Link to home pageLanguagesLink to all Bible versions on this site
6
मंदिराचे समर्पण
1 मग शलमोन म्हणाला, “मी निबीड अंधकारात वास करीन असे परमेश्वर म्हणाला आहे. 2 परमेश्वरा, तुझ्या निवासासाठी मी हे विशाल घर बांधले आहे, तेथे तू चिरकाल राहावेस.” 3 मग शलमोनाने मागे वळून सर्व इस्राएल समुदायांना आशीर्वाद दिला. आणि ते सर्व उभे राहीले. 4 शलमोन पुढे म्हणाला, “इस्राएलाच्या परमेश्वर देवाचे स्तवन करा. माझे पिता दावीद यांच्याशी तो जे बोलला ते त्याने खरे करून दाखवले आहे. परमेश्वर देवाने असे वचन दिले होते.” 5 मी माझ्या लोकांस मिसरातून बाहेर आणल्यानंतर इस्राएल वंशातील कोणतेही नगर मी माझ्या नावाचे घर तिथे बांधले जावे म्हणून निवडले नाही. तसेच, माझ्या इस्राएल लोकांचे आधिपत्य करण्यासाठी कोणाएकाची निवडही केली नाही. 6 पण आता यरूशलेम हे स्थान माझे नाव तेथे रहावे यासाठी मी निवडले आहे आणि दावीदाला इस्राएल लोकांवर नेमले आहे. 7 “इस्राएलाचा देव परमेश्वर याच्या प्रीत्यर्थ माझे पिता दावीद यांना मंदिर बांधायचे होते. 8 पण परमेश्वर त्यांना म्हणाला, ‘दावीद माझ्या नावाने मदिर बांधायचा विचार तुझ्या मनात आला हे चांगले झाले. 9 पण ते तू बांधू शकत नाहीस पण तुझा पुत्र जो तुझ्यापासून जन्मला तो हे काम करील.’ 10 आता परमेश्वराने कबूल केले तसेच झाले आहे व माझे पिता दावीद यांच्या जागी मी इस्राएल लोकांचा राजा झालो आहे. ‘मी इस्राएलचा राजा आहे असे होईल’ हे वचन परमेश्वराने दिले होते, आणि मी इस्राएलाचा देव परमेश्वर याच्या नावाने मंदिर बांधले आहे.
शलमोनाला परमेश्वराचे दुसऱ्यांदा दर्शन
11 मी कराराचा कोश मंदिरात ठेवला आहे. इस्राएलच्या लोकांशी परमेश्वराने केलेला करार या कोशात आहे.” 12 शलमोन, परमेश्वराच्या वेदीसमोर उभा राहिला. तेथे जमलेल्या सर्व इस्राएल लोकांपुढे तो उभा होता. त्याने आपले बाहू पसरले. 13 बाहेरच्या दालनात प्रत्येकी पाच हात लांब, पाच हात रुंद आणि तीन हात उंच असलेला एक पितळी चौरंग शलमोनाने तयार केला व मंडपाच्या मध्यभागी ठेवला. त्यावर चढून तो समस्त इस्राएल लोकांसमोर गुडघे टेकून बसला आणि त्याने आकाशाकडे हात पसरले. 14 शलमोन म्हणाला, “हे इस्राएलाच्या परमेश्वर देवा, स्वर्गात किंवा पृथ्वीवर तुझ्यासारखा दुसरा कोणीही देव नाही. तुझे जिवाभावाने अनुसरण करणाऱ्या आणि योग्य आचरण करणाऱ्या तुझ्या सेवकांना तुझे प्रेम आणि तुझी कृपा यांचे दिलेले वचन पाळणारा तू परमेश्वर आहेस.” 15 दावीद याला दिलेले वचन तू पाळलेस. दावीद माझे पिता होते तू आपल्या मुखानेच त्यांना वचन दिलेस आणि आज आपल्या हाताने ते प्रत्यक्षात आणले आहेस. 16 तसेच आता, हे इस्राएलच्या परमेश्वर देवा, दावीद या सेवकाला दिलेले हे वचनही खरे कर. तू असे म्हणाला होतास: माझ्यासमक्ष इस्राएलच्या राजासनावर न चुकता तुझ्या वंशातीलच कोणीतरी येत जाईल. मात्र तुझ्या मुलांनी माझ्या नियमशास्त्राप्रमाणे काटेकोर वर्तन केले पाहिजे. तुझ्याप्रमाणेच त्यांनीही माझा करार पाळला पाहिजे. 17 तेव्हा आता, हे इस्राएलाच्या परमेश्वर देवा, तुझे हे शब्द खरे होऊ देत. आपला सेवक दावीद याला तू तसा शब्द दिला आहेस. 18 परमेश्वर पृथ्वीवर लोकांमध्ये वस्ती करु शकत नाही ही गोष्ट, हे देवा, आम्हास माहीत आहे. आकाश आणि त्या पुढचे अवकाशही तुला सामावून घ्यायला असमर्थ आहेत. या मी बांधलेल्या मंदिरातही तू मावू शकत नाहीस हे आम्ही जाणतो 19 पण माझी एवढी प्रार्थना ऐक. मी करुणा भाकतो तिजकडे लक्ष दे. परमेश्वर देवा, माझी हाक ऐक. मी तुझा एक दास आहे. 20 या मंदिराकडे अहोरात्र तुझी दृष्टी असो असे मी तुला कळकळीने विनवतो. तुझे नाव इथे राहील असे तू म्हणाला होतास, मी या मंदिराकडे तोंड करून प्रार्थना करीन तेव्हा ती तू ऐक. 21 तुझ्या इस्राएल लोकांनी तसेच मी केलेल्या प्रार्थना तू ऐक. या प्रार्थनास्थळाकडे तोंड करून आम्ही प्रार्थना करु तेव्हा तिच्याकडे तू लक्ष दे. तुझ्या आकाशातील स्थानावरुन इथे तुझे लक्ष असू दे. आमच्या प्रार्थना ऐक आणि आम्हास क्षमा कर. 22 एखाद्याने आपल्या शेजाऱ्याचा काही अपराध केल्याचा आरोप त्याच्यावर आला आणि तो तुझे नाव घेऊन आपण निर्दोष आहोत असे सांगू लागला तर तो वेदीसमोर तसे शपथ घेऊन सांगत असतांना, 23 तू स्वर्गातून ऐक तुझ्या सेवकाचा योग्य न्यायनिवाडा कर ज्याच्या हातून अपराध घडला असेल त्यास शासन कर त्याच्यामुळे इतरांना जसा त्रास झाला तसाच याला होऊ दे आणि ज्याचे वागणे उचित होते तो निर्दोष असल्याचे सिध्द कर. त्याचे प्रतिफळ त्यास दे. 24 इस्राएल लोकांनी तुझ्याविरुध्द पाप केल्यामुळे जर शत्रूंनी तुझ्या इस्राएल लोकांचा पराभव केला आणि अशावेळी इस्राएल लोक तुझ्याकडे येऊन तुझ्या नावाने प्रार्थना करु लागले, या मंदिरात येऊन विनवणी करु लागले तर. 25 तू स्वर्गातून ते ऐकून इस्राएल लोकांच्या पापांची क्षमा कर. तू त्यांना आणि त्यांच्या पूर्वजांना दिलेल्या भूमीवर त्यांना पुन्हा परत आण. 26 जर इस्राएल लोकांनी पाप केल्यामुळे आकाश बंद होऊन पर्जन्यवृष्टी झालीच नाही त्यावेळी पश्चातापाने इस्राएल लोकांनी मंदिराच्या दिशेने पाहत प्रार्थना केली, आणि तू केलेल्या शिक्षेमुळे अपराध करणे थांबवले, 27 तर स्वर्गातून त्यांचे ऐक आणि त्यांच्या पापांची क्षमा कर. इस्राएल लोक तुझे दास आहेत. त्यांना जगण्याचा सन्मार्ग दाखव. तुझ्या भूमीवर पाऊस पाड. कारण हा देश तू आपल्या लोकांस वतन करून दिला आहे. 28 कदाचित् एखादयावेळी दुष्काळ, भयानक साथीचा रोग, किंवा पिकांवर रोग अथवा टोळ, नाकतोडे यांची धाड अशी काही आपत्ती किंवा लोकांच्या राहत्या नगरांवर शत्रूंचा हल्ला झाल्यास, रोगराई आल्यास, 29 तुझे इस्राएल लोक तुझी करुणा भाकतील आणि प्रार्थना करतील. जो कोणी आपले क्लेश किंवा दु:ख ओळखून, या मंदिराच्या दिशेने बाहू उभारुन प्रार्थना करु लागेल. 30 तेव्हा तू ते स्वर्गातून ऐक. जेथे तू राहतोस. तू ऐकून त्यांना क्षमा कर. प्रत्येका मनुष्याचा मनोदय तुला माहीत असल्यामुळे ज्याला जे योग्य असेल त्यास ते दे. मानवाचे मन फक्त तूच ओळखतोस. 31 असे झाले म्हणजे तू आमच्या पूर्वजांना दिलेल्या या भूभागावर त्यांची वस्ती असेपर्यंत लोक तुझे भय बाळगतील आणि तुझे ऐकतील. 32 जर तुझ्या इस्राएल प्रजेपेक्षा वेगळा असा कोणी उपराही कदाचित् दूर देशाहून इथे आलेला असेल. तुझ्या नावाची महती, आणि तुझे सामर्थ्यशाली बाहू यांच्यामुळे तो आलेला असेल. त्याने येऊन या मंदिराकडे पाहत प्रार्थना केली तर, 33 तू ती स्वर्गातून ऐक. त्याची मागणी पुरव. म्हणजे इस्राएल लोकांप्रमाणेच पृथ्वीवरील इतर लोकांसही तुझ्या नावाचा महिमा कळेल आणि त्यांना तुझ्याविषयी आदर वाटेल. व मी बांधलेले हे मंदिर तुझ्या नावाचे आहे ते पृथ्वीवरील सर्व लोकांस कळेल. 34 शत्रूंशी लढावयास जर तू आपल्या लोकांस दुसऱ्या ठिकाणी पाठवशील आणि तिथून ते तू निवडलेल्या या नगराच्या आणि मी बांधलेल्या मंदिराच्या दिशेने पाहत प्रार्थना करु लागतील. 35 तर तू स्वर्गातून त्यांची प्रार्थना ऐक आणि त्यांच्या विनंती प्रमाणे त्यांना मदत कर. 36 पाप कोणाच्या हातून होत नाही? तेव्हा लोक तुझ्याविरुध्द पाप करतील जेव्हा तुझा त्यांच्यावर कोप होईल. तू शत्रूंकरवी त्यांचा पाडाव करशील, बंदी म्हणून त्यांना बळजबरीने इथून दूरच्या किंवा एखाद्या जवळच्या ठिकाणी नेले जाईल. 37 पण तिथे त्यांचे हृदयपरिवर्तन होऊन, परभूमीत कैदी होऊन पडलेले ते विनवणी करून म्हणतील, आम्ही चुकलो, आमच्या हातून पाप घडले आहे. आम्ही दुराचरण केले आहे. 38 असतील तिथून ते अंतःकरणातून तुला शरण येतील. या देशाच्या तू त्याच्या पूर्वजांना दिलेल्या देशाच्या दिशेने आणि तू निवडलेल्या नगराच्या दिशेने पाहत ते प्रार्थना करतील. तुझ्या नावाकरिता मी बांधलेल्या या मंदिराच्या दिशेने पाहत ते प्रार्थना करतील. 39 तेव्हा तू तुझ्या स्वर्गातील निवासस्थानातून ऐक; त्यांच्या प्रार्थना व विनंतीकडे कान दे, त्यांना मदत कर. ज्यांनी तुझ्याविरुध्द पाप केले आहे अशा तुझ्या लोकांस क्षमा कर. 40 आता, हे परमेश्वरा, माझी तुला विनवणी आहे की तू तुझे कान आणि डोळे उघड. आम्ही इथे बसून जी प्रार्थना करणार आहोत ती लक्षपूर्वक ऐक. 41 आता, हे परमेश्वर देवा, तुझे सामर्थ्य मिरवणाऱ्या या कराराच्या कोशाजवळ, आपल्या विश्रामस्थानी तू ये. तुझे याजक उध्दाराने भूषित होवोत. तुझ्या चांगूलपणात तूझे भक्त हर्ष पावोत. 42 “हे परमेश्वर देवा, तुझ्या अभिषिक्त राजाचा स्विकार कर. तुझा एकनिष्ठ सेवक दावीद याचे स्मरण असू दे.”

<- 2 इतिहास 52 इतिहास 7 ->