Link to home pageLanguagesLink to all Bible versions on this site
8
मूर्तीला दाखविलेले नैवेद्य
1 आता तुम्ही मला लिहिलेल्या गोष्टींविषयी मी लिहित आहे; मूर्तींना वाहिलेल्या गोष्टींविषयी आपल्या सर्वांना ज्ञान आहे, हे आपण जाणतो. ज्ञान फुगवते, पण प्रीती उभारणी करते. 2 आपण एखादी गोष्ट जाणतो असे कोणाला वाटत असेल, तर ती जशी समजली पाहिजे तशी अजून तो जाणत नाही. 3 पण कोणी देवावर प्रीती करीत असेल तर त्या मनुष्यास देव ओळखतो. 4 म्हणून आता, मूर्तींना वाहिलेल्या पदार्थांच्या सेवनाविषयी आपण जाणतो की, जगात मूर्ती ही काहीच नाही आणि एकाशिवाय दुसरा देव नाही, 5 कारण स्वर्गात आणि पृथ्वीवर देव म्हणलेले पुष्कळ असले, कारण तसे पुष्कळ दैवत आणि पुष्कळ प्रभू असतील,
6 परंतु आमच्यासाठी फक्त एकच देव जो पिता तो आहे.
ज्याच्यासाठी आपण जगतो आणि
ज्याच्यापासून सर्वकाही निर्माण झाले
आणि फक्त एकच प्रभू येशू ख्रिस्त आहे.
ज्याच्या द्वारे सर्व गोष्टी अस्तित्वात येतात व ज्याच्या द्वारे आपण जगतो.
दुर्बळ बंधूच्या मनाची चलबिचल होऊ नये म्हणून खबरदारी
7 पण हे ज्ञान प्रत्येक मनुष्यास असणार नाही कारण मूर्तींविषयी जे विवेक बाळगतात असे कित्येकजण, या घटकेपर्यंत, ते मूर्तीला वाहिलेले नैवेद्य खात आहेत; आणि त्यांचा विवेक दुर्बळ असल्यामुळे अशुद्ध होतो. 8 पण अन्नामुळे देवापुढे आपली योग्यता ठरत नाही, आपण न खाण्याने कमी ठरत नाही किंवा खाण्याने अधिक ठरत नाही. 9 पण तुमचे हे स्वातंत्र्य दुर्बळ असलेल्यास, कोणत्याही प्रकारे, अडखळण होऊ नये म्हणून काळजी घ्या. 10 कारण ज्ञान असलेल्या तुला जर मूर्तीच्या असलेल्या ठिकाणी भोजनास बसलेले कोणी बघितले, तर तो दुर्बळ असल्यास त्याचा विवेक मूर्तींना वाहिलेले पदार्थ खाण्यास तयार होईल ना? 11 आणि ज्याच्यासाठी ख्रिस्त मरण पावला अशा दुर्बळ असलेल्या तुझ्या बंधूचा तुझ्या या ज्ञानामुळे नाश होतो. 12 पण तुम्ही जेव्हा अशाप्रकारे बंधूच्या विरूद्ध पाप करून त्यांचा दुर्बळ असलेला विवेक तुम्ही दुखावता, तेव्हा तुम्ही ख्रिस्ताविरुद्ध पाप करता. 13 म्हणून, जर माझ्या बंधूला अन्नाने अडखळण होत असेल तर माझ्या बंधूंना अडथळा होण्यास मी कारणीभूत होऊ नये म्हणून मी कधीही मांस खाणार नाही.

<- करिंथकरांस पहिले पत्र 7करिंथकरांस पहिले पत्र 9 ->