Link to home pageLanguagesLink to all Bible versions on this site
6
ख्रिस्ती लोकांची न्यायालयात गेलेली भांडणे
1 जेव्हा तुमच्यापैकी एखाद्याचा दुसऱ्याबरोबर वाद असेल, तर तो वाद पवित्र जनांपुढे जाण्याऐवजी ती व्यक्ती तो वाद न्यायालयात अनीतिमान लोकांसमोर नेण्याचे धाडस का करतो? 2 पवित्रजन जगाचा न्याय करतील हे तुम्हास माहित नाही काय? आणि जर तुमच्याकडून जगाचा न्याय होणार आहे, तर क्षुल्लक बाबींचा निर्णय करण्यास तुम्ही योग्य नाही काय? 3 आपण देवदूतांचा न्याय करणार आहोत, हे तुम्हास माहित नाही काय? तर या जीवनासंबंधीचा न्याय किती विशेषेकरून आम्ही करू शकणार नाही? 4 म्हणून जर दररोजच्या जीवनासंबंधीची प्रकरणे तुम्हास निकालात काढायची असतील, तर ज्यांची मंडळीत काही गणती नाही, अशा मनुष्यांना न्याय ठरविण्यास का बसवता? 5 तुम्हास लाज वाटावी म्हणून मी असे म्हणतो, ज्याला भावाभावांचा न्यायनिवाडा करता येईल, असा एकही शहाणा मनुष्य तुमच्यात नाही काय? 6 पण या ऐवजी, भाऊ भावावर फिर्याद करतो आणि तीहि अविश्वासणाऱ्या पुढे करतो हे कसे? 7 तुम्ही एकमेकांवर खटले भरता ह्यात सर्व प्रकारे तुमचीच हानी आहे, त्यापेक्षा तुम्ही अन्याय का सहन करीत नाही? त्यापेक्षा तुम्ही आपली फसवणूक का होऊ देत नाही? 8 उलट तुम्ही दुसऱ्यावर आणि स्वतःच्या भावावर अन्याय करता आणि फसवता. 9 अनीतिमानास देवाचे राज्य वतन मिळणार नाही, हे तुम्ही जाणत नाही काय? फसू नका; कोणीही व्यभिचारी, मूर्तीपुजक किंवा व्यभिचारी, विपरीत संभोग करू देणारे किंवा विपरीत संभोग करणारे, 10 चोर, लोभी, दारूबाज, निंदा करणारे किंवा लुबाडणारे ह्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही. 11 आणि तुम्ही कित्येकजण तसे होता; पण तुम्ही धुतले गेला आहा, तुम्ही पवित्र केले गेला आहात आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने व आपल्या देवाच्या आत्म्याकडून तुम्ही नीतिमान ठरवले गेला आहात.
अशुद्धता ही ख्रिस्ती मनुष्याच्या जीवनक्रमाशी विसंगत होय
12 “सर्व गोष्टी मला कायदेशीर आहेत,” पण सर्व गोष्टी माझ्या हिताच्या नसतात, “सर्व गोष्टी मला कायदेशीर आहेत,” पण मी त्यातील कोणत्याच गोष्टींच्या अधीन होणार नाही. 13 अन्न पोटासाठी आहे आणि पोट अन्नासाठी आहे पण देव त्या दोघांचाही नाश करील. पण व्यभिचारासाठी शरीर नाही, तर शरीर प्रभूसाठी आहे आणि शरीरासाठी प्रभू आहे. 14 आणि देवाने प्रभूला उठवले आणि तो त्याच्या सामर्थ्याने आपल्यालासुद्धा उठवील. 15 तुमची शरीरे ख्रिस्ताचे अवयव आहेत, हे तुम्हास माहित नाही काय? मग मी ख्रिस्ताचे अवयव घेऊन ते वेश्येचे अवयव करू काय? तसे न होवो. 16 तुम्ही हे जाणत नाही का की, जो वेश्येशी जोडला जातो तो तिच्याशी शरीराने एक होतो? कारण तो म्हणतो की, ती दोघे एकदेह होतील. 17 पण जो प्रभूशी जोडला जातो तो त्याच्याशी आत्म्याने एकरूप होतो. 18 व्यभिचारापासून दूर पळा. जे दुसरे कोणतेही पाप मनुष्य करतो ते त्याच्या शरीराबाहेर होते पण व्यभिचार करणारा आपल्या स्वतःच्या शरीराविरुद्ध पाप करतो. 19 किंवा तुम्ही हे जाणत नाही का की, तुमचे शरीर हे देवाकडून मिळालेल्या व तुमच्यात असलेल्या पवित्र आत्म्याचे निवासस्थान आहे? आणि तुम्ही आपले स्वतःचे नाही? 20 कारण तुम्हास मोल देऊन विकत घेतले आहे; म्हणून तुम्ही आपल्या शरीराने देवाचे गौरव करा.

<- करिंथकरांस पहिले पत्र 5करिंथकरांस पहिले पत्र 7 ->