Link to home pageLanguagesLink to all Bible versions on this site
19
यहोशाफाटाला येहू द्रष्टयाचे ताडन
1 यहूदाचा राजा यहोशाफाट यरूशलेमामध्ये आपल्या घरी सुखरुप परतला. 2 हनानीचा पुत्र येहू हा द्रष्टा होता तो राजा यहोशाफाटाला सामोरा गेला. येहू यहोशाफाटाला म्हणाला, “दुष्टांच्या मदतीला तू का गेलास? परमेश्वराचा द्वेष करणाऱ्यांबद्दल तुला आपुलकी का वाटावी? म्हणूनच परमेश्वराचा तुझ्यावर कोप झाला आहे.” 3 पण तू काही चांगल्या गोष्टीही केल्या आहेस. या देशातून तू अशेराचे खांब हटवलेस आणि परमेश्वरास अनुसरायचे तू मन:पूर्वक ठरवले आहेस.
यहोशाफाटाला येहू द्रष्टयाचे ताडन
4 यहोशाफाट यरूशलेमामध्ये राहत असे, त्याने पुन्हा एकदा बैर-शेबापासून एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशापर्यंत फिरुन लोकांच्या भेटी घेतल्या. त्याने लोकांस पुन्हा एकदा त्यांच्या पूर्वजांचा देव परमेश्वर याच्याकडे वळवले. 5 तसेच त्याने यहूदामध्ये आणि यहूदाच्या प्रत्येक तटबंदीच्या नगरांत न्यायाधीश नेमले. 6 यहोशाफाटाने या न्यायाधीशांना सांगितले, “तुम्ही जे करायचे ते विचारपूर्वक करा. कारण लोकांसाठी नव्हे तर परमेश्वरासाठी तुम्ही न्याय करत आहात. तुमच्या निर्णयाला त्याची साथ असेल. 7 तुम्ही सर्वांनी परमेश्वराचे भय बाळगावे. तुम्ही जे काही कराल ते सांभाळून काळजीपूर्वक करा कारण आपला परमेश्वर देव न्यायी आहे. लोकांच्या बाबतीत तो पक्षपाती नाही. आणि लाच घेऊन न्याय फिरवणे हे ही त्याच्या नीतीत बसत नाही.” 8 यानंतर यहोशाफाटाने यरूशलेमामध्ये काही परमेश्वराचे लेवी, याजक तसेच इस्राएल घराण्यांतील वयस्कर मंडळी यांना न्यायाधीश म्हणून नेमले. परमेश्वराच्या नियमांना अनुसरुन त्यांनी यरूशलेमामधल्या रहिवाश्यांच्या वादांचा निकाल लावायचा होता. ते यरूशलेमेत राहीले 9 यहोशाफाटाने त्यांना आज्ञापूर्वक सांगितले की, “परमेश्वराचे भय धरुन निष्कपट रीतीने आणि मन:पूर्वक ही सेवा करा. 10 खुनाचा वाद, कायदा, नियम, आज्ञा, किंवा एखादा न्याय यासंबंधी तुमच्याकडे वाद येतील. हे वाद नगरात राहणाऱ्या तुमच्या बांधवांकडूनच उपस्थित केले जातील. अशा सर्वबाबतीत प्रत्येक वेळी लोकांस सांगा की त्यांनी परमेश्वराविरुध्द पाप करु नये. हे तुम्ही निष्ठेने पार पाडले नाहीत तर तुमच्यावर आणि या तुमच्या भाऊबंदांवर परमेश्वराचा कोप ओढवेल. एवढे करा म्हणजे तुमच्या मनात अपराधभाव राहणार नाही. 11 अमऱ्या हा मुख्य याजक आहे. परमेश्वराच्या बाबतीतल्या सर्व गोष्टींमध्ये त्याचे वर्चस्व राहील आणि इश्माएलचा पुत्र जबद्या, राजाच्या बाबतीतल्या सर्व गोष्टीविषयी मुखत्यार म्हणून नेमलेला आहे. जबद्या हा यहूदा वंशाचा अधिकारी आहे. लेवी हे लेखनिक कारभारी म्हणून तुमच्या दिमतीला आहेत. जे जे कराल ते धैर्याने करा. उचित तेच करणाऱ्यांना परमेश्वराची साथ असो.”

<- 2 इतिहास 182 इतिहास 20 ->