पणांची वपा वाहिली. होमार्पणे, अन्नार्पणे आणि वपा यांचे प्रमाण एवढे प्रचंड होते की पितळी वेदीवर ते सर्व मावेना म्हणून मधले दालन त्याने वापरले. 8 शलमोन आणि इस्राएल लोक यांनी सात दिवस हा सण साजरा केला. हमाथच्या वेशीपासून ते मिसरच्या झऱ्या पर्यंतच्या भागातले सगळे इस्राएल लोक इथे आल्यामुळे शलमोनबरोबरचा जमाव खूपच मोठा होता. 9 आठव्या दिवशी त्यांनी पवित्र सभा घेतली कारण त्या आधी सात दिवस त्यांनी सण साजरा केला होता व समर्पणे सात दिवस वेदीवर ठेवली होती, ती फक्त परमेश्वराच्या उपासनेसाठी वापरायची होती. सात दिवस त्यांनी सण साजरा केला. 10 सातव्या महिन्याच्या तेविसाव्या दिवशी शलमोनाने लोकांस घरोघरी परतायला सांगितले. दावीद, शलमोन आणि इस्राएल लोक यांच्यावर परमेश्वराने कृपा केल्यामुळे लोक आनंदी झाले होते. त्यांची अंत:करणे आनंदाने भरुन गेली होती.