Link to home pageLanguagesLink to all Bible versions on this site
19
अम्मोनी व अरामी लोकांचा पराभव
2 शमु. 10:1-19

1 आणि यानंतर असे झाले की, अम्मोन्याचा नाहाश राजा याच्या मृत्यू झाला व त्याच्याजागी त्याचा पुत्र राजा झाला. 2 दावीदाने म्हणाला, “नाहाशाचा पुत्र हानून याच्यावर मी दया करीन. कारण त्याच्या पित्याने माझ्यावर दया केली होती.” असे म्हणून दावीदाने हानूनच्या सांत्वनेसाठी आपले दूत अम्मोनी लोकांच्या देशी पाठवले. 3 तेव्हा अम्मोन्यांचे सरदार हानूनाला म्हणाले की, “दावीदाने तुझे सांत्वन करण्याकरता किंवा तुझ्या मृत पित्याचा मान केला असे तुला वाटते का? त्याने या लोकांस तुझा प्रदेश पाहण्यास आणि हेरगिरी करायला पाठवले आहे. त्यास तुझा प्रांत उद्ध्वस्त करायचा आहे.”

4 हे ऐकून हानूनाने दावीदाच्या दूतांना अटक केली आणि त्यांचे मुंडन केले. त्यांची कमरेपर्यंतची वस्रेही फाडली आणि त्यांना वाटेला लावले. 5 मग कोणी जाऊन दावीदाला ही बातमी सांगितली, तेव्हा त्याने भेटण्यास माणसे पाठवली, कारण त्या मनुष्यांना मोठी लाज वाटली आणि राजाने त्यांना निरोप पाठवला तुमच्या दाढ्या वाढेपर्यंत तुम्ही यरीहो येथे रहा मग इकडे या.

6 जेव्हा अम्मोन्यांनी पाहिले की, दावीदाला आम्ही दुर्गंध असे झाले आहोत, तेव्हा हानून आणि अम्मोनी लोकांनी मेसोपटेम्या व अराम माका व सोबा येथून रथ आणि सारथी मोलाने आणण्यासाठी एक हजार किक्कार[a] रुपे पाठवले. 7 अम्मोन्यांनी बत्तीस हजार रथ व माकाच्या राजा व त्याचे लोक मोलाने ठेवले; तेव्हा त्यांनी येऊन मेदबा नगराजवळ तळ दिला. अम्मोनी आपल्या नगरातून एकत्र होऊन लढायला आले.

8 दावीदाने हे ऐकले तेव्हा त्याने यवाबाला आणि त्याच्या सर्व सैन्यासकट पाठवले. 9 अम्मोनी लोक बाहेर पडले व लढाईसाठी त्यांनी नगराच्या वेशीजवळ मांडणी केली. आलेले राजे मैदानात एकीकडे उभे होते.

10 सैन्याच्या दोन तुकड्या आपल्याविरुध्द उभ्या ठाकलेल्या असून त्यातली एक आपल्यामागे व एक पुढे आहे हे यवाबाने पाहिले. तेव्हा त्याने इस्राएलातील चांगल्या लढवय्यांना निवडले आणि अरामी सैन्याविरुध्द त्यांची व्यवस्थित मांडणी केली. 11 उरलेल्या इस्राएली सैन्याला आपला भाऊ अबीशयाच्या हाती सोपवले आणि त्याने या सैन्याची अम्मोन्याविरुध्द लढण्यास मांडणी केली. 12 यवाब म्हणाला, “अरामाचे सैन्य जर माझ्यापेक्षा बलवान ठरले तर अबीशय तू मला सोडव. पण अम्मोनी सैन्य तुझ्यापेक्षा बलवान ठरले तर मी तुला सोडवीन. 13 बलवान हो, व आपल्या लोकांसाठी आणि देवाच्या या नगरांसाठी लढताना आपण सामर्थ्य दाखवू, मग परमेश्वराचे जे काय चांगले उद्देश आहेत तसे तो करो.”

14 मग यवाब व त्याच्या सैन्यातील शिपाई अरामी सैन्याविरुध्द लढाई करण्यास चालून गेले, तेव्हा इस्राएलाच्या सैन्यापुढून पळाले. 15 अरामाचे सैन्य माघार घेऊन पळून जात आहे हे पाहताच अम्मोन्यांनीही पलायन केले. अबीशय आणि त्याचे सैन्य यांच्याकडे त्यांनी पाठ फिरवली. अम्मोनी आपल्या नगरात परतले आणि यवाब यरूशलेमेला परत आला.

16 आणि इस्राएलपुढे आपला पराभव झाला आहे हे अरामी सरदारांनी पाहिले तेव्हा त्यांनी जासूद पाठवून फरात नदीपलीकडील आपल्या लोकांस बोलवून घेतले. शोफख हा हद्देजरच्या अरामी फौजेचा सेनापती होता. 17 अरामी लढाईची जमवाजमव करत आहेत हे दावीदाने ऐकले तेव्हा त्याने सर्व इस्राएल लोकांस एकत्र जमवले आणि यार्देन नदीपलीकडे जाऊन अराम्यांच्या समोर व्यूह रचला व ते त्याच्याशी लढले.

18 इस्राएल लोकांसमोरुन अराम्यांनी पळ काढला. दावीदाने व त्याच्या सैन्याने सात हजार अरामी सारथी आणि चाळीस हजार अरामी सैन्य यांना ठार केले. अरामी सैन्याचा नेता शोफख यालाही त्यांनी मारुन टाकले. 19 आणि इस्राएलाने आपला पाडाव केला आहे हे जेव्हा हद्देजराच्या सर्व सेवक व राजांनी पाहिले तेव्हा त्यांनी दावीदाशी तह केला व ते त्याचे चाकर झाले. म्हणून अरामी पुन्हा अम्मोनी लोकांस मदत करण्यास घाबरले. अशा रीतीने अरामी लोक अम्मोनींना मदत करण्यास तयार नव्हते.

<- 1 इतिहास 181 इतिहास 20 ->