Link to home pageLanguagesLink to all Bible versions on this site
21
यहूदाचा राजा यहोराम ह्यांची कारकीर्द
1 राजे 22:50; 2 राजे 8:16-24

1 पुढे यहोशाफाट मरण पावला. त्यास त्याच्या पूर्वजांजवळ दावीद नगरात दफन केले. यहोशाफाटाच्या जागी त्याचा पुत्र यहोराम त्याच्याजागी राजा झाला. 2 अजऱ्या, यहीएल, जखऱ्या, अजऱ्या मीखाएल व शफट्या हे यहोरामाचे भाऊ, व यहोशाफाटाचे पुत्र. यहोशाफाट हा इस्राएला[a]चा राजा होता. 3 यहोशाफाटाने आपल्या पुत्रांना यहूदातील तटबंदीच्या नगरांखेरीज सोन्यारुप्याच्या आणि अन्य किंमती वस्तू भेटीदाखल दिल्या. यहोराम मात्र ज्येष्ठ पुत्र असल्यामुळे त्यास त्याने राज्य दिले. 4 यहोराम आपल्या पित्याच्या जागी गादीवर आला आणि सत्ताधीश बनला. त्याने आपल्या सर्व भावांचा तसेच इस्राएलमधील काही वडिलधाऱ्यांचा तलवारीने वध केला. 5 वयाच्या बत्तिसाव्या वर्षी सत्तेवर येऊन यहोरामाने यरूशलेमामध्ये आठ वर्षे राज्य केले. 6 अहाबाच्या घराण्याप्रमाणे, इस्राएलच्या राजांच्या वर्तनूकी प्रमाणेच याचे वागणे होते. कारण अहाबाच्या कन्येशी यहोरामाने लग्न केले होते. परमेश्वराच्या दृष्टीने वाईट अशा गोष्टी त्याने केल्या. 7 पण परमेश्वराने दाविदाला वचन दिलेले असल्यामुळे परमेश्वर दाविदाच्या घराण्याचे उच्चाटन करु शकत नव्हता. दाविदाच्या वंशाचा दिवा सतत तेवत राहील असा परमेश्वराने दाविदाशी करार केला होता. 8 यहोरामाच्या कारकीर्दीत अदोमने यहूदाच्या सत्तेविरुध्द बंड पुकारले. अदोमच्या लोकांनी स्वत: आपला राजा निवडला. 9 तेव्हा आपले सर्व सेनापती आणि रथ यांच्यासह यहोराम अदोमवर चाल करून गेला. अदोमी सैन्याने त्यांना वेढा घातला. पण यहोरामाने रात्रीची वेळ साधून त्यांच्यावर प्रतिहल्ला केला. 10 तेव्हापासून आजतागायत अदोमची यहूदाशी बंडखोरी चालू आहे. लिब्ना नगरातील लोकांनीही यहोरामाची सत्ता झुगारली. यहोरामाने आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर याचा त्याग केल्यामुळे असे झाले. 11 यहोरामाने यहूदातील पहाडांवर प्रार्थनेसाठी उच्चस्थाने बांधली आणि यरूशलेमेतील लोकांना व्यभिचारी मतीने चालायला लावले. अशाप्रकारे यहोरामाने यहूदी लोकांस परमेश्वरापासून दूर नेले. 12 एलीया या संदेष्ट्याकडून यहोरामाला असा संदेश आला: तुझे पूर्वज दावीद यांचा परमेश्वर म्हणतो, “यहोरामा, तुझे आचरण आपले पिता यहोशाफाट यांच्या सारखे नाही. यहूदाचा राजा आसा याच्यासारखे तुझे वर्तन नाही. 13 उलट तू इस्राएलच्या राजांचा कित्ता गिरवला आहेस. यहूदा आणि यरूशलेममधील लोकांस तू परमेश्वराच्या इच्छेविरुध्द वागायला लावले आहेस. अहाब आणि त्याचे घराणे यांनी हेच केले. ते परमेश्वराशी एकनिष्ठ राहिले नाहीत. तू स्वत:च्या भावांची हत्या केलीस. ते तुझ्यापेक्षा वर्तणुकीने चांगले होते. 14 तेव्हा परमेश्वर आता तुझ्या लोकांस जबर शासन करणार आहे तुझी अपत्ये पत्नी, मालमत्ता यांना परमेश्वर शिक्षा करणार आहे. 15 तुला आतड्यांचा भयंकर आजार होईल आणि तो दिवसेदिवस बळावेल. त्यामध्ये तुझी आतडी बाहेर पडतील.” 16 कूशी लोकांच्या शेजारचे अरब आणि पलिष्टी लोक यांना परमेश्वराने यहोरामाविरुध्द भडकावले. 17 या लोकांनी यहूदावर स्वारी केली आणि त्यांनी राजाच्या महालातली सगळी घनदौलत लुटून नेली. यहोरामाच्या पत्नी-अपत्यानाही त्यांनी पळवून नेले. फक्त यहोआहाज हा सगळ्यात धाकटा पुत्र तेवढा बचावला. 18 या सगळ्या घडामोडींनंतर परमेश्वराने यहोरामाला आतड्यांच्या असाध्य अशा रोगाने आजारी केले. 19 त्या आजारात दोन वर्षांनी त्यांची आतडी बाहेर आली. असह्य वेदना होऊन तो मरण पावला. लोकांनी त्याच्या वडलांच्या सन्मानार्थ जसा मोठा अग्नी पेटवला होता तसा यहोरामाच्या सन्मानार्थ पेटवला नाही. 20 यहोराम सत्तेवर आला तेव्हा बत्तीस वर्षांचा होता. त्याने यरूशलेमामध्ये आठ वर्षे राज्य केले. त्याच्या मृत्यूचे कोणालाही दु:ख झाले नाही. लोकांनी दावीद नगरातच त्याचे दफन केले, पण राजासाठी असलेल्या कबरेत नव्हे.

<- 2 इतिहास 202 इतिहास 22 ->