Link to home pageLanguagesLink to all Bible versions on this site
27
योथामाची कारकीर्द
2 राजे 15:32-38

1 योथाम राजा झाला तेव्हा पंचवीस वर्षांचा होता. त्याने यरूशलेमेवर सोळा वर्षे राज्य केले; त्याच्या आईचे नाव यरुशा ती सादोकाची कन्या. 2 योथाम परमेश्वराच्या दृष्टीने उचित तेच करीत असे. आपले पिता उज्जीया यांच्याप्रमाणेच तो परमेश्वराच्या आज्ञेत राहिला. पण त्याचे पिता जसे परमेश्वराच्या मंदिरात धूप जाळायला गेले तसे मात्र त्याने केले नाही. लोकांचे वाईट मार्गाने जाणे चालूच होते. 3 परमेश्वराच्या मंदिराचा वरचा दरवाजा योथामाने पुन्हा करवला. ओफेलच्या कोटावर त्याने बरेच बांधकाम केले. 4 यहूदाच्या डोंगराळ प्रदेशात नगरे वसवली. जंगलात किल्ले आणि बुरुज बांधले. 5 अम्मोन्याचा राजा आणि त्यांचे सैन्य यांच्यावर योथामाने चढाई केली आणि त्यांचा पराभव केला. त्यामुळे पुढील तीन वर्षे अम्मोनी योथामाला शंभर किक्कार [a]चांदी, दहा हजार कोर गहू आणि तेवढेच जव दरवर्षी देत असत. 6 परमेश्वर देवाने सांगितल्याप्रमाणे मन:पूर्वक आचरण केल्यामुळे योथामचे सामर्थ्य वाढले. 7 त्याने केलेल्या इतर गोष्टी आणि लढाया यांची हकीकत इस्राएल व यहूदा राजांचा इतिहास या पुस्तकात लिहिलेली आहे. 8 योथाम गादीवर आला तेव्हा पंचवीस वर्षांचा होता. त्याने यरूशलेमामध्ये सोळा वर्षे राज्य केले. 9 पुढे योथाम मरण पावला आणि त्याचे त्याच्या पूर्वंजाशेजारी दफन केले गेले. दावीद नगरांत लोकांनी त्यास पुरले. योथामाच्या जागी आहाज हा त्याचा पुत्र राज्य करु लागला.

<- 2 इतिहास 262 इतिहास 28 ->