Link to home pageLanguagesLink to all Bible versions on this site
23
लेवी आणि याजक ह्यांची कामे
1 आता दावीद म्हातारा झाला होता आणि त्याच्या आयुष्याच्या शेवटच्या दिवसात होता, तेव्हा त्याने आपला पुत्र शलमोन याला इस्राएलाचा राजा केले. 2 त्याने इस्राएलमधील सर्व पुढारी मंडळी, याजक आणि लेवी यांना एकत्र बोलावून घेतले. 3 तीस आणि त्याहून अधिक वय असलेल्या लेवींची त्याने गणना केली. त्यांची संख्या एकंदर अडतीस हजार होती.

4 त्यांच्यातले, चोवीस हजार लेवी परमेश्वराच्या मंदिराच्या कामावर देखरेख करणारे होते आणि सहा हजार अधिकारी आणि न्यायाधीश होते. 5 चार हजार द्वारपाल होते आणि दावीद म्हणाला, मी जी वाद्ये आराधना करायला करवून घेतली त्याच्या साथीने परमेश्वराची स्तुती करणारे चार हजार होते. 6 लेवीचे पुत्र गेर्षोन, कहाथ आणि मरारी यांच्या घराण्यानुसार दावीदाने सर्व लेवींची तीन गटांमध्ये विभागणी केली.

7 गेर्षोन घराण्यात

लादान आणि शिमी हे दोघे होते.
8 लादान याला तीन पुत्र. यहीएल हा थोरला. नंतर जेथाम व योएल.
9 शिमीचे पुत्र असे शलोमोथ, हजिएल व हारान. लादानच्या घराण्यांचे हे प्रमुख होते.
10 शिमीला चार पुत्र. यहथ, जीजा, यऊश आणि बरीया.
11 यहथ हा त्यांपैकी मोठा, दुसरा जीजा, यऊश आणि बरीया यांना मात्र फार संतती नव्हती त्यामुळे त्यांचे दोघांचे मिळून एकच घराणे धरले जाई.

12 कहाथाला चार पुत्र होते:

अम्राम, इसहार, हेब्रोन आणि उज्जियेल.
13 अहरोन आणि मोशे हे अम्रामचे पुत्र अहरोन आणि त्याच्या वंशजाची खास कामाकरता निवड केली गेली होती. परमेश्वराच्या उपासनेच्या पवित्र कामाच्या तयारीसाठी त्यांना कायमचे वेगळे काढले गेले होते. परमेश्वरापुढे धूप जाळणे, परमेश्वराचे याजक म्हणून सेवा करणे, लोकांस आशीर्वाद देणे अशी त्यांची कामे होती. 14 मोशे हा देवाचा संदेष्टा होता. त्याचे पुत्र लेवीच्या वंशातच गणले जात.
15 गेर्षोम आणि अलियेजर हे मोशेचे पुत्र.
16 शबुएल हा गेर्षोमचा थोरला पुत्र.
17 रहब्या हा अलियेजरचा थोरला पुत्र. हा एकुलता एक होता. रहब्याला मात्र बरीच अपत्य झाली.
18 शलोमीथ हा इसहारचा पहिला पुत्र.
19 हेब्रोनचे पुत्र याप्रमाणे: यरीया मोठा, अमऱ्या दुसरा, यहजिएल तिसरा, यकमाम चौथा.
20 उज्जियेलाचे पुत्र: पहिला मीखा आणि नंतरचा इश्शिया.
21 महली आणि मूशी हे मरारीचे पुत्र. एलाजार आणि कीश हे महलीचे पुत्र.
22 एलाजाराला कन्या रत्नेच झाली. त्यास पुत्र नव्हता. या कन्यांचे विवाह नात्यातच झाले. त्या लग्न होऊन कीशाच्या घराण्यात गेल्या.
23 मूशीचे पुत्र: महली, एदर आणि यरेमोथ.

24 हे झाले लेवीचे वंशज आपापल्या घराण्यांप्रमाणे त्यांची मोजणी झाली. ते घराण्यांचे प्रमुख होते. त्यांच्यापैकी प्रत्येकाच्या नावाची नोंद झालेली आहे. जे वीस किंवा त्याहून अधिक वयाचे होते त्यांनी परमेश्वराच्या मंदिरात सेवा करणे हे त्यांचे काम. 25 दावीद म्हणाला, “इस्राएलाचा देव परमेश्वर याच्यामुळे लोकांस शांती लाभली आहे. परमेश्वर यरूशलेमेला कायमच्या वास्तव्यासाठी आला आहे. 26 तेव्हा लेवींना निवासमंडप आणि उपासनेतील सेवेचे इतर पात्रे सतत वाहण्याची गरज पडणारहि नाही.”

27 लेवी कुळातील वंशजांची मोजदाद करणे ही दावीदाची इस्राएल लोकांस अखेरची आज्ञा होती. त्यानुसार वीस वर्षे आणि त्यापुढील वयाच्या मनुष्यांची मोजणी झाली. 28 अहरोनाच्या वंशजांना परमेश्वराच्या मंदीरातील सेवेत मदत करणे हे लेवीचे काम होते. मंदिराचे आवार आणि बाजूच्या खोल्या यांची देखभाल ही त्यांच्याकडे होती. मंदिरातील सर्व पवित्र गोष्टी शुध्द ठेवणे ही त्यांची जबाबदारी होती. देवाच्या मंदिरातील हे काम ते करत असत. 29 मंदिरातील समर्पित भाकर मेजावर ठेवणे, पीठ, अन्नार्पण करण्याच्या वस्तू बेखमीर भाकरी यावर त्यांची देखरेख होती. याखेरीज, तव्यावर भाजलेले, मळलेले सर्वकाही सिध्द करणे, मोजून मापून त्या वस्तूंची तयारी करणे हे ही काम त्यांच्याकडे होते.

30 ते रोज सकाळ संध्याकाळ परमेश्वराचे आभार मानायला आणि त्याची स्तुती करायला उभे राहत. 31 आणि परमेश्वरास शब्बाथ दिवशी, चंद्रदर्शनाच्या आणि नेमलेल्या सणाच्या दिवशी ठरलेल्या संख्येप्रमाणे नेहमी परमेश्वरापुढे सर्व होमार्पणे अर्पण करण्यास हजर राहत.

32 ते दर्शनमंडप, पवित्रस्थानाचे प्रमुख होते. आणि त्यांचे सहकारी अहरोनाचे वंशज यांना ते परमेश्वराच्या मंदिराच्या सेवेत मदत करत होते.

<- 1 इतिहास 221 इतिहास 24 ->