Link to home pageLanguagesLink to all Bible versions on this site

1 मग किर्याथ-यारीमाची माणसे आली, आणि त्यांनी परमेश्वराचा कोश नेला, आणि तो टेकडीवर अबीनादाबाच्या घरात आणून ठेवला. त्यांनी त्याचा मुलगा एलाजार याला परमेश्वराचा कोश राखायला पवित्र केले.

शमुवेल इस्त्राएल लोकांचा न्यायनिवाडा करतो
2 कोश किर्याथ-यारीमात येऊन राहिला त्या दिवसापासून, बहुत काळ लोटला, म्हणजे वीस वर्षे झाली. इस्राएलाच्या सर्व घराण्याने शोक केला आणि परमेश्वराकडे वळण्याची इच्छा केली. 3 शमुवेल इस्राएलाच्या सर्व घराण्याशी बोलला तो म्हणाला, “जर तुम्ही आपल्या सर्व मनाने परमेश्वराकडे परत वळता, तर आपणापासून परके देव आणि अष्टारोथ दूर करा, तुम्ही आपली मने परमेश्वराकडे लावा, आणि केवळ त्याचीच सेवा करा, म्हणजे तो तुम्हास पलिष्ट्यांच्या हातून सोडवील.” 4 मग इस्राएली लोकांनी बआल व अष्टारोथ काढून टाकले, आणि केवळ परमेश्वराचीच आराधना करू लागले. 5 आणि शमुवेल म्हणाला, “सर्व इस्राएलांस मिस्पा येथे एकवट करा, म्हणजे मी तुम्हासाठी परमेश्वरास विनंती करीन.” 6 मग ते मिस्पात जमले आणि त्यांनी पाणी काढून परमेश्वराच्या समोर ओतले. त्या दिवशी त्यांनी उपास केला आणि म्हटले, “आम्ही परमेश्वराच्या विरूद्ध पाप केले आहे.” तेव्हा शमुवेलाने तेथे इस्राएली लोकांचे वादविवाद मिटवले आणि लोकांचे मार्गदर्शन केले. 7 आता इस्राएलाची लोक मिस्पांत जमले आहेत असे पलिष्यांनी ऐकले, तेव्हा पलिष्टयांचे अधिकारी इस्राएलावर चढाई करून आले. इस्राएल लोकांनी जेव्हा हे ऐकले, तेव्हा ते पलिष्ट्यांना घाबरले. 8 नंतर इस्राएली लोक शमुवेलाला म्हणाले, “आमचा देव परमेश्वर याने आम्हास पलिष्ट्यांच्या हातून सोडवावे म्हणून त्याकडे आम्हासाठी धावा करण्याचे थांबवू नका.” 9 मग शमुवेलाने एक दूध पिणारे कोकरू घेऊन त्याचे संपूर्ण होमार्पण परमेश्वरास केले; आणि शमुवेलाने इस्राएलासाठी परमेश्वराचा धावा केला आणि तेव्हा परमेश्वराने त्यास उत्तर दिले. 10 आणि शमुवेल होमार्पण अर्पण करत होता, तेव्हा पलिष्टी इस्राएलाशी लढायला जवळ आले; परंतु त्यादिवशी परमेश्वराने पलिष्ट्याविरूद्ध मोठ्या आवाजात गडगडाट करून त्यास घाबरे केले व गोंधळात टाकले आणि इस्राएलापुढे त्यांचा पराभव झाला. 11 तेव्हा इस्राएलाची माणसे मिस्पातून निघून पलिष्ट्यांच्या पाठीस लागली आणि बेथ-कारापर्यंत त्यांना मारीत गेली. 12 मग शमुवेलाने एक दगड घेतला आणि मिस्पा व शेन याच्या दरम्यान तो उभा केला आणि त्यास एबन-एजर असे नाव देऊन म्हटले, “येथपर्यंत परमेश्वराने आमचे साहाय्य केले आहे.” 13 असे पलिष्टी पराभूत झाले आणि ते इस्राएलाच्या सीमेत आणखी आले नाहीत. शमुवेलाच्या सर्व दिवसात परमेश्वराचा हात पलिष्ट्यांच्या विरूद्ध होता. 14 आणि एक्रोनापासून गथपर्यंत, जी नगरे पलिष्ट्यांनी इस्राएलापासून घेतली होती ती इस्राएलास परत मिळाली; आणि त्यांचा प्रदेश इस्राएलाने पलिष्ट्यांच्या हातातून परत घेतला. त्यानंतर इस्राएल व अमोरी यांच्यामध्ये शांतता होती. 15 शमुवेलाने आपल्या आयुष्याच्या सर्व दिवसात इस्राएलाचा न्याय केला. 16 तो प्रत्येक वर्षी बेथेलास, गिलगालास, व मिस्पात अनुक्रमाने जाई. आणि त्या सर्व ठिकाणी इस्राएलाचा न्याय करी. 17 आणि रामा येथे तो परत माघारी येत असे, कारण तेथे त्याचे घर होते आणि तेथे सुध्दा त्याने इस्राएलाचे वादविवाद मिटवण्याचे काम केले. तेथे त्याने परमेश्वरास अर्पणे अर्पायला वेदी बांधली.

<- 1 शमुवेल 61 शमुवेल 8 ->