Link to home pageLanguagesLink to all Bible versions on this site
10
इस्त्राएलाचे बंड
1 राजे 12:1-19

1 रहबाम शखेम येथे गेला कारण त्यास राजा करण्यासाठी सर्व इस्राएल लोक तेथे गेले होते. 2 यावेळी यराबाम मिसरमध्ये होता कारण त्याने राजा शलमोनापुढून पळ काढला होता. यराबाम हा नबाटाचा पुत्र. रहबाम राजा होणार हे त्याने ऐकले म्हणून तो मिसरहून आला. 3 तेव्हा इस्राएल लोकांनी यराबामालाही आपल्याबरोबर येण्यास सांगितले. अशा तऱ्हेने यराबाम आणि सर्व इस्राएल लोक रहबामाकडे आले. त्यास ते म्हणाले, “रहबामा, 4 तुमच्या पित्याने आमचे जू फार भारी केले होते तर आता आपल्या पित्याने लादलेली कठीण सेवा व आम्हावरील भारी जू आता हलके करा म्हणजे आम्ही तुमच्या आज्ञेत राहू.” 5 यावर रहबाम त्यांना म्हणाला, “तुम्ही तीन दिवसानी परत या.” तेव्हा लोक निघून गेले. 6 राजा रहबामाने मग आपला पिता शलमोनाच्या पदरी असणाऱ्या वडीलधाऱ्या मंडळीशी चर्चा केली. रहबाम त्यांना म्हणाला, “मी या लोकांस काय उत्तर द्यावे? याबाबतीत मला तुमचा सल्ला हवा आहे.” 7 तेव्हा ती वयोवृध्द मंडळी रहबामाला म्हणाली, “तू या लोकांशी प्रेमाने वागलास, त्यांना संतुष्ट केलेस आणि त्यांच्याशी गोड बोललास तर ते चिरकाल तुझी सेवा करतील.” 8 पण रहबामाने त्यांचा हा सल्ला मानला नाही तो मग आपल्या पदरी असलेल्या आणि आपल्याबरोबर लहानाचे मोठे झालेल्या तरुण मंडळीशी बोलला. 9 रहबाम त्यांना म्हणाला, “तुम्ही मला काय सल्ला द्याल? आपण लोकांस काय सांगावे? त्यांना आपले ओझे हलके करून हवे आहे. माझ्या पित्यानी त्यांच्या मानेवर ठेवलेले जू आता त्यांना मी हलके करायला हवे आहे.” 10 तेव्हा त्याच्या पिढीची ती युवा मंडळी रहबामाला म्हणाली, “तुमच्याकडे आलेल्या लोकांस तुम्ही असे सांगावे. लोक तुम्हास म्हणाले की, मानेवर जू ठेवल्याप्रमाणे तुमच्या वडिलांनी आम्हास कठोर जिणे जगायला लावले. तुम्ही आता ते हलके करावे असे आम्हास वाटते पण रहबाम, तुम्ही त्यांना असे सांगावे, माझी करंगळी माझ्या पित्याच्या कमरेपेक्षा जाड असेल. 11 माझ्या पित्याने तुमच्यावर फार ओझे लादले ना! मी तर ते अधिकच भारी करणार आहे; माझ्या पित्याने तुम्हास चाबकांचे फटकारे मारले, मी तर तुम्हास विंचवांनी शासन करीन.” 12 “यराबाम आणि सर्व लोक तीन दिवसानी रहबामाकडे आले.” राजा रहबामाने त्यांना तसेच सांगितले होते. 13 रहबाम त्यांच्याशी यावेळी उद्धटपणे बोलला. मोठ्यांचा सल्ला त्याने मानला नाही. 14 तरुणांनी दिलेल्या सल्ल्याप्रमाणे तो बोलला तो लोकांस म्हणाला, “माझ्या पित्याने तुमच्यावर फार ओझे लादले ते मी अधिकच भारी करीन. त्यांनी तुम्हास चाबकाने शासन केले असेल पण मी तर तुम्हास विंचवांनी शासन करीन.” 15 राजा रहबामाने लोकांचे ऐकून घेतले नाही. तो असे बोलला कारण हा बदल परमेश्वरानेच घडवून आणला होता. अहीया मार्फत परमेश्वर यराबामाशी जे बोलला होता ते प्रत्यक्षात यावे म्हणूनच त्याने अशी वेळ येऊ दिली. अहीया हा शिलोनी लोकांपैकी होता आणि यराबाम नबाटाचा पुत्र होता. 16 राजा रहबामाने आपल्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केले हे इस्राएल लोकांच्या लक्षात आले. ते राजाला म्हणाले, “आम्ही काय दावीदाच्या घराण्यातले आहोत का? मुळीच नाही! इशायचा पुत्र आमचा वतन भाग आहे का? नाही! तेव्हा इस्राएल लोकांनो, आपण आपले आपापल्या घरी जाऊ या दावीदाच्या पुत्राला आपल्या घरच्यांवरच राज्य करु द्या.” सर्व इस्राएल लोक मग घरोघर गेले. 17 पण यहूदाच्या नगरांमध्ये राहणारे काही इस्राएल लोक होते. रहबाम त्यांच्यावर राज्य करत राहिला. 18 हदोराम हा वेठबिगारांवरचा मुकादम होता. रहबामाने त्यास इस्राएल लोकांकडे पाठवले. पण इस्राएल लोकांनी त्याच्यावर दगडफेक करून त्यास मरेपर्यंत मारले. इकडे रहबामाने रथाचा आश्रय घेतला आणि त्वरेने पळ काढला. तो यरूशलेमेला पळून गेला. 19 तेव्हापासून आजतागायत इस्राएलाचे दावीदाच्या घराण्याशी बंड केले आहे.

<- 2 इतिहास 92 इतिहास 11 ->