Link to home pageLanguagesLink to all Bible versions on this site
2
सार्वजनिक उपासनेबाबत सूचना
1 तर सर्वांत प्रथम मी हा बोध करतो की, मागण्या, प्रार्थना, विनंत्या व आभारप्रदर्शन सर्व लोकांसाठी कराव्या. 2 आणि विशेषतः राजांकरता आणि जे मोठे अधिकारी आहेत त्या सर्वांकरीता प्रार्थना करा, यासाठी की आपण पूर्ण सुभक्तीत व गंभीरपणात शांतीचे व स्थिरपणाचे असे जीवन जगावे. 3 कारण हे आपल्या तारणाऱ्या देवाच्या दृष्टीने चांगले व स्वीकार करण्यास योग्य आहे, 4 त्याची इच्छा आहे की सर्व लोकांचे तारण व्हावे आणि त्यांनी खरेपणाच्या पूर्ण ज्ञानास पोहचावे. 5 कारण एकच देव आहे आणि देव व मनुष्य यांच्यामध्ये ख्रिस्त येशू हा मनुष्य एकच मध्यस्थ आहे. 6 त्याने सर्वांच्या खंडणीकरिता स्वतःला दिले. याविषयीची साक्ष योग्यवेळी देणे आहे. 7 आणि या साक्षीचा प्रसार करण्यासाठी मला घोषणा करणारा आणि प्रेषित मी खरे सांगतो; खोटे सांगत नाही, असा परराष्ट्रीय लोकांमध्ये विश्वास आणि सत्याचा शिक्षक म्हणून नेमलेला आहे.

8 म्हणून माझी अशी इच्छा आहे की सर्व ठिकाणी पुरुषांनी राग व भांडण सोडून पवित्र हात वर करून प्रार्थना करावी. 9 त्याचप्रमाणे, माझी अशी इच्छा आहे की, स्त्रियांनी स्वतःला केस गुंफणे, सोने किंवा मोती किंवा महाग कपडे यांनी नव्हे तर सभ्य वेशाने विनयाने व मर्यादेने सुशोभित करावे. 10 तसेच देवासाठी समर्पित जीवन जगणाऱ्या स्त्रियांना जसे शोभते, तसे स्वतःला चांगल्या कृत्यांनी सुशोभित करावे. 11 स्त्रीने शांतपणे व पूर्ण अधीनतेने शिकावे. 12 मी स्त्रीला शिकविण्याची परवानगी देत नाही किंवा पुरुषावर अधिकार गाजवण्यास परवानगी देत नाही. त्याऐवजी तिने शांत रहावे. 13 कारण प्रथम आदाम निर्माण करण्यात आला त्यानंतर हव्वा. 14 आणि आदाम फसवला गेला नाही तर स्त्री फसवली गेली आणि ती पापात पडली. 15 तथापि मुलांना जन्म देण्याच्या वेळेस तिचे रक्षण होईल, ती मर्यादेने विश्वास, प्रीती व पवित्रपण यांमध्ये राहिल्यास हे होईल.

<- तीमथ्याला पहिले पत्र 1तीमथ्याला पहिले पत्र 3 ->