Link to home pageLanguagesLink to all Bible versions on this site
2
तत्त्वज्ञान व प्रकटीकरण
1 बंधूनो, जेव्हा मी तुमच्याकडे आलो तेव्हा मी देवाविषयीचे सत्य रहस्य मानवी ज्ञानाने किंवा उत्कृष्ट भाषण करून सांगत आलो असे नाही. 2 कारण तुमच्यामध्ये असताना फक्त येशू ख्रिस्त आणि तोसुध्दा वधस्तंभावर खिळलेला, याशिवाय कशाचेही ज्ञान मला असू नये असा मी ठाम निश्चय केला आहे. 3 आणि मी तुमच्याकडे अशक्त, भयभीत व थरथर कापत आलो. 4 माझे भाषण व घोषणा हे मन वळविणाऱ्या मानवी ज्ञानाद्वारे दिलेले नव्हते पण ते आत्मा आणि त्याचे सामर्थ्य यांच्या द्वारे होते. 5 जेणेकरून तुमचा विश्वास मानवी ज्ञानावर नव्हे तर देवाच्या सामर्थ्यावर असावा.

6 तरीपण, जे आत्मिक परीपक्व आहेत त्यांना आम्ही ज्ञान सांगतो परंतु ते ज्ञान या जगाचे नाही आणि या युगाचे नाहीसे होणारे जे अधिकारी त्यांचेही नाही. 7 तर देवाचे रहस्यमय ज्ञान आम्ही सांगतो ते गुप्त ठेवलेले होते, ते देवाने युगाच्या पूर्वी तुमच्याआमच्या गौरवासाठी नेमले होते. 8 हे ज्ञान या युगाच्या कोणाही अधिकाऱ्याला माहीत नव्हते कारण जर त्यांना कळले असते, तर त्यांनी गौरवी प्रभूला वधस्तंभावर खिळले नसते. 9 परंतु ज्याप्रमाणे पवित्र शास्त्र म्हणते,

“डोळ्यांनी पाहिले नाही,
कानांनी ऐकले नाही आणि
मनुष्याच्या मनात जे आले नाही,
ते देवाने त्याच्यावर प्रीती करणाऱ्यांसाठी तयार केले आहे.”

10 ते देवाने आत्म्याच्याद्वारे आपणांस प्रकट केले आहे कारण हा आत्मा प्रत्येक गोष्टींचा व देवाच्या खोल गोष्टींचाही शोध घेतो. 11 कारण मनुष्याच्या आत्म्याशिवाय मनुष्याच्या गोष्टी ओळखणारा दुसरा कोण मनुष्य आहे? त्याप्रमाणेच देवाच्या आत्म्याशिवाय देवाचे खोल विचार कोणीच ओळखू शकत नाही. 12 परंतु आम्हास जगाचा आत्मा मिळाला नाही, तर देवापासूनचा आत्मा मिळाला आहे. यासाठी की, देवाने आपल्याला जे कृपेने दिले ते आपण ओळखून घ्यावे. 13 मानवी ज्ञानाने शिकवलेल्या शब्दांनी आम्ही या गोष्टी सांगत नाही, तर आत्म्याने शिकवलेल्या शब्दांनी, आत्मिक शब्द उपयोगात आणून आध्यात्मिक गोष्टींचे स्पष्टीकरण करतो. 14 स्वाभाविक मनुष्य देवाच्या आत्म्याच्या गोष्टी स्वीकारत नाही कारण त्या त्यास मूर्खपणाच्या वाटतात आणि तो त्या मानीत नाही, कारण त्या आत्म्याने समजायच्या असतात. 15 जो आत्मिक आहे तो तर सर्व गोष्टी समजतो तरी त्याची स्वतःची पारख कोणाकडूनही होत नाही. 16 कारण पवित्र शास्त्र म्हणते,

“प्रभूचे मन कोण जाणतो? जो त्यास शिकवू शकेल?”
परंतु आपल्याला तर ख्रिस्ताचे मन आहे.

<- करिंथकरांस पहिले पत्र 1करिंथकरांस पहिले पत्र 3 ->